ऊसतोडणी कामगारांवरील ‘फडकरी’ माहितीपटाचा आंतरराष्ट्रीय ठसा

डाॅक्यूमेंट्री
डाॅक्यूमेंट्री

पुणे ः शिक्षणानिमित्त दररोज इचलकरंजीहून कोल्हापूरला जाताना वाटेतील गाव शिवारात ऊस तोडणीची गडबड पाहायचो. एका लईत सुरू असलेली तोडणी तर दुसऱ्या बाजूला बैलगाडी, ट्रॅक्टरमध्ये मोळ्या भरण्याची गडबड. शेताबाहेर बैलगाडी ओढताना फेसाटलेली बैलजोडी अन शेतातील झाडाखाली खेळणारी लहान मुले हे दररोजचे दृष्य माझी उत्सुकता वाढवत होते. यातूनच मी ऊस तोडणी कामगाराचा दिनक्रम चित्रित करण्याचे ठरविले अन त्यातून ‘फडकरी’ या साडे सहा मिनिटांच्या ‘ऑब्झर्व्हेशनल डॉक्युमेंटरी’ची निर्मिती झाली आणि आज फडकरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली आहे... इचलकरंजीतील प्रत्युष प्रसाद कुलकर्णी या माहितीपटामागचा प्रवास सांगत होता. याबाबत प्रत्युष म्हणाला की, “माझी स्वतःची शेती नाही. परंतु, फडकऱ्यांच्या दैनंदिनीवर डॉक्युमेंटरी (लघु माहितीपट) करायचे ठरविल्यावर मी इचलकरंजीजवळील रूई गावातील हृषीकेश पाटील यांच्या शेतीवर सुरू असलेला ऊस तोडीचा फड गाठला. शेतकरी, ऊस टोळीचा मुदाकम, ऊस वाहतूकदार आणि फडकरी कुटुंबाबरोबरीने चर्चा करत फडकऱ्यांचा दिनक्रम समजाऊन घेतला. अगदी सकाळपासून ते संध्याकाळी उसाच्या मोळ्या बैलगाडी, ट्रॅक्टरमध्ये भरेपर्यंतचा दिनक्रम यामध्ये मांडला आहे. मराठवाड्यातून पिढ्यान पिढ्या ऊस तोडणीसाठी येणाऱ्या टोळ्यांचे आयुष्यही या दिनक्रमासारखे सरळ, पुनरूक्त आहे. आजही या फडकऱ्यांच्या मुलांचे खेळणे हे ऊस तोडणीचा कोयताच आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे मुद्दामून हा माहितीपट ब्लॅक ॲन्ड व्हाईटमध्येच तयार केला. यास सिद्धांत पांगारकर याने संगीत दिले आहे. केवळ दृष्यचित्रे आणि पियानोवरील संगीताच्या माध्यमातून ही साडेसहा मिनिटांचा माहितीपट फडकऱ्यांचे जीवन सांगतो. जगभरात हा माहितीपट पोचविण्यासाठी आम्ही सुरवातीला फडकरी म्हणे काय? याची इंग्रजीमध्ये माहिती दिली आहे, बाकी दृष्यातूनच फडकऱ्यांचे आयुष्य लोकांच्या समोर ठेवले आहे. या माझ्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय दाद मिळत आहे.” पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून फोटोग्राफीची डिग्री मिळवल्यानंतर सध्या प्रत्युष कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात ‘मास कम्युनिकेशन‘ या पदव्युत्तर अभासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतो आहे. फिल्म निर्मितीच्यादृष्टीने त्याने विविध प्रशिक्षणे पूर्ण केली आहेत.प्रत्युष आणि त्याचा संगीतकार मित्र सिद्धांत पांगारकर यांनी ‘ड्रीमरीव्हर पिक्चर्स’ ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करून झाड, एच.टू.ओ, पावशा हे लघुपट तयार केले. सामाजिक भान असलेल्या या लघुपटांनाही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकरी

  • अर्जेंटिना येथील इंटरनॅशनल लेबर फिल्म फेस्टिव्हलमध्ये फडकरी दाखविण्यात आला. या महोत्सवात जगभरातून केवळ बारा लघू माहितीपट निवडण्यात आले होते. त्यात भारतातून ‘फडकरी’ची एकमेव निवड.
  • क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथे होणाऱ्या ‘टूर फिल्म फेस्टिव्हल’मध्येही ही निवड.
  • या महिन्यात मेक्सिकोमधील पुबलो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सायलन्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून एकूण आठ लघू माहितीपटांची, तर भारतातून केवळ ‘फडकरी’ची निवड.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com