ऊस टंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील कारखाने अडचणीत

Factories are suffering due to sugarcane shortage in Pune district
Factories are suffering due to sugarcane shortage in Pune district

पुणे : गेल्या वर्षीचा कमी पाऊस, उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि जनावरांकरिता वापरलेला ऊस, यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत, नसल्याची स्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने ऊस टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत, अशी माहिती मिळाली.

चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. गाळपाची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी १२०.८२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. चालू वर्षी उसाच्या टंचाईमुळे ते सुमारे ८२ लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३५ लाख ८२ हजार मेट्रिक टनाने गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. 

पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. काही ठिकाणचा ऊस गाळपायोग्य नाही. पावसामुळे नवीन ऊस लागवडी फार झालेल्या नसल्याने त्याचा विपरीत परिणाम क्षेत्र घटण्यावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती, दौड, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात ऊस क्षेत्रात घट झाली आहे. याचा फटका कारखान्यांना बसू लागला आहे.

जिल्ह्यात साखर पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामती, दौड, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव  तालुक्यातील साखर कारखान्यांना गेटकेन ऊस घेतल्याशिवाय त्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी थोड्याफार फरकाने अशी स्थिती असते. परंतु, यंदा यांचे प्रमाण अधिक असणार आहे. यामुळे चालू वर्षी उसासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार, हे गृहीत धरून कारखान्यांनी दर जाहीर करण्याकरिता अद्यापही हात आखाडता घेतला  आहे. 

जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. यामध्ये सहकारी १२ तर ६ खासगी साखर कारखाने आहेत. त्यापैकी १५ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. यामध्ये खासगी साखर कारखान्यांकडून चांगले दर जाहीर करून गळीत हंगामासाठी अधिक ऊस मिळवू लागले आहेत. ही भीती सहकारी साखर कारखान्यांना सतावत आहे. गळीत हंगाम सुरू झाल्याने साखर आयुक्तांनी वेळापत्रकाप्रमाणे काउंटडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाबरोबर गेटकेन उसाबाबतही स्पर्धा सुरू झाली आहे. 

२४ लाख मेट्रिक टनांवर गाळप 

जिल्ह्यात सुरू झालेल्या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ८० हजार ७५० मेट्रिक टन एवढी आहे. या कारखान्यांनी आत्तापर्यंत २४ लाख ८५ हजार ५०४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले.  २४ लाख २९ हजार ४४० क्विटंल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा सरासरी ९.७७ टक्के एवढा आहे.

दृष्टिक्षेपात

कारखानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

सोमेश्वर १०,७७२, माळेगाव १३,९२४, छत्रपती ११,५३५, भिमा पाटस ८०००, विघ्नहर ९८५०, इंदापूर १०,९४०, राजगड २६८१, संत तुकाराम ७२१४, घोडगंगा ६७७७, भिमाशंकर ७३७३, निरा भिमा ४७१४, श्रीनाथ म्हस्कोबा ८५२५, अनुराज शुगर्स ४१९६, बारामती अॅग्रो १०,९०६, दड शुगर ६५६८, व्यंकटेशकृपा शुगर ८४५५, पराग शुगर ५४७५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com