सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी प्रयत्न : अपेडा

युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी भाजीपाला निर्यात सध्या थांबली असली तरी मध्य आखाती देशांना मात्र सागरी मार्गाने शेतमाल निर्यात सुरू आहे.
marine export
marine export

पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी भाजीपाला निर्यात सध्या थांबली असली तरी मध्य आखाती देशांना मात्र सागरी मार्गाने शेतमाल निर्यात सुरू आहे. त्यासाठी अपेडा, जेएनपीटी व कृषी विभाग यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. शेतमालाची संपूर्ण व्हॅल्यू चेन सुरळीत करण्याचे प्रयत्न त्या अनुषंगाने केले जात आहेत.  त्यासाठी आवश्यक फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रही तात्काळ किंवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान सर्व निर्यातदारांसमवेत अपेडाची बोलणी सुरू असून केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाकडे त्यांच्या समस्या मांडून त्यावर उपाय शोधण्यात येत असल्याची माहिती अपेडाचे साहायक उप सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांनी अॅग्रोवनला दिली. 

श्री. वाघमारे म्हणाले, की सध्या विमानामार्गे शेतमाल निर्यात शक्य नसली तरी मध्य आखातात भाजीपाला व फळांची निर्यात सागरी मार्गाने सुरू आहे. त्यासाठी आवश्यक फायटो सॅनिटरी प्रमाणपत्रे देण्याची सेवाही अखंड सुरू आहे. जेएनपीटीचे दरवाजेही खुले आहेत. अर्थात निर्यात सुकर राहण्यात काही अडचणी देखील आहेत. क्रेन, यार्ड अशा विविध कारणांसाठी चालकांची उपलब्धता नाही. तरीही अपेडाकडून सर्वतोपरी मार्ग शोधले जात आहेत. समुद्रामार्गे मोठ्या व्हॉल्यूममधून तसेच जवळच्या देशांना माल पाठवणे शक्य होते. विमानामार्गे मात्र एक ते चार पाच टनांपर्यंत माल जाऊ शकतो. आमच्या माहितीनुसार सध्या दुबईसारखे देश लॉकडाऊनमध्ये आहेत. युरोपमध्ये मागणी असली तरी विमानसेवा बंद असल्याने आजच्या घडीला तरी आपण काही करू शकत नाही. सागरी मार्गाने तेथे माल पोचण्यास ३० दिवस तरी लागतात. 

निर्यातदारांसोबत बोलणी  वाघमारे म्हणाले की शेतमाल निर्यातीत वाहतूक व मनुष्यबळाची कमतरता या सध्याच्या घडीला मोठ्या समस्या आहेत. पॅकहाऊस क्षेत्रातही पुरेसे मनुष्यबळ सध्याच्या घडीला नाही. आम्ही निर्यातदारांशी बोलणी केली आहेत. त्यांच्या साऱ्या समस्या लक्षात घेऊन वाणिज्य मंत्रालयाकडे त्या मांडल्या आहेत. त्या दृष्टीने केंद्र सरकारच्या पातळीवर नोटीफिकेशन्स काढण्यात येत आहेत. दिल्ली येथे या विषयाच्या अनुषंगाने त्वरीत बैठकही होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 

ऑनलाईन फायटो प्रमाणपत्र देणार  दरम्यान कृषी विभागाच्या फलोत्पादन विभागाचे तांत्रिक व निर्यात सल्लागार गोविंद हांडे म्हणाले, की भारतातून सागरी मार्गाने यापूर्वी द्राक्षे घेऊन निघालेली जहाजे युरोपात पोचण्यापर्यंत आली आहेत. मात्र कुरियर सेवाही ठप्प झाल्याने तेथील आयातदार कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या फायटो सॅनिटरी प्रमाणपत्रे उपलब्ध होण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही सर्वतोपरी दक्षता घेतली आहे. निर्यातदारांनी आम्हाला त्याबाबत त्वरीत कळवल्यास भारतीय क्वारंटाईन विभागाकडून संबंधित देशातील क्वारंटाईन विभागाला ऑनलाईन फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याचीही आम्ही पूर्तता केली आहे. निर्यातीच्या अनुषंगाने सर्व विभाग एकमेकांच्या दररोच्या संपर्कात असून उदभवणाऱ्या संकटांवर त्यातून एकत्रपणे मार्ग शोधला जात आहे. 

सर्वाधिक फटका बसणार आंब्याला  श्री. हांडे म्हणाले, की द्राक्षांची सुमारे ३० टक्केच निर्यात आता होणे बाकी आहे. डाळिंबाचाही हंगाम बऱ्यापैकी आटोपला आहे. यंदा आपण ७० हजार टनांचा निर्यातीचा आकडा गाठला आहे. कोरोना संकटात सर्वात मोठा फटका बसणार आहे तो निर्यातक्षम आंब्याला. कारण त्याचा हंगाम नुकताच सुरू होणार आहे. सागरी मार्गाने आंबा पाठवण्याचे पध्दतशीर नियोजन केल्यास व आंतरराष्ट्रीय दर चांगले मिळाल्यास तो पर्यायही शक्य होऊ शकेल असे हांडे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com