जातिवंत डांगी जनावरांसाठी राजूरचे प्रदर्शन

exhibition of desi dangi cows
exhibition of desi dangi cows

सूर्यकांत नेटके राजूर (ता. अकोले, जि. नगर) येथे ५८ वर्षांपासून डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनामुळे डांगी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हक्काचा बाजार उपलब्ध झाला. प्रदर्शनात नगर, नाशिक, पुणे, पालघर, ठाणे जिल्ह्यांमधील आदिवासी पशुपालक सहभागी होतात.  जातिवंत डांगी गोवंशासाठी या बाजारपेठेला भेट दिलीच पाहिजे. अकोले तालुक्यात (जि. नगर) साधारण पंचेचाळीस गावांत तसेच नाशिक, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील काही तालुक्यांत आदीवासी शेतकरी आहेत. या भागात दरवर्षी जोरदार पाऊस पडतो. या पावसात शेतीकामासाठी केवळ डांगी बैल उपयोगी ठरतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे डांगी बैलजोडी दिसते. डांगी जनावरांचे जतन, संवर्धन करण्यासाठी राजूर (ता. अकोले) ग्रामपंचायत आणि डांगी गोसेवा संघाने १९६१ मध्ये डांगी जनावरांचे प्रदर्शन सुरू केले. या प्रदर्शनात डांगीमधील काळा, बाळा, काळा-बाळा, ढवळा, लाल्या हे उपप्रकारदेखील पहावयास मिळतात. प्रदर्शनातूनच जातिवंत जनावरांची खरेदी- विक्रीही सुरू झाली. पहिल्या प्रदर्शनात साधारण दोन ते तीन हजार जनावरे आली होती. त्यात टप्प्याटप्‍प्याने वाढ होत गेली. गेल्या दहा वर्षापासून जनावरांची संख्या वाढली. यंदा ५० हजारांच्या जवळपास जनावरे प्रदर्शनात आली होती. साधारण दहा वर्षापासून माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड या प्रदर्शनासाठी मदत करत आहेत. यंदा जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे यांनी दिली.  स्पर्धेतून मिळते प्रोत्साहन 

  • राजूरला १९६१ ला डांगी जनावरांचे प्रदर्शन सुरू झाले. त्याच वर्षापासून जातिवंत डांगी जनावरांची स्पर्धादेखील सुरू झाली. त्यात अदात, दोन दाती, चार दाती, सहा दाती, आठ दाती, बैलजोडी, गाभण गाय, दुभती गाय, कालवड अशा गटामध्ये स्पर्धा घेतली जाते.  
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सबंधित शेतकऱ्यांची नावनोंदणी केली जाते. त्यानंतर मुख्य मंचासमोर गटनिहाय जनावरे एकत्रित करून त्यांची तपासणी करून स्पर्धेसाठी जनावरांची निवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने चपळता, दात, वशिंड, खूर आणि त्वचेचा तेजदारपणा पाहिला जातो.   
  • विजेत्यांना प्रत्येकी पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये बक्षीस दिले जाते.  
  • सर्व विभागातील विजेत्या डांगी जनावरांतून शेवटी ‘चॅम्पियन’ आणि ‘उप-चॅम्पियन' निवडले जातात. त्यांना पंधरा हजार आणि सात हजारांचे बक्षीस दिले जाते. स्पर्धेमुळे डांगी जनावरे संभाळण्यासाठी प्रोत्साहन मिळते.  
  • यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांचा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड आणि महिला शेतकरी राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. या वेळी सरपंच हेमलता पिचड, उपसरपंच गोकूळ कानकाटे आणि मान्यवर उपस्थित होते, असे शांताराम काळे व विलास तुपे यांनी सांगितले.
  • डांगी गोवंशाला मागणी 

  • अकोले तालुक्यातील साधारण पन्नास गावांसह शेजारच्या ठाणे, पालघर, नाशिक, पुणे जिल्ह्यामधील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अन्य भागाच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे या भागातील शेतीमध्ये पावसाळ्यात डांगी जनावरे उपयुक्त ठरतात.   
  • डांगी जनावरांची त्वचा तेलकट व शिंगे आखूड असतात. खूर टणक असल्याने जास्तीच्या पावसातही ही जनावरे तग धरतात. त्यामुळे या भागातील आदिवासी शेतकरी डांगी जनावरांना प्राधान्य देतात.   
  • अन्य भागांच्या तुलनेत अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असला तरी सिंचनाचा अभाव आहे. गेल्या दोन वर्षापासून या भागानेही दुष्काळाची झळ सोसलेली आहे. या भागातील प्रमुख पीक भात आहे. मात्र गेल्या दोन वर्षात पाऊस कमी झाल्याने  चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे यंदाच्या प्रदर्शनात जनावरांची विक्री वाढली, त्याचा दरावर परिणाम झाला असल्याची माहिती विठा (ता. अकोले) येथील शेतकरी अशोक आवारी यांनी दिली.  
  • वर्ष   जनावरांची खरेदी विक्री उला ढाल (रुपये)
    २०१६     १०८० ८८ लाख ७८ हजार
    २०१७    ५२९     ५० लाख २२ हजार
    २०१८    ७९५   ६१ लाख १३ हजार 
    २०१९       ५१५   ८० लाख २३ हजार.

    प्रदर्शनातील यंदाची स्थिती

  • सहभागी जनावरे - ५० हजार
  • उलाढाल - एक ते दीड कोटी रुपये
  • लोकांचा सहभाग - सुमारे ३ लाख
  • जनावरांचे यंदाचे दर

  • डांगी बैल - ४५ हजार ते १ लाख रुपये  
  • डांगी गाय -१५ ते ३५ हजार रुपये  
  • डांगी दुभती गाय - ३० ते ५० हजार रुपये  
  • खिलार बैल - ५० हजार ते १ लाख  
  •  म्हैस - २० ते ६० हजार रुपये
  • देशी बियाण्यांबाबत जागृती

  • प्रदर्शनात सहभागी झालेली डांगी जनावरे पाहण्यासाठी आणि यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वदूर भागातील आदिवासी तर येतातच; पण अन्य लोकही येतात.  
  • अकोले तालुक्यासह आदिवासी भागात बहुतांश कुटुंबांत विविध पिकांच्या देशी जातींचे संवर्धन केले जाते. अकोले तालुक्यात बियाणे संवर्धनाचे प्रमाण अधिक आहे.  
  • हे प्रदर्शन आदिवासी लोकांसाठी सांस्कृतिक मेळा असतो. प्रदर्शनात कृषी, पशुसंवर्धन विभागातर्फे आदिवासी भागातील विविध पिकांच्या देशी जातींचे जतन आणि देशी जातींची लोकांना माहिती मिळावी म्हणून जनजागृती केली जाते. त्यासंबंधीचे स्टॉल प्रदर्शनात असतात.  
  • शेतकरी प्रतिक्रिया- डांगी जनावरांच्या संवर्धनासाठी अदात, दोन दाती, चार दाती, सहा दाती, आठ दाती, बैलजोडी, गाभण गाय, दुभती गाय, कालवड यांच्या स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. बक्षिसापोटी एक लाख बारा हजार रुपयांची बक्षिसे दिली जातात. प्रदर्शनाच्या निमित्ताने सहभागी लोकांची संख्याही मोठी असते. - बाळासाहेब आंबरे,  (ग्रामसेवक, राजूर, जि. नगर) अनेक वर्षांपासून आम्ही प्रदर्शनात सहभागी होत असतो. आदिवासींचा सांस्कृतिक मेळावा आणि डांगी जनावरांचे जतन व्हावे यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना डांगी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. - गंगाराम धिंदळे (शेतकरी, शिरपुंजे, जि. नगर) अकोले तालुक्यासह शेजारच्या जिल्ह्यामधील शेतकरी प्रदर्शनात डांगी जनावरे घेऊन येतात. प्रदर्शनाच्या निमित्ताने जनावरांची खरेदी-विक्री आणि स्पर्धादेखील होते. या प्रदर्शनासाठी दरवर्षी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर आणि पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, नगर यांचे चांगले सहकार्य मिळते. - गोकूळ कानकाटे, ९९७०४५६४१४ (उपसरपंच, राजूर, जि. नगर) संपर्क-  अकोले बाजार समिती, ०२४२४-२२२१५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com