गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा दर्जा फुलशेतीला मिळू लागला आहे.
अॅग्रोमनी
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम
यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना शिल्लक साखरेची समस्या कारखानदारांना भेडसावू लागली आहे. हंगाम सुरू झाल्यापासून केंद्राने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ३९ लाख टनांचे स्थानिक विक्री कोटे दिले आहेत.
कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना शिल्लक साखरेची समस्या कारखानदारांना भेडसावू लागली आहे. हंगाम सुरू झाल्यापासून केंद्राने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ३९ लाख टनांचे स्थानिक विक्री कोटे दिले आहेत. या पैकी ३० लाख टनांपर्यंतची साखर विकली गेली. प्रत्येक महिन्यात कोट्याइतकी साखर विक्रीही होत नसल्याने कारखानदार अस्वस्थ आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा समारंभावर लोकांच्या संख्येची मर्यादा आणली गेल्याने अपेक्षित मागणी येत नसल्याची स्थिती आहे. यामुळे उन्हाळ्यातही हवी तेवढी मागणी येत नसल्याने साखर विक्रीची समस्या सध्या तरी कायमच राहण्याची शक्यता उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.
यंदा राज्यातील हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे. नगर, पुण्यातील काही कारखाने वगळता एप्रिलच्या मध्यापर्यंत चालेल अशी शक्यता आहे. यंदा उत्पादित साखरेचा अंदाज १२० लाख टनांपर्यंतचा होता. यातील दहा लाख टन साखरेपासून इथेनॉलनिर्मिती प्रक्रिया सुरू असल्याने ११० लाख टनांपर्यंत साखर उत्पादित होइल असा अंदाज आहे.
२२ मार्च अखेर ९७.५६ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. राज्यात यंदा हंगाम सुरू होण्यावेळी ४६ लाख टन साखर शिल्लक होती. त्यात आतापर्यंत ९७ लाख टनांची भर पडली आहे. म्हणजे यंदा जवळ १४४ लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. यापैकी केवळ ३० लाख टनांपर्यंतची देशांतर्गत बाजारात साखर विकली गेली आहे. आठ लाख टनांपर्यंतच्या साखरेची निर्यात झाली आहे.
निर्यात योजनेअंतर्गत राज्याला १८ लाख टनांचा कोटा आला आहे. विशेष म्हणजे कोट्याइतके निर्यात करार झाले आहेत. पण कंटेनर व जहाजांची उपलब्धता वेळेत होत नसल्याने साखरेची निर्यात कूर्मगतीने होत आहे. यामुळे साखरेचा साठा जलद गतीने रिकामा होत नसल्याचे चित्र साखर उद्योगाचे आहे.
फेब्रुवारी, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात साखर विक्री होत असते. शीतपेये व समारंभामुळे मिठाई उद्योगातून मोठी चांगली मागणी असते. यंदा उन्हाळा सुरू व्हायला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला एकच गाठ पडली. यामुळे साखर उद्योगावर पुन्हा निराशा दाटून आली. पूर्ण लॉकडाउन नसले तरी साखरेची मागणी असणाऱ्या उद्योगांनी सावधगिरीने साखरेची खरेदी करायला सुरू केली यामुळे अपेक्षित विक्री होत नसल्याचे साखर कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
राज्यातील साखरेची स्थिती (लाख टन)
हंगाम सुरू होण्यापूर्वीचा साठा ः ४६.७१
२२ मार्च अखेरचे उत्पादन ः ९७. ५६
स्थानिक विक्रीचा कोटा ः ३९
झालेली विक्री ः ३०
शिल्लक साखर ः १००
निर्यातीची स्थिती
महाराष्ट्राचा निर्यातकोटा ः १८.६९ लाख टन
निर्यात करार ः १८.६९ लाख टन
प्रत्यक्षात निर्यात ः ८ लाख टन
दररोज निर्यात ः ५ हजार टन
- 1 of 32
- ››