कारखान्यांनी साखर निर्यातीवर भर द्यावा : साखर महासंघ

sugar export
sugar export

पुणे : साखर बाजारातील मागणी व पुरवठ्यात ६१ लाख टनांची कमतरता असल्याने यंदा दर चढे राहू शकतात. साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सद्य:स्थिती अनुकूल असली तरी कारखान्यांनी साखर निर्यातीवर भर द्यावा, असा सल्ला साखर महासंघाने कारखान्यांना दिला. ‘व्हीएसआय’च्या वार्षिक सभेसाठी मांजरी (जि. पुणे) येथे जमलेल्या साखर कारखानदारांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने काही मुद्दांवर उपाय सुचविले. व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी अभ्यासपूर्ण माहिती देत, “यंदा अनेक समस्या असल्या तरी हंगाम आशादायक आहे. कारखानदारांनी अजिबात नाउमेद होऊ नये,” असाही सल्ला दिला. “साखर बाजार सध्या चांगले आहेत. केंद्रीय धोरणे, निर्यात, विदेशी बाजार, कमी ओपनिंग स्टॉक हे मुद्दे अनुकूल आहेत. मात्र, साखर निर्यात वाढवायला हवी.  केंद्रासोबत अलीकडेच झालेल्या बैठकीत काही समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. साखरेचा किमान विक्री दर २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करताना घसारा विचारात घेतलेला नाही. घसारा विचारात घेता ३३०० रुपये दर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,” असे ते म्हणाले. राज्यात अजून १०० कोटी एफआरपी देणे बाकी आहे. एफआरपी देण्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असला तरी शिल्लक साखरेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे निर्यात नियोजन चांगले करावे लागेल. महाराष्ट्रात सुरुवातीचा स्टॉक ५५ लाख टनाचा होता. यंदा १३ लाख टनाचा राहू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.  एफआरपी देताना सध्या ऊस दर नियंत्रण आदेशात विसंगती आहे. नियमानुसार १४ दिवसांत एफआरपी देण्यासाठी कर्ज काढून व्याज भरून ही कसरत करावी लागते. त्यामुळे ही विसंगती दूर करण्याबाबत केंद्राला विनंती केली गेली आहे. कारखान्यांच्या पेट्रोल पंपावरच थेट इथेनॉल मिश्रणासाठी मान्यता देण्याची देखील मागणी केली आहे. याशिवाय थकीत निर्यात अनुदान, बफर स्टॉक अनुदान मिळावे, साखरेचे दर ठरवताना एस, एम, एल या ग्रेडला वेगवेगळे दर मिळावे, अशी मागणी केंद्राकडे केली गेली आहे.  देशात गेल्या हंगामात ५०० कारखाने सुरू होते. यंदा ४१९ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत उतारा १०.२४ टक्के मिळत होता; सध्या तो ९.३१ टक्के मिळतो आहे. साखर दर वाढत असले तरी दर एकदम ३३०० किंवा ३४०० होणार नाहीत. मात्र, ३२५० रुपयांपर्यंत दर जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  महासंघाने मांडलेले मुद्दे

  •   अनेक समस्या असल्या तरी हंगाम आशादायक
  •   केंद्रीय धोरणे, निर्यात, विदेशी बाजार, कमी ओपनिंग स्टॉक हे मुद्दे अनुकूल
  •   घसारा विचारात घेता ३३०० रुपये दर करण्यासाठी पाठपुरावा
  •   राज्यात अजून १०० कोटी एफआरपी देणे बाकी
  •   महाराष्ट्रात यंदा सुरुवातीचा स्टॉक १३ लाख टन राहू शकतो
  •   एफआरपी देण्याबाबत ऊस दर नियंत्रण आदेशात विसंगती
  •   कारखान्यांच्या पेट्रोल पंपावरच थेट इथेनॉल मिश्रणाच्या मान्यतेची मागणी
  •   साखरेचे दर ठरवताना एस, एम, एल या ग्रेडला वेगवेगळे दर मिळावे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com