कारखान्यांनी एकरकमीच एफआरपी द्यावी ः राजू शेट्टी

Factories should provide a single FRP ः Raju shetty
Factories should provide a single FRP ः Raju shetty

सातारा : कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील कारखान्यांनी या वर्षीच्या गाळप केलेल्या उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. मग, साताऱ्यातील कारखान्यांना देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्‍न करून एकरकमी एफआरपी जाहीर करा, अन्यथा कोल्हापूर, सांगली व पुण्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते साताऱ्यात घुसवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता. ५) दिला.

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध आणि सरसकट संपूर्ण कर्जमाफीसाठी येत्या आठ जानेवारीला होणारा देशव्यापी बंद यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

येथील हॉटेल कल्याणमध्ये आयोजित स्वाभिमानी संघटना कर्जमुक्ती पदाधिकारी मेळाव्यात श्री. शेट्टी बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, ‘‘देशातील २६५ शेतकरी संघटना एकत्र येऊन दिल्लीत कार्यकारी समितीची बैठक झाली. यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करून सरसकट सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी आठ जानेवारीला देशव्यापी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याऐवजी नागपूर अधिवेशनात गडबडीत कर्जमाफी जाहीर केली. पण, त्याचा कोणाला लाभ झाला. शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी अपवादानाचे यामध्ये पात्र ठरला आहे.’’ 

या वेळी राजू शेळके, संदीप मांडवे, तानाजीराव देशमुख, सूर्यभान जाधव, संभाजी घोरपडे यांची भाषणे झाली.

सरसकट कर्जमाफी द्यावी ः शेट्टी सध्या नैसर्गिक आपत्तीचे हे वर्ष असून दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा संकटांना सामोरे जावे लागले आहे. यातून खरीप पीक वाया गेले आहे. मुळात खरिपाची मुदत जून २०२० ला संपणार आहे. त्यामुळे शेतकरी कर्ज भरणार कसे? कर्जमुक्तीची घोषणा गेल्या वर्षीच्या थकीत कर्जाला लागू आहे. त्यामुळे शासनाने थकीत शब्द वगळून सरसकट ३० सप्टेंबरपर्यंतच्या पीककर्जाला माफी द्यावी, अशी मागणी या वेळी राजू शेट्टी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com