वऱ्हाडात सर्वदूर पाऊस

वऱ्हाडात सर्वदूर पाऊस
वऱ्हाडात सर्वदूर पाऊस

अकोला  ः वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांत बुधवार (ता. ७) रात्री पासून पाऊस सक्रिय झाला आहे. संततधार पावसामुळे ठिकठिकाणी नदीनाल्यांना पूर यायला सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने सातपुड्यात पावसाचा जोर अधिक असल्याने अकोट, तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद या भागांतील नदी-नाले जोराने वाहत आहेत. या भागातील प्रकल्पांमध्ये वेगाने साठा वाढत चालला आहे. अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील वान प्रकल्पात २४ तासांत झपाट्याने पाणीपातळी वाढत असून, साठा ४०६ मीटर झाला आहे. प्रकल्पात एकूण ७० टक्के साठा झाला असून, आणखी पाच टक्के साठा वाढल्यास धरणाच्या गेटमधून पाणी सोडण्यात येईल, अशी सूचना या भागात यंत्रणेकडून देण्यात आली आहे.   गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ५९.८ मिलिमीटर पाऊस अकोटमध्ये नोंदविण्यात आला आहे. याशिवाय अकोला २६.९,  बार्शिटाकळी २०.८, तेल्हारा ३९, बाळापूर १५, पातूर १६, मूर्तिजापूर ३५. १ मिलिमीटर पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात कारंजामध्ये १८.८९, वाशीम १७, मालेगाव १४,  रिसोड १५, मंगरुळपीर ९.६, मानोरा ८.८० असा पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस नोंदविण्यात आला. यात मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ५२.६ मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय संग्रामपूर  ४६.६, बुलडाणा ३२.१, चिखली २६.८, लोणार १२.५, मेहकर १५.९, खामगाव ११.८,शेगाव २७, मोताळा २३.१ नोंद झाली. या पावसामुळे पहिल्यांदा पाणी शेताबाहेर निघायला सुरुवात झाली आहे.  सातपुड्यात पावसाचा सर्वाधिक जोर गेल्या २४ तासांत पडत असलेल्या पावसाचा जोर सातपुडा पर्वतरांगांमध्ये अधिक आहे. यामुळे सातपुड्यातून उगम पावणाऱ्या सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अकोट तालुक्यात ठिकठिकाणी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक विस्कळित झाली. संग्रामपूर तालुक्यातही नदीनाले ओसंडून वाहत आहेत. अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणातील साठा दुपारी १२ वाजेपर्यंत ४०६ मीटर म्हणजे सरासरीच्या ७० टक्के झाला होता. आणखी ५ टक्के पाणी वाढल्यानंतर गेट उघडण्याचा इशारा या प्रकल्पाच्या काठावरील गावांना देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com