‘अटलपर्वा’चा अस्त

‘अटलपर्वा’चा अस्त
‘अटलपर्वा’चा अस्त

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी (ता. १६) सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वाजपेयी यांना २००९ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता. वाजपेयी यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने आणि मूत्रपिंडाशी संबंधित विकारांमुळे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. अखेर गुरुवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही बुधवारी रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. उदारमतवादी, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या वाजपेयी यांची प्रतिमा सौम्य मध्यम मार्गी अशीच कायम राहिली. जनसंघ आणि नंतर भाजपच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावलेले अटलबिहारी वाजपेयी केंद्रात भाजपच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान झाले होते. त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. ते १९९८ मध्ये केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार १३ महिने टिकले. त्यांची तिसरी पंतप्रधानपदाची कारकीर्द मात्र पूर्ण मुदतीची होती. जगातील विकसित देशांचा रोष पत्करून मे १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. तसेच त्यांच्याच कारकिर्दीत कारगिल युद्ध घडले. या कसोटीच्या प्रसंगी त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. वाजपेयी यांच्याबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आत्मीयता आणि आपुलकीची भावना होती. डझनभर पक्षांना सोबत घेऊन त्यांनी चालवलेले आघाडी सरकार हा एक चमत्कारच मानला गेला. त्यांनी आपला ऋजू स्वभाव, राजकीय कौशल्य आणि कणखरपणा यांच्या जोरावर आघाडी सरकार चालवण्याची कसरत यशस्वीरीत्या पेलली. वाजपेयी यांनी देशाच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी देशहितासाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने त्यांना ''भारतरत्न'' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. वाजपेयी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील भिष्म पितामह काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना देशभरात आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com