कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्यांना ‘ऐरणी’चा आधार
खटाव तालुक्यातील बहुतांश परिसरात उन्हाळी कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, कांद्याचे दर टप्प्याटप्प्याने कमी होऊन सद्य:स्थितीत कांद्याला ८०० ते १००० रुपये असा भाव मिळत आहे.
विसापूर, जि. सातारा : खटाव तालुक्यातील बहुतांश परिसरात उन्हाळी कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील महिन्यात कांद्याला बाजारात प्रति क्विंटल २७००-३००० असा चांगला दर मिळत असल्याने आगाप लागवड केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, कांद्याचे दर टप्प्याटप्प्याने कमी होऊन सद्य:स्थितीत कांद्याला ८०० ते १००० रुपये असा भाव मिळत आहे.
हा दर परवडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांदा साठवून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, आगामी काळात भाव वाढतील, या भरवशावर खटाव तालुक्यात ठिकठिकाणी कांदा ऐरणी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने येथील शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते कांदा काढणीला येईपर्यंत खूप मोठा खर्च झालेला आहे. मात्र, सद्य:स्थितीत अत्यल्प भावात कांद्याची खरेदी होत असल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत तसेच ऐरणीत साठविण्यास पसंती दिली आहे. तर काहींना कांदा साठवण्यासाठीची साधने नसल्याने बाजारात मिळेल त्या भावात कांदा विक्री करावी लागत आहे.
सद्य:स्थितीत कांदा उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च आणि उत्पादित मालाला मिळणारा दर याचा मेळ घातला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नसल्याचे चित्र आहे. अशात कांदा विकणे जोखमीचे ठरू लागले आहे. त्यामुळे, तालुक्यातील बहुतांश ठिकाणी कांदा ऐरणीत भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी आधीच मोठ्या प्रमाणावर खर्च करून कांदा पीक घेतले आहे. भविष्यात दरवाढ होऊन काहीतरी शिल्लक राहील, या भरवशावर आणखी खर्च करून शेतकरी ऐरणी लावत आहेत. एकूणच काय काहीतरी पदरात पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
टाळेबंदी होऊ लागल्याचा परिणाम
पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा टाळेबंदी होऊ लागल्याने सद्य:स्थितीत हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी कमी आहे. उत्पादन जास्त व मागणी कमी असल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
- 1 of 1098
- ››