जालना येथे २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये दूग्ध व्यवसायाबाबत जागृती व्हावी, या हेतूने येत्या २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान जालना येथे राष्ट्रीय पशू - पक्षी प्रदर्शन भरवले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.  

मंत्रालयात सोमवारी (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री खोतकर बोलत होते. ते म्हणाले, की राज्य सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भ, मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी विशेष प्रकल्प राबवित आहे. त्यासोबतच या भागातील शेतकऱ्यांना पशुपालनाविषयी माहिती मिळावी, प्रेरणा मिळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीनदिवसीय राष्ट्रीय प्रदर्शनात देशभरातील जातिवंत पशू-पक्ष्यांचा समावेश असेल. या वेळी शेतकऱ्यांना पशुपालनाविषयीची तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. तसेच देशी जनावरांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने जातिवंत देशी जनावरे प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. 

५ कोटी रुपये किमतीचा युवराज रेडा आणि ९ कोटींचा सुल्तान रेडा या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. प्रदर्शनात प्रामुख्याने गीर, साहिवाल, थारपारकर, राठी, वेचूर या अधिक दूध देणाऱ्या देशी गायी प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहेत. त्याशिवाय ५० लाख रुपयांपुढील किमतीचे बैलही प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना जातिवंत आणि उपयुक्त जनावरे पाहण्याची संधी मिळणार आहे.

प्रदर्शनात विविध स्पर्धा, परिसंवाद, शेतकऱ्यांशी थेट संवाद आदी वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनासाठी परराज्यातील सुमारे हजारांवर जातिवंत जनावरे येणार आहेत. त्याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण पशुपक्ष्यांचे प्रतिनिधित्व प्रदर्शनात असणार आहे.

या निमित्ताने दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, ससेपालन, बटेरपालन आदी पशुसंवर्धनाशी निगडित व्यवसायांमध्ये प्रगत साधनांचा वापर करून व्यवसाय कसा किफायतशीर करावा, याविषयीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com