आंबा, काजूसह भाज्यांची प्रयोगशील शेती

Mr. Satam's joint family
Mr. Satam's joint family

शिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील माधव साटम यांनी हापूस आंबा, काजू पिकांना काळी मिरी, कलिंगडाची जोड दिली आहे. स्ट्रॉबेरीचा प्रयोग, ओल्या काजूगरांची विक्री, काही गुंठ्यांत विविध सेंद्रिय भाजीपाला पिकवून थेट ग्राहक बाजारपेठ अशा विविध उपक्रमांमधून प्रयोगशील व प्रगतीशील शेतीचा नमुनाच पेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड-निपाणी या मुख्य रस्त्यावर शिरगाव (ता. देवगड) आहे. आंबा, काजू, कोकम, भात ही गावपरिसरात घेतली जातात. गावातील माधव साटम यांची २५ एकर जमीन आहे. त्यातील काही चढउताराची तर काही सपाट आहे. साटम यांची प्रगतिशील शेती

  • साटम यांच्या १५ एकरांत हापूस आंब्याची सुमारे ६०० झाडे तर काजूची १०० झाडे आहेत.
  • सेंद्रिय पद्धतीचा अधिकाधिक वापर करताना रासायनिक खतांचा अत्यंत अल्प तर रासायनिक कीडनाशकांचा वापर ते अजिबात करीत नाहीत.
  • रासायनिक अवशेषमुक्त फळे पिकवण्यावर भर देताना आंब्यात वाढ नियंत्रकाचाही वापर करीत नाहीत.
  • बागांमध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढते. परंतु कोणत्याही तणनाशकाचा वापर होत नाही. पॉवर टिलरच्या माध्यमातून तण काढण्यात येते. गवत आणि बागेतील पालापाचोळा यांचा झाडांच्या मुळात खत म्हणून वापर होतो.
  • रसाळ आंब्यांना मागणी

  • सेंद्रिय पद्धतींचा अधिकाधिक अवलंब केल्याने उत्पादित गोड, रसाळ आंब्यांना मोठी मागणी असते.
  • स्थानिक भागात ते थेट विक्री करतात. कोल्हापूर व पुणे येथेही नातेवाईकांच्या मदतीने थेट विक्री होते.
  • सहाशे झाडांपासून सुमारे १५०० पेटी (प्रति पेटी पाच डझन) आंबा उत्पादित होतो.
  • पल्प विक्री

  • देवगड भागात उभारलेल्या क्लस्टरचा आधार घेऊन साटम आंब्यापासून पल्पनिर्मिती करू लागले आहेत.
  • मागील वर्षी एक टन पल्पची खाजगी कंपनीला दोनशे रुपये प्रति लिटर दराने विक्री केली.
  • मिरीचे पीक

  • साटम सातत्याने बागेत विविध प्रयोग करतात. त्यांनी तीन वर्षांपूर्वी आंब्याच्या ३०० झाडांवर मिरी लागवड केली आहे. त्याला खत म्हणून पाचापाचोळ्याचा वापर केला. मिरीची वाढ अतिशय चांगली आहे.
  • आत्तापर्यंत ३०० किलोपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सध्या किलोला ३०० ते ३५० रुपये दर सुरू आहे. किरकोळ विक्री ५०० रुपये दराने होत आहे.
  • १२ दिवसांत कलिंगडाची विक्री

  • प्रत्येकी एक एकर या प्रमाणे दोन एकरांत व दोन टप्प्यात कलिंगड लागवड होते. एकरी ८ ते १० टन उत्पादन ते घेतात. त्याची विक्री शिरगाव येथे स्टॉल मांडून थेट होते.
  • अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्याने ग्राहकांकडून त्यास चांगली पसंती असते. २० रुपये प्रति किलो दराने केवळ १२ दिवसांत आठ टन विक्री साधल्याचे साटम यांनी सांगितले.
  • ओल्या काजूगराची विक्री

  • अलीकडील काळात काजूचे दर घसरले. त्यामुळे हे पीक परवडत नाही. परंतु साटम यांनी त्यावर उपाय शोधून ओल्या काजूगराच्या विक्रीला पसंती दिली आहे. शेकडा ३०० रुपये या दराने स्थानिक बाजारपेठेसह मुंबईत देखील त्याला मोठी मागणी आहे.
  • काजू फोडणी यंत्र

  • परिपक्व झालेला काजू फोडण्यासाठी बाजारात यंत्रे उपलब्ध आहेत. परंतु कच्च्या काजूतील गर बाहेर काढण्याचे काम हाताने करावे लागते. काजूचा डिंक हाताला लागला तर त्वचेला अपाय होतो. ती जोखीम असते. शिवाय काजू फोडायला खूप वेळ लागतो. साटम यांनी ही समस्या ओळखून प्रचलित यंत्रात सुधारणा केली आहे.
  • सोडा बाटलीचे टोपण यातील फळीला ठोकून बसविले आहे. या टोपणात काजू घट्ट राहतो. याशिवाय पायाच्या एका अंगठ्याची पकड लावून दोन्ही हातांतील काठीच्या साह्याने सहज गर बाहेर काढता येतो. पंधरा ते २० मिनिटांत १०० हून अधिक काजू या पद्धतीने फोडण्यात येतो.
  • विविध प्रकारच्या आंब्याच्या जातीॉ

  • पंधरा एकराच्या आंबा बागेत हापूससह २८ प्रकारच्या अन्य जातीही आहेत. यात बस्तर, नीलम, दशेहरी, रत्ना, केशर, आम्रपाली आदचा समावेश आहे. कोणती जात आपल्या वातावरणात अधिक उत्पादन देऊ शकते याचा अभ्यास साटम करतात. बागेतील एका झाडावर चार प्रकारचे आंबे मिळतात.
  • सेंद्रिय भाजीचा व्हॉटसॲप ग्रूप

  • शिरगाव परिसरातील सुमारे ५० ते ६० ग्राहकांचा सेंद्रिय भाजीपाला व्हॉटस ॲप ग्रूप बनविला आहे.
  • सुमारे १० ते २० गुंठ्यांत भेंडी, गवार, पालेभाज्या ते घेतात. आपल्याकडे किंवा अन्य शेतकऱ्यांकडे उपलब्ध भाजीबाबतचा मेसेज’ ते दररोज सकाळीच ‘ग्रूप’वर देतात. भावाचे ‘मेडिकल’चे दुकान आहे. तेथे भाजीपाला उपलब्ध केला जातो.
  • स्ट्रॉबेरी प्रयोग

  • पाच ते सहा गुंठ्यांत दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला. यंदाच्या वर्षी वातावरणात बदल झाल्याने हे पीक साधले नाही. परंतु साटम यांनी प्रयोगशीलता मात्र सोडलेली नाही.
  • कलम बांधण्यातील हातखंडा

  • साटम सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. खुंटीकलम बांधण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या बागेतील अनेक झाडांना त्यांनी कलम केले आहेच. परंतु, रस्त्याकडील अनेक रायवळ आंब्यांचेही खुंटीकलम त्यांनी केले आहे. रस्त्यावरून ये-जा करणारा कुणीही या झाडांचे आंबे काढून त्यांची चव चाखू शकतो.
  • एकत्रित कुटूंब

  • साटम यांचे दोन भावांचे एकत्रित कुटूंब आहे. घरात एकूण आठ सदस्य गुण्यागोविंदाने राहतात. बागेत सर्व मिळून कष्ट करीत असल्याने श्रमांची विभागणी होऊन कष्ट हलके होत असल्याचे साटम सांगतात.
  • संपर्क- माधव दिनकर साटम - ९७६४५९४०२७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com