राज्यातून मळी निर्यातीवर बंदी

molasses
molasses

लातूर : १८ लाख मेट्रिक टन तुटवडा भासणार असल्याने साखर कारखान्यांकडून होणाऱ्या मळी निर्यातीवर राज्याच्या गृह विभागाकडून बंदी घालण्यात आली. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ही बंदी राहणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती यामुळे या वर्षीच्या ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील बुहतांश कारखाने बंदच आहेत. त्यामुळे यावर्षी उसाचे गाळप अत्यंत कमी होणार आहे. त्याचा मळीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. या वर्षी राज्यात फक्त ५७० लाख मेट्रिक टनच उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. त्यापासून केवळ २२ लाख मेट्रिक टनच मळीचे उत्पादन होणार आहे. आसवनी प्रकल्प, पशुखाद्य, इथेनॉलला लागणारी मळी पाहता या वर्षी किमान १८ लाख मेट्रिक टन मळीचा तुटवडा जाणवणार आहे. हे लक्षात घेऊन आता शासनाने या वर्षी मळीची परराज्यात व परदेशात निर्यात करण्यावर बंदी घातली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलच्या दृष्टीने मळी हा महत्त्वाचा स्रोत आहे. मळीचा वापर प्रामुख्याने मद्यार्क तयार करण्यासाठी केला जात आहे. राज्यात २३१ साखर कारखाने कार्यान्वित आहेत. त्यापैकी १३४ साखर कारखान्यांना आसवनी प्रकल्प आहेत. त्या पैकी ९५ सहकारी क्षेत्रातील असून उर्वरित ३९ खासगी क्षेत्रातील कारखाने आहेत. तसेच १९ स्वतंत्र आसवनी प्रकल्प आहेत. ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प नाहीत असे साखर कारखाने अन्य आसवन्यांना मळीची विक्री करतात. ज्या साखर कारखान्यांनी आसवनी उभारल्या आहेत त्यांनी त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूकही केलेली आहे. या आसवनीत तयार होणाऱ्या मद्यार्काचा वापर राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि मद्य निर्मितीसाठी होत आहे. मद्यार्क वापराचे प्रमाण ६० ः ४० आहे. यातून शासनास मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे. मागील काही वर्षांतील राज्यातील मळीचे उत्पादन वार्षिक ३५ ते ४० लाख मेट्रिक टन आहे. त्या पैकी राज्यातील आसवनींना मद्यार्क उत्पादनासाठी ३२ लाख मेट्रिक टन मळीची आवश्यकता आहे. पशुखाद्यासाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन मळीचा वापर केला जात आहे. तसेच वाहनाच्या इंधनात दहा टक्के या प्रमाणात इथेनॉल मिसळण्याचे धोरण आहे. या करिता ‘बी हेवी मळी’ व ‘सी हेवी मळी’चा वापर केला जात आहे. यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील पूर आणि मराठवाड्यातील दुष्काळ पाहता २०१९-२० मध्ये ५७० मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. त्यापासून २२.२० मेट्रिक टन मळीचे उत्पादन होणार आहे. म्हणजे या वर्षी सुमारे १८ लाख मेट्रिक टन मळीचा तुटवडा भासणार आहे. परिणाम मद्यार्क उत्पादन कमी होणार आहे. तसेच मद्यार्काचा वापर देशी, विदेशी मद्य, इएनए तसेच इथेनॉल निर्मितीकरिता होत असल्याने तेथेही मद्यार्काचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शासनाने या वर्षी मळीची परराज्यात व परदेशात निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. राज्यातच सर्व मळीचा वापर केला जाणार आहे.

आकडे बोलतात...

  • राज्यात एकूण साखर कारखाने: २३१
  • आसवनी प्रकल्प असलेले साखर कारखाने: १३४
  • स्वतंत्र आसवनी प्रकल्प: १९
  • दरवर्षी होणारे मळीचे उत्पादन: ३५ ते ४० लाख टन
  • आसवनी प्रकल्पांना लागणारी मळी: ३२ लाख टन
  • पशुखाद्यासाठी लागणारी मळी: २.५ लाख टन
  • इतर राज्यात व परदेशात निर्यात केली जाणारी मळी: साडेतीन ते चार लाख टन
  • २०१९-२० मध्ये अपेक्षित ऊस गाळप: ५७० लाख मेट्रिक टन
  • संभाव्य मळीचे उत्पादन: २२.२० लाख टन
  • मळीचा भासणारा तुटवडा: १८ लाख टन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com