खानदेशात सर्वदूर पाऊस

खानदेशात सर्वदूर पाऊस
खानदेशात सर्वदूर पाऊस

जळगाव ः खानदेशात शुक्रवारी (ता. २६) रात्री व मध्यरात्रीनंतर सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जामनेर, सातपुडा पर्वतातील काही भागांत अतिवृष्टी म्हणजेच सलग ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.  सातपुडा पर्वत भागातील लहान नाल्यांना चांगले प्रवाही पाणी आले आहे. गिरणा, अंजनी या नद्यांना मात्र पूर आलेला नाही. शनिवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वच तालुक्‍यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. काही भागात पावसाचे प्रमाण कमी तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. मोठे नुकसान कुठेही झालेले नसल्याची माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात जामनेरात शनिवारी सकाळपर्यंत ४५ मिलिमीटर, पाचोऱ्यात ३०, एरंडोलात २९, चाळीसगावात २९, भडगावात ३०, जळगावात ३०, चोपड्यात ४०, यावलमध्ये ४०, रावेरात ४६, बोदवडमध्ये २९, मुक्ताईनगरात २८ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्‍यात ६३, धडगावात ६४, नंदुरबारात ४०, शहादा येथे २९, तळोद्यात ४० मिलिमीटर पाऊस झाला.  धुळे जिल्ह्यातील धुळ्यात सुमारे २८ मिलिमीटर, शिंदखेडामध्ये ३०, साक्रीत ३५ मिलिमीटर तर शिरपुरातही २५ मिलिमीटर पाऊस झाला. धडगाव, अक्कलकुवामधील सातपुडा पर्वताच्या भागात अतिवृष्टी झाली. या भागातील नद्यांना पूर आला आहे. जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतातून येणाऱ्या काही नाल्यांना चांगले प्रवाही पाणी आले. तर मनुदेवी (ता. यावल) येथील धबधबा खळाळू लागला आहे. पाटणादेवी (ता.चाळीसगाव) येथील अरण्यातही नाल्यांना प्रवाही पाणी आले. वाघूर नदीच्या क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने या भागात शेतकरी सुखावला आहे. गिरणा नदीच्या उगमक्षेत्रात मात्र पावसाचा हवा तसा जोर नसल्याने या नदीला पूर किंवा प्रवाही पाणी आलेले नाही. अंजनी, मोर नदीलाही पूर आलेला नसल्याची माहिती मिळाली. रावेरातील सुकी नदीला प्रवाही पाणी आले आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ३५ टक्के पाऊस झाला आहे. गुरुवारपर्यंत सरासरीच्या ३० टक्‍क्‍यांपर्यंतच पाऊस झाला होता. पावसाची टक्केवारी वाढत असतानाच पिकांनाही या लाभ होणार आहे. पावसाचा जोर काही भागात कमी होता, परंतु मध्यम पाऊस सतत दोन ते अडीच तास झाल्याने जमिनीतील ओलावा वाढला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com