agriculture news in marathi Experiment of cultivation of exotic vegetables | Agrowon

परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोग

बी.बी.तांबोळकर, पी.बी.मांजरे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

बीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात परदेशी भाज्यांची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली. त्यात चायनीज कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट व नवलकोल यांचा समावेश होता.

बीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात परदेशी भाज्यांची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली. त्यात चायनीज कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट व नवलकोल यांचा समावेश होता. या लागवडीला परिसरातील शेतकऱ्यांनी भेट देऊन तंत्र समजून घेतले. परदेशी भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना नव्या पिकांचे पर्याय उपलब्ध होणार आहे.

चायनीज कोबी व नवलकोल यांचा सॅलड म्हणून तर ब्रुसेल्स स्प्राऊट भाजीसाठी वापरली जातात. यामध्ये क जीवनसत्त्व आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात. 
लागवडीचा हंगाम व जमीन ही कोबीवर्गीय पिके असून, त्यांना थंड हवामानाची आवश्यकता असते. सरासरी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक असते. या पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि सुपीक जमीन निवडावी.

रोपे तयार करणे 
प्लॅस्टिक ट्रेमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बियांची पेरणी करावी. नवलकोलच्या एक हेक्टर लागवडीसाठी १ किलो तर रेड कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊटसाठी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे लागते. या पिकाची लागवड थेट बियाणांची पेरणी करूनसुद्धा करता येते.

गादी वाफे तयार करणे 
शेडनेट गृहात प्रत्येक पिकासाठी एक गुंठा जागेवर एक मीटर रुंद व १५ सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावे. वाफे तयार करण्यापूर्वी मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत व पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी लाल माती मिसळावी.

रोपांची पुनर्लागवड
रोपे तीन ते चार पानावर असताना म्हणजे तीस ते चाळीस दिवसांनी रोपाची गादी वाफ्यावर नोव्हेंबर महिन्यात म्हणजे हिवाळी हंगामात पुनर्लागवड करावी. 

लागवडीचे अंतर 
नवलकोल ३० x२० सेंमी, चायनीज कोबी ४५ x ६० सेंमी व ब्रुसेल्स स्प्राऊट ६० x ६० सेंमी अंतरावर लागवड करावी.

आंतरमशागत 

 • नियमितपणे पिकातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. 
 • पिकांची मुळे उघडी पडत असल्यास त्यांना मातीची भर देण्याचे काम महत्त्वाचे आहे. विशेषतः ब्रुसेल्स स्प्राऊटसारखे पीक २ ते ३ फूट उंच वाढणारे असल्याने त्याला मातीची भर देणे आवश्यक असते.

खते व पाणी व्यवस्थापन 

 • कोबीवर्गीय पिकांप्रमाणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे. मात्र, प्रयोगामध्ये या पिकाचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेण्यात आले. लागवड करण्यापूर्वी म्हणजे मशागतीच्या वेळेस एक टन शेणखत मिसळून गादी वाफे तयार करावेत. पुनर्लागवडीनंतर २० दिवसाच्या फरकाने दोन वेळेस जीवामृत प्रत्येक झाडाला द्यावे. 
 • तीन ते चार दिवसाच्या अंतराने ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

किडी व रोगांचा प्रादुर्भाव 
रेड कोबी व नवलकोल पिकावर मुख्यत: मोहरीवरील काळी माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही बारीक जाडसर काळपट रंगाची माशी आहे. ती पानांच्या पेशीत अंडी घालते. त्यातून काळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. त्या अळ्या कोवळी पाने खातात. पूर्ण गड्डा खाऊन टाकतात. या किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क यांच्या दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या पुरेशा होतात. कोबीवरील चौकोनी ठिपक्याचे फुलपाखरू, पानावर जाळी विणणाऱ्या अळ्या, मावा, गड्डा पोखरणारी अळी इ. किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच प्रमाणे रोपे कोलमडणे, काळी कूज, केवडा, करपा, भुरी इ. रोग या पिकात आढळतात. 

काढणी 

 •  चायनीज कोबी पुनर्लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांने काढणीस येतात. याची काढणी कोबीप्रमाणे जमिनीलगत कापून करावी.
 • नवलकोल गड्डे सर्वसाधारणपणे ५० ते ६० दिवसांत काढणीस तयार होतात. गड्डे ५ ते ८ सेमी व्यासाचे झाल्यावर काढणी करावी.
 • ब्रुसेल्स स्प्राऊटची काढणी १०० ते ११० दिवसानंतर करतात. काढणी करतेवेळी गड्डा हा घट्ट असावा लागतो. त्याचा आकार अडीच ते पाच सेंमी इतका असावा. त्यापेक्षा लहान गड्डयाची काढणी करू नये. गड्डे कोवळे व लुसलुशीत असल्यास चवीला चांगले लागतात.

प्रयोगाचे निष्कर्ष
डॉ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालयामध्ये प्रत्येकी एक गुंठा एवढ्या जागेत परदेशी भाज्यांची लागवड करण्यात आली होती.  
या प्रयोगामागील उद्देश 

 • स्थानिक हवामानामध्ये विदेशी भाजीपाल्यांची लागवडीचा अभ्यास करणे.
 • देशी व विदेशी भाज्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे.
 • शेतकऱ्यांकरिता नवीन भाजीपाल्याचा पर्याय उपलब्ध करून देणे.
 • कृषी विद्यार्थ्यांना विदेशी भाज्यांचा अभ्यास व अनुभव देणे.
 • विदेशी भाजीपाल्यांसाठी उपलब्ध बाजारपेठेचा अभ्यास करणे.

या प्रयोगात चायनीज कोबी १२० किलो, ब्रुसेल्स स्प्राऊट ८० किलो आणि नवलकोल १५० किलो इतके उत्पादन मिळाले. त्यास ३० ते ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला.

संपर्क- बी. बी. तांबोळकर, ९८२३८२८६४५ 
पी. बी. मांजरे, ८८८८३४८०५०
(सहाय्यक प्राध्यापक, सौ.के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालय, बीड.


इतर विदेशी भाज्या
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
‘एक्झॉटिक’ भाजीपाला शेतीतून वेगळी वाट...सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील...
कोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, ब्लाइंडनेस...कोबीवर्गीय पिकांत अन्नद्रव्यांच्या संतुलित...
अॅस्परॅगस लागवड तंत्रज्ञान आपल्या देशातील शतावरी वनस्पतीच्या कुळातील...
लीक लागवड तंत्रज्ञान लीक हे कांदा कुळातील पीक आहे. याचे शास्त्रीय नाव...
ब्रुसेल्स स्प्राऊट लागवड तंत्रज्ञान ब्रुसेल्स स्प्राऊटचे शास्त्रीय नाव ‘ब्रासिका...
लेट्यूस लागवड तंत्रज्ञान लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट...
झुकिनी लागवड तंत्रज्ञान झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असले,...
सुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवडब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम...