भारतात उत्पादित ड्रॅगन फ्रूटची लंडनमध्ये निर्यात

‘अपेडा’च्या माध्यमातून नुकतीच गुजरातमधून लंडन येथे, तर पश्‍चिम बंगालमधून किंगडम ऑफ बहरिन येथे मंगळवारी (ता. ३) प्रायोगिक तत्त्वावर निर्यात करण्यात आली आहे.
Export of Dragon Fruit produced in India to London
Export of Dragon Fruit produced in India to London

नाशिक : गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून ड्रॅगन फ्रूटच्या देशभरात लागवडी वाढल्या आहेत. औषधी गुणधर्मामुळे मागणी असल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल आहे. आता भारतात पिकणाऱ्या या फळाला लंडनचे मार्केट खुणावत आहे. ‘अपेडा’च्या माध्यमातून नुकतीच गुजरातमधून लंडन येथे, तर पश्‍चिम बंगालमधून किंगडम ऑफ बहरिन येथे मंगळवारी (ता. ३) प्रायोगिक तत्त्वावर निर्यात करण्यात आली आहे.

ड्रॅगन फ्रूट हे निवडुंग प्रकारातील वेल वनस्पतीचे फळ आहे. या फळाचे मूळ हे कटिबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील आहे. सध्या देशभरात ५ हजार हेक्टरवर लागवडी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर घेतले जाते. तर अलीकडे पश्‍चिम बंगालमध्ये लागवडी होऊ लागल्या आहेत. तर महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, नाशिकसह इतर जिल्ह्यांत लागवडी वाढत्या आहेत.  

बाहेरून लाल रंग आतून पांढरा गर तसेच बाहेरून लाल रंग आतून लाल गर या दोन प्रकारांत बाजारपेठेत हे फळ आढळून येते. मधुमेह, संधिवात आदींवर प्रभावी तर शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तंतुमय घटकांमुळे अन्नपचन शक्ती वाढवते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्धतेमुळे ग्राहकांकडून मागणी असल्याने त्यास चांगले दर मिळत आहेत. यापूर्वी मागणी असल्याने इतर उत्पादक देशांमधून आयात केली जात होती. मात्र आता देशात लागवड वाढल्याने बाजारपेठ त्यास मिळत आहे.

 निर्यातीसाठी ‘अपेडा’कडून प्रयत्न सुरू  गत जून महिन्यात देशातून पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील तडसर येथून दुबईमध्ये निर्यात करण्यात आली होती. निर्यातमूल्य मिळत असल्याने सध्या अपेडाच्या माध्यमातून निर्यातवाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे. त्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची उभारणी, गुणवत्ता विकास व बाजारपेठ विकास साधण्यात येत आहे. गुजरात सरकारने अलीकडेच या फळास ‘कमलम’ असे नामकरण केल्याने ‘अपेडा’कडून त्यानुसार प्रसिद्धी करण्यात येत आहे.

देशाच्या एकूण मागणीच्या तुलनेत ७ टक्के उत्पादन आहे. अद्याप ९३ टक्के त्यात तूट आहे. मात्र यानिमित्ताने बाजारपेठेचा एक स्रोत निर्माण झाला. त्या माध्यमातून नवी बाजारपेठ मिळाली आहे. ही बाब स्वागतार्ह आहे.  - आनंद पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन

अगोदर ड्रॅगन फ्रूटची इतर देशांमधून आयात केली जात होती. मात्र, आता आपल्या देशातच लागवडी वाढल्या आहेत. येथे उत्पादित फळास दरही चांगले मिळत आहे. मात्र, शेतकरी निर्यातीसाठीच प्रयत्न करीत आहेत. औषधी गुणधर्म असल्याने भारतात उत्पादित फळांच्या ब्रँडिंगवर भर देत आहोत.  - प्रशांत वाघमारे,  उपसरव्यवस्थापक, अपेडा, मुंबई विभागीय कार्यालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com