शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
अॅग्रोमनी
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात वाढणार
जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच आहे. देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व मराठवाड्यातील कापसाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. दुसरीकडे जगातील प्रमुख आयातदारांकडून कापसाला उठाव सुरू झाला आहे.
जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच आहे. देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व मराठवाड्यातील कापसाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. दुसरीकडे जगातील प्रमुख आयातदारांकडून कापसाला उठाव सुरू झाला आहे. नोव्हेंबरमध्ये चीन आयात वाढविणार असून, चीन यंदा तब्बल १०० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आयात विविध देशांकडून करील, अशी घोषणाही झाली आहे. परिणामी कापूस बाजारात आश्वासक सुधारणा झाली आहे.
न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर महिनाभरापूर्वी ६२ सेंटपर्यंत होते. ते सध्या ६९ सेंट एवढे झाले आहेत. देशात खाद्यतेलासाठी सरकीची मागणी वाढली आहे. देशात कापसाचे उत्पादन ४०० लाख गाठींपर्यंत अपेक्षित होते. त्याबाबतचा अंदाज जून व जुलैमध्येही व्यक्त झाला होता. परंतु देशात कापूस उत्पादनात क्रमांक तीनवर असलेल्या तेलंगणात कापसाची मोठी हानी झाली आहे. तेलंगणात दरवर्षी ७० ते ७२ लाख गाठींचे उत्पादन घेतले जाते. तेथे हे उत्पादन १५ टक्क्यांनी घटणार आहे. तर गुजरातेत कापसाऐवजी भुईमूगाची लागवड वाढल्याने कापसाची लागवड १५ टक्के कमी झाली आहे. तसेच अतिपावसाचा फटका गुजरातलाही बसला आहे. तर कापूस लागवडीत देशात क्रमांक एक असलेल्या महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भ व मराठवाड्यात हे नुकसान अधिक झाल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या कापूस पीक समितीने व्यक्त केला आहे.
जागतिक स्थिती बदलली
जगातील कापसाचा साठा यंदा अधिक होता. परंतु चीनमध्ये कापसाचा मोठा वापर झाला आहे. तेथे सहा दशलक्ष टनांवर कापसाचा साठा (कॅरी फॉरवर्ड) होता. मास्कसाठी कापसाचा वापर चीनसह तुर्की, व्हिएतनाममध्ये वाढला आहे. देशातही मास्क उद्योग वाढला आहे. जगभरात मास्क उद्योगामुळे वस्त्रोगात १३ हजार कोटींच्या व्यवसायाची वाढ झाली आहे. शिवाय कापड उद्योगातही वृद्धी होणार आहे. कारण युरोप, अमेरिकेतील ब्रॅण्डेड कापड व्यवसाय गती घेत आहे. यामुळे चीनने अलीकडेच जगभरातून १०० लाख गाठींची आयात करण्याची घोषणा केली आहे. ही आयात चीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आदी देशांकडून करणार आहे. चीनमध्ये गेले दोन वर्षे भारतातून १२ लाख गाठींपेक्षा अधिक कापूस निर्यात झालेली नाही. पण यंदा चीनमध्ये किमान २० ते २५ लाख गाठींची निर्यात होईल. तसेच बांगलादेशात सुमारे ३५ ते ३७ लाख गाठींची निर्यात होईल. भारतातून यंदा कापूस निर्यात वाढणार आहे. सरत्या कापूस हंगामात देशातून सुमारे ४२ लाख गाठींची निर्यात विविध देशांमध्ये झाली. यंदा ही निर्यात वाढून सुमारे ७० लाख गाठींपर्यंत जाऊ शकते.
सीसीआयच्या गाठींच्या दरातही वाढ
देशात कापसाचा साठा सुमारे एक कोटी सात लाख गाठी एवढा आहे. सीसीआयकडे हा साठा अधिक आहे. कारण सीसीआयने कापसाची खरेदी अधिक केली होती. सीसीआयने सुमारे ५० लाख गाठींची विक्री केली आहे. सीसीआयच्या गाठींचे दर जून, जुलैमध्ये ३६ हजार रुपये खंडी (३५६ किलो रुई) एवढे होते. परंतु सध्या बाजारातील मागणी वाढत असल्याचे लक्षात घेता सीसीआयने खंडीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ केली आहे. बाजारात सुधारणा होत असल्याने कापसाचे दरही खुल्या बाजारात किंवा देशांतर्गत बाजारात वधारू लागले आहेत. येत्या दोन ते अडीच महिन्यात दरात आणखी सुधारणा होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
कापसाच्या दरात सुधारणा गेल्या एक ते दीड महिन्यात झाली आहे. जानेवारीत दरवाढ आणखी होईल. जगभरात कापसाचे मोठे नुकसान नैसर्गिक आपत्तीने झाले आहे. प्रमुख कापूस उत्पादक व निर्यातदार असलेल्या अमेरिकेत २५५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु वादळामुळे तेथे कापूस हंगाम लांबला आहे. तेथे २० टक्के कापसाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
— अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)
- 1 of 29
- ››