राज्यात नवी शेतमाल तारण योजना येणार 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाची पतस्थिती अतिशय चिंताजनक आहे. येत्या खरिपासाठी त्यांच्या हातात भांडवल द्यायला हवे. शिखर बॅंकेकडून त्यासाठी किमान दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे. - विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, राज्य शिखर बॅंक
grain
grain

पुणेः राज्यातील शेतकऱ्यांची धोक्यात आलेली आर्थिक स्थिती विचारात घेत कमी व्याजात पाच लाखापर्यंत शेतमाल तारण कर्ज जलद उपलब्ध करून देण्याची तयारी शिखर बॅंक व वखार महामंडळाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे शिखर बॅंकेने दोन हजार कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंक व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अशा दोन मोठया विश्वासार्ह संस्था संयुक्तपणे या उपक्रमात उतरल्या आहेत. शिखर बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाने या उपक्रमाला हिरवा कंदील दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी बॅंकेचा दोन हजार कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे.  कष्टाने पिकवलेला किमती शेतमाल ताब्यात असताना किंवा हाती तारण पावती असतानाही शेतकऱ्याच्या खिशात पैसा येत नाही. वखार पावतीच्या कर्जासाठी त्याला चकरा माराव्या लागतात. प्रत्येक बॅंकांचे नियम वेगवेगळे व किचकट आहेत. यातून कर्जापेक्षा त्रास नको, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्याची शेतमाल तारण योजना फसल्याचे दिसून येते. या समस्यांचा अभ्यास करून शिखर बॅंक व वखार महामंडळाने नवी तारण योजना तयार केली आहे. ही योजना शेतकरीभिमुख असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यात शासनाच्या वखारींमध्ये माल ठेवून सध्या ११०० कोटीचे तारण कर्ज उचलण्यात आले आहे. मात्र, त्यात शेतकऱ्यांकडे गेलेल्या रकमेचा वाटा फक्त ३५० कोटी रुपयांचा आहे. मुळ शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या या योजनेचा फायदा व्यापाऱ्यांनी लाटून ७५० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. अर्थात, त्याला कारण सध्याच्या सदोष योजनेत आहे.  नव्या योजनेत शेतकऱ्याने आपला माल वखार महामंडळाकडे नोंदवताच ही नोंद तात्काल बॅंकेकडे जाईल. सोबत या मालाचे अधिकृत मुल्य देखील कळविले जाईल. बॅंकांना त्यांच्या धोरणाप्रमाणे व्याज आकारून तात्काळ कर्ज मंजूर करून काही तासात कर्जाची रक्कम शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करावी लागेल.  ‘‘शिखर बॅंकेला ही योजना आवडली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आणि कमी व्याजात कमाल पाच लाखापर्यंत कर्ज द्यावे, कर्जरक्कम लगेच शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी असे आमचे म्हणणे आहे. सध्याच्या रचनेत शेतमाल तारण योजना कुचकामी ठरलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोय कमी आणि मनःस्ताप जास्त होतो. बाहेर व्यापारीही भाव पाडून खरेदी करतात,’’ अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.  या योजनेत शेतकऱ्याच्या कर्जाचे व्याज काही प्रमाणात शासनाने भरल्यास मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळू शकतो. लॉकडाऊनच्या कालावधीत आणि नंतर देखील शासनाने या योजनेला प्रोत्साहन दिल्यास तसेच भावांतर योजना सुरू केल्यास शेतकऱ्याला उभे रहाता येईल, असेही बॅंकेला वाटते.  दरम्यान, राज्य वखार महामंडळ या योजनेवर बारकाईने काम करते आहे. राज्यातील सर्व बॅंकांसमोर ही योजना मांडून शेतकऱ्यांना कोणत्याही बॅंकेने तत्काळ कर्ज दिल्यास शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो, असे महामंडळाचे म्हणणे आहे. राज्य शासन व बॅंकांसमोर ही योजना मांडण्याची तयारी झाली आहे. पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा देण्याची धडपड या दोन्ही संस्थांकडून सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  प्रतिक्रिया शेतमाल मौल्यवान आहे. मात्र,सध्याच्या तारण योजनेत शेतकऱ्यांना कर्जासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी व्यापाऱ्याला कमी किमतीत शेतकरी माल विकतात. कोणतीही कागदपत्रे, फाईल न देता आणि बॅंकांच्या दारात न जाता शेतकऱ्याला जागेवर व तात्काळ कर्ज मंजुरी करून त्याच्या थेट बॅंक खात्यात रक्कम जमा करणारी नवी योजना आम्ही तयार केली आहे. विविध मान्यता पार पडताच काही दिवसात ही नवी कर्ज वितरण योजना लागू केली जाईल.  - अजित रेळेकेर, सचिव व सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य वखार महामंडळ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com