पुन्हा घडले राजकीय नाट्य ! फडणवीस, अजित पवार यांचा राजीनामा

Devendra fadnvis and Ajit pawar
Devendra fadnvis and Ajit pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी मंगळवारी (ता. २६) नाट्यमयरीत्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या ७८ तासांपूर्वीच स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने भाजपकडे बहुमत नव्हते. परिणामी, विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे न जाता देवेंद्र फडणवीस यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. दुपारी भरगच्च पत्रकार परिषदेत श्री. फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा केली. 

दरम्यान, विरोधी आघाडीच्या गोटात जल्लोष सुरू झाला. फडणवीस यांनी दुपारी चारच्या सुमाराला राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपविला. 

राज्यपालांना राजीनामा सोपविण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे आमच्याकडेदेखील बहुमत उरलेले नाही. कोणाचेही आमदार फोडायचे नाहीत, घोडेबाजार करायचा नाही, ही भाजपची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती. त्यामुळे आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेनंतर राज्यपालांना भेटून आम्ही सरकारचा राजीनामा सादर करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सह्याद्री राज्य अतिथीगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.  या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. महाराष्ट्रात भाजपला संपूर्ण जनादेश देत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून १०५ जागा जिंकून दिल्या. आम्ही शिवसेनेसोबत लढलो होतो. हा जनादेश भाजपला होता. याचे कारण आम्ही लढलेल्या जागांपैकी ६७ टक्के जागा आम्ही जिंकल्या आहेत, तर शिवसेना ४० टक्के विजयी झाली आहे. 

निकालानंतर पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेने बार्गेनिंग सुरू केले. सेना नेते आमचे सगळे पर्याय खुले आहेत, असे सांगत होते. मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायचे, असे कधीच ठरलेले नव्हते. तुम्ही मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर आम्ही कोणाही सोबत जाऊ शकतो, असे सेना नेते वारंवार सांगत होते. त्यावर भाजपने तात्त्विक भूमिका मांडली. निवडणुकीआधी जे ठरले आहे ते देऊ, जे ठरले नाही ते देणार नाही, अशी आमची भूमिका होती. दरम्यानच्या काळात शिवसेना आमच्याशी चर्चा करण्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत बोलत होती. आमच्याशी मात्र बोलत नव्हती. 

त्यानंतर सगळ्यात मोठा पक्ष या नात्याने राज्यपालांनी पहिल्यांदा आम्हाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावले. आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेस नकार दिला. त्यानंतर शिवसेनेला बोलावण्यात आले. मात्र, त्यांचेही हसे झाले. मग राष्ट्रवादीला बोलावले. मात्र, राज्यात कोणीच सत्ता स्थापन करू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतरही सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये दहा-बारा दिवस सातत्याने चर्चा सुरू होत्या. पण, सरकार काही होत नव्हते. याचे कारण हे तीनही पक्ष पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध होते. ज्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. हे तिन्ही पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आले होते. त्यांच्या सत्तास्थापनेचा किमान समान कार्यक्रम हा एकमेव म्हणजेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, इतकाच होता. मात्र, राज्यात किती काळ राष्ट्रपती राजवट चालेल, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही राज्यात सरकार स्थापन केले. 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नव्या सरकारला शुभेच्छा देताना हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल, असे ते म्हणाले. शिवसेना नेते सोमवारी सोनियांची शपथ घेत होते. सत्तेकरिता किती मोठी लाचारी करता, असा सवालही त्यांनी केला. त्यांना ही लाचारी लखलाभ होवो. हे तिन्ही पक्ष केवळ सत्तेकरिता एकत्र आले आहेत. भाजप प्रभावी विरोधी पक्षाचे काम करेल. जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोचविण्याचे काम करेल.  दोन चाके असलेले सरकार धावते, तीन चाकांची ऑटोरिक्षा देखील धावते. पण, त्याची काय अवस्था होते, हे सर्वांनाच माहिती आहे, असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावला आहे.  चारच दिवसांत बंड शमले...  दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का, तर राष्ट्रवादीसाठी तितकाच मोठा दिलासा ठरला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या शिडातील हवाच निघाली. अजित पवारांच्या भरवशावरच भाजपने सत्ता स्थापन करून बहुमताचा दावा केला होता. मात्र, बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच फडणवीस सरकारवर राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळविले आहे. सर्व दिग्गजांनी भेटी घेतल्यानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी अजित पवारांच्या मनधरणीसाठी केलेले प्रयत्न निर्णायक ठरले. सदानंद सुळे यांनी सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे २३ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी चौथ्याच दिवशी पदभार न स्वीकारताच राजीनामा दिला. अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com