‘एसएनएफ’च्या संभ्रमामुळे दूध उत्पादकांची लूट

दुध
दुध

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याबाबत दर्जाचे निकष ठरविताना ‘एसएनएफ’बाबत संभ्रमाची स्थिती ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलातून मनमानी पद्धतीने कपात केली जात आहे. त्यामुळे ‘एसएनएफ’च्या संभ्रमाचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी दुग्धविकास खात्याने केली आहे.  दुधाची गुणप्रत ठरवितांना राज्य शासनाने फक्त फॅटचे निकष जाहीर केले. मात्र, ‘एनएनएफ’बाबत कोणतीही माहिती न दिल्यामुळे राज्यात संभ्रमाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे ८.५ एसएनएफच्या खाली खासगी डेअरीचालक आणि काही सहकारी दूध संघदेखील मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बिलात कपात करीत आहेत.  महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की हा मुद्दा राज्याच्या दुग्धविकास आयुक्तांच्या बैठकीत उपस्थित झाला होता. ८.५ ‘एसएनएफ’च्या खाली प्रतिपॉईंटला एक रुपया कपात करण्याची एकमुखी सूचना आम्ही दुग्धविकास खात्याकडे केली आहे. त्यामुळे ‘एनएनएफ’चा संभ्रम लवकरच दूर होईल.  दरम्यान, दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी ‘एनएनएफ’बाबत दुध संघ व डेअरीचालकांकडून आलेल्या सूचना थेट दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. जानकर यांच्याकडून ‘एनएनएफ’चा कपात दर निश्चित झाल्यानंतर हा विषय पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला जाणार आहे.  ‘‘मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतरच एनएनएफच्या कपात दराची घोषणा केली जाणार आहे. तोपर्यंत बाजारपेठेतील घडामोडींवर आमचे कोणतेही नियंत्रण नसेल. बाजारात कमी एसएनएफसाठी दोन रुपयांपर्यंत कपात सुरू आहे. मात्र, त्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण सध्या तरी नाही. जीआर निघाल्यानंतरच हा संभ्रम दूर होईल,’’ अशी माहिती दुग्धविकास विभागाच्या सूत्रांनी दिली.   कपातीला न घाबरता निर्भेळ  मुद्दा महत्त्वाचा कमी ‘एसएनएफ’साठी एक रुपया कपात होत असल्यास बाऊ करण्याचे अजिबात कारण नाही. त्यामुळेच निर्भेळ दूध घालण्याची सवय लागणार आहे. दुधाची प्रत चांगली असल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जातो. शासनाच्या सुधारित धोरणामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी एकप्रकारे हमीभाव मिळाला आहे. त्यामुळे आता दर्जेदार दुधाचा पुरवठादेखील झाला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले.  १५ वर्षे शेतकऱ्यांना लुटले; आता बस करा  केंद्र सरकारने दुधाची गुणप्रत ३.२ फॅट व ८.३ ‘एसएनएफ’ अशी कायदेशीररीत्या घोषित केली आहे. तरीही शेतकऱ्यांना लुटण्यासाठी कमी ‘एसएनएफ’चा मुद्दा पुढे करून आमची लूट होते आहे. गेली १५ वर्षे आमची लूट झाली असून, आता लुटीचा धंदा बंद करावा. दर्जेदार दूध शेतकरी देत असून ८.३ ‘एसएनएफ’पर्यंत एक पैसासुद्धा आता कपात करू नये. अन्यथा, शेतकरी पुन्हा सरकारच्या विरोधात जातील, असे अहमदनगर कल्याणकारी दूध संघांचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com