नाशिक जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा आले पिकावर प्रादुर्भाव

सध्याच्या वातावरणात सर्वत्र पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यातच मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भाजीपाला पिकांतील पाने खणाऱ्या अळ्या तसेच अमेरिकन लष्करी अळी यांचे निरीक्षण करावे. अळीचे योग्य निदान करून घ्यावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक उपाय करावा. मका पिकात शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा - प्रा. तुषार उगले, सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, के के वाघ कृषी महाविद्यालय नाशिक
लष्करी अळी
लष्करी अळी

नाशिक: सध्या संपूर्ण देशात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना निफाड तालुक्यातील रौळस पिंपरी येथील आले पिकाच्या क्षेत्रावर या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रौळस पिंपरी येथील सागर आहेर यांनी जून महिन्यात एक एकर क्षेत्रावर आले पिकाची लागवड केली. या क्षेत्राशेजारी मका लागवड आहे. त्यामुळे लष्करी अळीने स्थलांतर करत आले पिकावर मोर्चा वळवला आहे. सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस असल्याने आले उत्पादक असलेले आहेर यांना पिकांमध्ये जाता येत नसल्याने दुर्लक्ष झाले. पाऊस ओसरल्यानंतर आहेर हे शेतात गेले असताना आल्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. अळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवीत पाने खाल्ल्याचे दिसून आले. आले या पिकावर पहिल्यांदाच या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. नुकसान करण्याची पद्धत मका पिकासारखीच असून सध्या पानांवर हि आली उपजीविका करताना दिसून येत आहे.  उत्तर प्रदेशातही या अळीचा शिरकाव ऊस या पिकावर दिसून आला आहे. अमेरिकन लष्करी अळीचे पतंग एका रात्रीत स्थलांतर करत आहेत. त्यांनतर अळीने अंडी घातल्याने अळीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आता मका पिकानंतर इतर पिकांवर प्रादुर्भाव झाला.  प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी अमेरिकन लष्करी अळीबाबत सावध राहावे. वेळोवेळी शेतात निरीक्षण ठेवणे गरजेचे आहे. या अळीत कीटकनाशक प्रति प्रतिकारक्षमता लवकर निर्माण होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांसोबत जैविक कीटकनाशकांचासुद्धा वापर करावा. यात बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझियम या मित्रबुरशी, प्रकाश सापळे, कामगंध सापळे यांचा वापर गरजेचा आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकेल.  - राहुल वडघुले,  कीटकशास्त्र अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com