agriculture news in Marathi, eyes on only tankers, Maharashtra | Agrowon

गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरा
सुर्यकांत नेटके
बुधवार, 22 मे 2019

लोक आतापर्यंत १९७२ चा दुष्काळ म्हणत होते. आता त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. जनावरांसाठी छावण्या झाल्या. मात्र, शेळ्या-मेंढ्याचा विचार केला नाही. एकीकडे शेळी पालनासाठी मदत केली जात असताना दुष्काळात मात्र शेळी-मेंढीपालकांना वाऱ्यावर सोडले.
- कानीनाथ अनभुले, घुमरी, ता. कर्जत 

नगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आधोडी, राणेगाव असो नाही तर पाथर्डीच्या करोडी, मोहटा, टाकळी, पिंपळगाव, चिंचपुरचा परिसर असो सगळीकडे सारखेच चित्र आहे. या भागातील लोक बोलते होताना दुष्काळाची दाहकता सांगत होते. 

नगर जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माहितीनुसार, अकरा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ आहे. मात्र, ज्या तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. त्या भागातही दुष्काळाची दाहकता गंभीर आहे. नगर शहराला लागून असलेला भिंगारचा परिसर सोडला की, दुष्काळाची तीव्रता जाणवायला सुरवात होते.

शेवगाव, पाथर्डीच्या दिशेने जाताना नगर तालुक्‍यातील बाराबाभळी, कागदोपत्री बीड जिल्ह्यामध्ये असलेली मराठवाडी, पाथर्डी तालुक्‍यातील करंजी, देवराई, तीसगाव, कासार पिंपळगाव, पुढे शेवगावमधील आमरापूर, शेवगाव, राक्षी, चापडगाव, बोधेगाव शिवार. सुमारे शंभर किलोमीटरचा परिसर. एखाद्या ठिकाणी गुंठा-दोन गुंठे हिरवं सोडलं तर सताड, मोकळी रानं. जागोजागी करपलेल्या डाळिंब, संत्रा, मोसंबीच्या बागा नजरेस पडतात. शेवगावांहून बोधेगावाला जाताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या पाणी योजनेचे व्‍हाॅल्व्‍हमधून गळणारे पाणीच वन्य जीवांसह अनेक वाटसरूंचा आधार बनलेले. 

बोधेगावापासून दक्षिणेला डोंगरात आधोडी, शोभानगर, राणेगाव, शिंगोरी, दिवटे ही गाव. या गावांना टॅंकरने पाणी. सात- आठ दिवसाला एकदा टॅंकर येतो. लोक टाक्‍या भरून ठेवतात. तेच पाणी पिण्यासाठी, घरी असलेल्या जनावरांसाठी वापरतात. पाथर्डी शहरापासून पूर्वेला असलेल्या मोहटा, करोडी, टाकळी, पिंपळगाव, चिंचपूर भागांतही परिस्थिीतीही यापेक्षा वेगळी नाही. जनावरे छावणीला गेल्यामुळे बहुतांश गावांत दावणी ओस दिसत होत्या. शेकटे, गोळेगाव रस्त्यावर कोसोदूर पाहिल्यावर फक्त रखरखणारे शेतंच दिसत होती. विशेष म्हणजे हा भाग जायकवाडी धरणापासून काही किलोमीटर आंतरावर आहे. या भागात अशी परिस्थिती पहिल्यांदाच झाली असल्याचे दत्तात्रय घोरतळे यांनी सांगितले. 

उत्तरेतही दुष्काळाचे चटके 
भंडारदरा, मुळा, निळवंडे आणि नाशिक जिल्ह्यांमधील काही धरणांचे लाभार्थी असलेल्या उत्तरेतील तालुक्‍यातही यंदा गंभीर दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर तालुक्‍यांच्या पठार भागासह सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या अकोल्यातही यंदा स्थिती गंभीर आहे. पठार भागात दरवर्षी मोठ्याप्रमाणात शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळणारे मेंढपाळ आहेत. दिवसभर चारा पाण्याच्या शोधार्थ फिरणारी मेंढपाळ कुटुंबे सध्याच्या दुष्काळाच्या चटक्‍यांनी त्रस्त झाली आहेत. हिरवा चारा औषधालाही सापडत नसल्याने, वाळलेल्या गवत काडीच्या शोधार्थ रानमाळ तुडविणारी जनावरे सर्वत्र दिसतात. पावसानंतर चाऱ्याच्या मोबदल्यात शेतात शेळ्या मेंढ्यांचा मुक्काम असल्याने, शेताला उत्तम प्रतीचे नैसर्गिक खत मिळते. या वेळी मात्र चाराच नसल्याने, दिशाहिन भटकंती सुरू आहे. 

छावण्यांनी दिला आधार 
नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच दुष्काळी भागातील जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात तालुक्‍यांत ५१० छावण्या मंजूर झालेल्या आहेत. त्यातील ५०१ प्रत्यक्षात छावण्या सुरू असून, त्यात ३ लाख २० हजार जनावरे आहेत. बोधेगाव (ता. शेवगाव) पासून साधारण आठ-दहा किलमीटरवर शोभानगर गावाजवळील जनावरांच्या छावणीला कडक्‍याच्या उन्हात भेट दिली. जनावरांना चारा-पाणी करून निवांत गप्पात रंगलेले शिवाजी भोटभरे, सुनील कणसे, अशोक विष्णू जावळे, एकनाथ पोटभरे यांच्यासह काही शेतकरी भेटले. चारा, पाणी, खुराक भेटते का? असे विचारल्यावर शेतकरी एका वाक्‍यात बोलले, ‘‘वाटपात कमी जास्त होत असतं; पण साहेब इथंच नाही, साऱ्या जिल्ह्यात, दुष्काळी भागांत छावण्या सुरू झाल्या म्हणून तर जित्राबं जगली, नाही तर मातीमोल दरातही कोणी घेतली नसती. छावण्यांनी खरा आधार दिला. गावांत आठ दिवसाला टॅंकर येतो, पण छावणीत रोज पाणी मिळतं. छावणी सुरू झाल्यापासून आमचा मुक्काम इथं आहे.''

मशागती रखडल्या 
‘‘गेल्यावर्षी रब्बी नाही, खरीपही नाही. शेतं राहिली नावाला. रुपयाचाच फायदा झाला नाही. आता पावसाळा तोंडावर आलाय, दरवर्षी साधारण एप्रिलमध्येच नांगरट, मोघडणी, पाळी घालायची लगबग सुरू असते. यंदा मात्र दुष्काळी भागात अजूनही शेती मशागती होताना दिसत नाही. केवळ आर्थिक स्थिती खालावल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागती केल्या नसल्याचे शेवगाव, पाथर्डी भागांत दिसून आले. पीकविमा भरला मात्र अजून पीकविमा मिळालेला नाही. दुष्काळी मदतही पुरेशी मिळालेली नाही. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावरच सोडलं,’’ भावना पाथर्डीच्या नवनाथ आव्हाड, भालगावच्या हरितात्या खेडकर यांनी व्यक्त केली. 

 बाजारपेठावर परिणाम 
शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेर भागांतील बाजारपेठा शेतीवर अवलंबून आहेत. यंदा दुष्काळामुळे डिसेंबर- जानेवारीपासूनच बाजारपेठांवर परिणाम झालेला दिसत आहेत. बहुतांश व्यवहार कमी झाले असून लग्नसराईचा काळ असूनही शेवगावच्या बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेरच्या बाजारपेठातही फारशी अवस्था वेगळी नाही. नगर शहरातही दुष्काळाचे परिणाम जाणवत आहेत. "लोकांजवळ पैसेच नाहीत तर खर्च कशाचा करणार? असा प्रश्‍न निवडूंगे (ता. पाथर्डी) येथील सत्यवान बर्डे यांनी उपस्थित केला.

उन्हाळी सुटीतही गावी नाही 
कर्जत, पारनेर, जामखेड, पाथर्डी, शेवगाव भागांत तसा सातत्याने दुष्काळ पडतोय. त्यामुळे या भागातील तरुण पोरं आता पुण्या, मुंबईला रोजगार शोधू लागले. अनेक कुटुंबे शहरात स्थायीक झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत लेकरांबाळासह कुटुंबे गावी येतात. यंदा मात्र गावांत पाणी नाही, दुष्काळ आणि उन्हाचा जोराचा कडाका असल्याने गावची शहरात गेलेली माणसं गावात आलीच नाहीत. दुष्काळाने या वर्षी जनावरे छावणीत गेली. घरातील एक माणूस कायमस्वरूपी तेथे असतो. पाणी नसल्याने लेक, सून, जावई आणि नातवंडेही या वर्षी सुटीत गावी आले नाहीत. जिवाची माणसे भेटत नाही, याचे दुःख वाटते असे केळवंडी (ता. पाथर्डी) येथील साखरबाई आठरे यांनी सांगितले. गावाकडे सुटीत येण्याचा बेत असतोच. पिण्याचे पाणी नाही. उन्हाच्या झळाही जास्तच आहेत. त्यामुळे गावाकडे यावे की नाही, अशी द्विधा मनःस्थिती आहे. गावाकडच्या माणसाच्या प्रेमाने मन ओढ घेतेच; मात्र दुष्काळाने व उकाड्याने गावी येता येत नाही, ही सल मनात आहे असे प्रा. उमाशंकर देवढे म्हणाले. 

प्रतिक्रिया 
दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीत काहीच नाही, अनेक वर्षांपासून जपलेल्या बागा वाया जात आहेत. सरकारने मात्र गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. पैसे खर्चून बाग जगवली. आता जरा अवघड बाब झालीय.
- भुजंग बोडखे, शेतकरी, शिंगोरी, ता. शेवगाव, 

 

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...