शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत तज्ज्ञ व जालना जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २१) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या. या भेटीदरम्यान केलेल्या क्षेत्र पाहणीतून त्यांनी शेतकऱ्यांना सद्यःस्थितीत घ्यावयाच्या दक्षतेविषयी, तसेच करावयाच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

जालना जिल्हा मासिक चर्चासत्रअंतर्गत क्षेत्रीय पाहणी कार्यक्रम अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्‍यात रामगव्हाण, ढाकेफळ, हातडी आदी गावांत राबविण्यात आला. या क्षेत्रीय पाहणीत विविध खरीप पिकाची तसेच फळपिकांची पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे कापूस पीक गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव कसा येणार नाही, याबाबत एकात्मिक कीड नियंत्रण हा विषय शेतकरी बंधूंना समजावून सांगण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने कामगंध सापळा प्रतिएकर २ याप्रमाणे हेक्‍टरी ५ कामगंध सापळे लावावेत. तूर पिकाची विरळणी, कापूस पिकास आंतरमशागत, सोयाबीन पिकाची आंतरमशागत उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे सामूहिकरीत्या करणे आवश्‍यक आदी बाबी थेट शेतकरी बंधूंना समजावून सांगण्यात आल्या.

या क्षेत्रीय पाहणी मध्ये वनामकृविचे विस्तार कृषी विद्यावेता डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ ताभाळे,  उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. बनटेवाड, रामेश्वर ठोंबरे, सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांनी सहभाग नोदविला. या क्षेत्रीय पाहणीदरम्यान घनसावंगी तालुक्‍यातील ढाकेफळ या गावात १०० हेक्‍टरवर कृषी विभागाच्या साह्याने लावण्यात आलेल्या जवळपास पाचशे फेरोमन ट्रॅप लावलेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली.

पीक चांगले असले तरी पाऊस जेमतेमच आहे. कुठेही पाण्याची साठवण दिसत नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. शिवाय पाऊस कमी असल्याने पेरतेवेळी बहुतांश शेतकऱ्यांनी खत देण्याचे टाळले. आदी बाबी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. या वेळी शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅपची हाताळणी, खतं, औषधे यांचा योग्य वापर आदींविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com