दीड लाख शेतकऱ्यांना २७ वर्षांत शस्त्रक्रियेमुळे मिळाली दृष्टी 

स्वतः खर्च करून शिबिर घेत असलो तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होत असल्याचे समाधान मिळते. त्यामुळे हा उपक्रम कायम सुरू ठेवणार आहे. २७ वर्षांपुर्वी सुरू केलेल्या या शिबिरात सर्वप्रथम आईच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या सेवेची प्रेरणा घेतली. - जालिंदर बोरुडे, अध्यक्ष, फिनिक्‍स फाउंडेशन, नागरदेवळे, जि. नगर
शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसमवेत जालिंदर बोरुडे
शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसमवेत जालिंदर बोरुडे

नगर ः ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी कामगारांना नेत्र उपचार मिळावेत, यासाठी सुरू केलेल्या मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिराने आता तेराशे सत्तरचा टप्पा ओलांडला आहे. या शिबिरातून २७ वर्षांत आतापर्यत १ लाख ७३ हजार शस्त्रक्रिया झाल्या. त्यात तब्बल दीड लाख शेतकऱ्यांना दृष्टी मिळाली आहे. फिनिक्‍स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या प्रयत्नातून दरमहा हे शिबिर घेतले जात आहेत. शिबिरातून आतापर्यंत साडेसहा लाख रुग्णांची मोफत तपासणी केली आहे. त्यात साडेचार लाखांवर शेतकरी आहेत. 

नगरमधील जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले जालिंदर बोरुडे नोकरी सांभाळून सामाजिक कार्य करीत आहेत. १९९१ मध्ये त्यांनी फिनिक्‍स फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. नागरदेवळे येथे पुण्यातील के. के. आय बुधराणी रुग्णालयाच्या सहकार्याने दर महिन्याला मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर ते घेतात. शिबिरासाठी बोरुडे स्वतः खर्च करतात. २७ वर्षांत सुमारे साडेसहा लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे. गेल्या वर्षभरात बीड, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, परभणी, उस्मानाबाद भागांतून रुग्ण तपासणीसाठी आले. आयुर्वेद पंचकर्म तसेच हृदयरोग, दंततपासणी, हिमोग्लोबिन आदी तपासण्यांसाठीही शिबिरे घेतली जात आहेत. तपासणी झालेल्या रुग्णांवर पुण्यात शस्त्रक्रिया केली जाते. प्रवासासह जेवणाची व राहण्याची ते सोय करतात. आतापर्यंत बोरुडे यांनी सरकारी अथवा खासगी एकही रुपयाचे अनुदान घेतले नाही. दर महिन्याला ते स्वतः पगारातून दहा हजार रुपये खर्च करतात. या वर्षी नगर, श्रीगोंदा भागांत बोरुडे यांनी पाच वेळा जनावरांच्या छावण्यांमध्येही नेत्रतपासणी शिबिरे घेतली आहेत. 

६३ हजार जणांचा नेत्रदानाचा संकल्प  फिनिक्‍स फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिराबरोबर नेत्रदान करण्याबाबत बोरुडे जनजागृती करीत आहेत. त्यांनी शिबिरातून आतापर्यंत ६३ हजार लोकांकडून नेत्रदानासाठी अर्ज भरून घेतले आहेत. ते अर्ज जिल्हा रुग्णालय व बुधराणी रुग्णालयात जमा केले आहेत. आतापर्यत ३८० लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झालेले आहे. त्यातून ६७० लोकांना नेत्ररोपणातून नवी दृष्टी मिळाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com