सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून दुग्धव्यवसायाचा विस्तार

कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची असते. सोबतच त्या क्षेत्रात नावीन्य आणण्याची व काळानुरुप बदल करण्याची गरज असते. रिसोड येथील मनोज जाधव या युवकाने दहा वर्षांपूर्वी दूधसंकलनास सुरुवात केली. त्यानंतर स्वतःमधील विविध क्षमतांचा वापर करून स्वभांडवलावर आधारीत व्यवसायात शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारणे, प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती व आता थेट विक्री करून आश्‍वासक उलाढाल अशी त्यांची उल्लेखनीय वाटचाल सुरू आहे.
manoj jadhav while measuring  milk fat with the help of machine
manoj jadhav while measuring milk fat with the help of machine

कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची असते. सोबतच त्या क्षेत्रात नावीन्य आणण्याची व काळानुरुप बदल करण्याची गरज असते. रिसोड येथील मनोज जाधव या युवकाने दहा वर्षांपूर्वी दूधसंकलनास सुरुवात केली. त्यानंतर स्वतःमधील विविध क्षमतांचा वापर करून स्वभांडवलावर आधारीत व्यवसायात शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारणे, प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती व आता थेट विक्री करून आश्‍वासक उलाढाल अशी त्यांची उल्लेखनीय वाटचाल सुरू आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड हा मराठवाड्याला लागून असलेला तालुका. उद्योगव्यवसायांची वानवा असल्याने येथील अर्थकारण शेती व त्यावर आधारीत व्यवसायांवर अवलंबून आहे. सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्याने शेती पावसाच्या पाण्यावर अधिक प्रमाणात अवलंबून आहे.

दुग्धव्यवसायाचा पर्याय विदर्भात दुग्धव्यवसाय अनेक अडचणींमुळे म्हणावा तसा वाढला नाही. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी नाहीत असेही अनेकदा म्हटले जाते. परंतु येथील काही धडपडे तरुण हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशापैकींच एक मनोज जाधव आहेत. करडा येथील रहिवासी असलेले हे जाधव कुटुंब आता रिसोड येथे राहते. त्यांची शेती आहे. मात्र ती भाडेतत्वावर कसण्यासाठी दिली आहे. खरिपात सोयाबीन, रब्बीत गव्हाचे पीक त्यात घेतले जाते. मनोज यांनी आर्थिक सक्षमता मिळवण्यासाठी दुग्धव्यवसायाचा पर्याय निवडला. सन २०१० पासून त्यात सातत्य ठेवले. व्यवसायाला यंत्र-तंत्रांची जोड दिली. सातत्याने नावीन्याचा शोध घेतला.

दूध संकलनापासून सुरुवात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मनोज यांनी २०१० मध्येच छोटेखानी दूध संकलन केंद्र सुरु केले. यासाठी भाऊ अमर व वडील विलासराव यांनी सहकार्य केले. वर्षभरात यातील अनुभव व अर्थकारण आश्‍वासक वाटल्याने उत्साह दुणावला. त्यामुळे डेअरी सुरु करण्याचे ठरविले. पुढील वर्षात ‘सृष्टी डेअरी’ हे विक्री केंद्र सुरु केले.दुधाचा दर्जा टिकवण्यावर सर्वात भर दिला. त्यामुळे ग्राहकांचा विश्‍वास संपादन करता आला. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी तब्बल १७०० लीटरपर्यंत दूध संकलन व्हायचे. तालुक्याचा दर्जा असलेल्या या शहरात चार ठिकाणी विक्री केंद्र सुरु केले.

दुग्धोत्पादकांचे नेटवर्क

  • तालुक्याला येऊन घरोघरी दूध देणाऱ्यांसाठी मनोज यांनी थेट संकलनाची सोय करून दिली. रिसोड परिसरातील मोप, भर, चिंचाबाभर, वाकद, पान कनेरगाव, गोभणी, मार्शी आदी गावांतून दूध संकलन त्यांनी सुरु केले. दररोज दीड हजार लीटरपेक्षा अधिक संकलन होऊ लागले. आज जवळपास २०० दूध उत्पादकांचे नेटवर्क त्यांनी तयार केले आहे.
  • डेअरीतील कामांसाठी सात जणांना पूर्णवेळ रोजगार मिळाला. संकलन केंद्रावर आठ जण काम करू लागले. सोबत वाहतुकीसाठी वाहन घेतले. शिवाय तीन ते चार ऑटो भाडेतत्वावर घेतल्या. ही वाहने खेडोपाडी जाऊन दैनंदिन दूध संकलन करतात. प्रत्येक शेतकऱ्याला पावती दिली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी न चुकता रोख किंवा चेकद्वारे शेतकऱ्यांना पेमेंट दिले जाते.
  • प्रक्रिया व यंत्रांचा वापर

  • दूध संकलनात फॅट हा घटक महत्त्वाचा होता. पूर्वी फॅट मोजण्याची पध्दत वेळखाऊ होती. काळाची गरज ओळखून मनोज यांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर सुरु केला. यामुळे अवघ्या २० सेकंदात फॅट, एसएनएफ, पाणी, प्रथिन अशा विविध बाबींची चाचणी करणे सोपे झाले.
  • ऑगस्ट ते फेब्रुवारी काळात दुधाची आवक वाढते. तुलनेने मागणीत बदल होत नाही. त्यामुळे दूध शिल्लक राहण्याचे प्रमाण डोकेदुखी बनते. हाच त्रास मनोज यांनाही झाला. यातून मार्ग म्हणजे प्रक्रिया करणे. यादृष्टीने विचार करीत मनोज यांनी ठिकठिकाणी यंत्रांची माहिती गोळा केली. त्यानंतर दुधापासून विविध पदार्थ तयार करण्यासाठी यंत्रांची खरेदी केली. खवा तयार करण्यासाठी कोल्हापूर येथून यंत्र आणले. त्याद्वारे पेढा, खवा, बासुंदी, पनीर, तूप, श्रीखंड असे पदार्थ तयार करणे सुरु केले. उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ तयार होत असल्याने ग्राहकांची पसंती मिळाली.
  • बँकांचे सहकार्य नाहीच स्वतःच्या पायावर दूग्ध व्यवसाय उभा करणाऱ्या मनोज यांचा बँकांबाबतचा अनुभव मात्र काहीसा निराशादायक आहे. ते म्हणाले की माझ्या व्यवसायाची उलाढाल कोटींपर्यंत आहे. हा व्यवसाय विस्तारण्यासाठी अनेकदा बँकांकडे भांडवलासाठी पाठपुरावा केला. प्रस्ताव दिले. तरीही कोणत्याही बँकेने सहकार्य केले नाही. बेरोजगारांसाठी, छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या योजनाही मृगजळ ठरल्या. केवळ अनुदानासाठी प्रस्ताव देतात अशांना बँकांचे सहकार्य मिळते. परंतु आपण गेल्या दहा वर्षांपासून हा व्यवसाय पुढे नेत आहोत. स्वकमाईतून तो वाढवत आहोत. तरीही पाठबळ मिळत नाही अशी खंत ते व्यक्त करतात. कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन करडा कृषी विज्ञान केंद्राचे पशुपालकांना सुरुवातीपासून मार्गदर्शन मिळत आहे. जनावरांच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी, चारा पिके, दूध वाढण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत येथील तज्ज्ञ सातत्याने मार्गदर्शन करतात. मनोज यांनाही केंद्रात होणाऱ्या विविध चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शक म्हणून बोलविण्यात येते. कष्ट, सुनियोजन, जोखीम. सातत्य, चिकाटी यातून उभ्या राहिलेल्या आपल्या व्यवसायाची मांडणी करून इतरांना ते प्रेरणा देतात. लहान भाऊ अमरने देखील नाबार्डच्या सहकार्याने सात दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेतले आहे. त्याचाही फायदा होत आहे.

    मनोज यांचा दुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात दैनंदिन दूध विक्री- ७०० लीटर दूध खरेदी- ६ रुपये प्रति फॅट दुधाचा सरासरी फॅट- ७.० ग्राहकांना दूध विक्री- ५० रुपये प्रतिलीटर रोजची विक्री (दर प्रति किलो) दही- ४० किलो ( दर ६० रुपये) खवा- २ ते ३ किलो ( दर २८० रुपये) पनीर-५ ते ६ किलो (दर ४०० रुपये) पेढा- १० किलो (दर ३२० रुपये)

    संपर्क- मनोज जाधव-९९२३७०३४९५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com