पूरस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील ५९८ कुटुंबांचे स्थलांतर

पुरस्थिती
पुरस्थिती

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील २८ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या गावांतील ५९८ कुटुंबांचे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यांमुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे. यामध्ये कोयना, कृष्णा, उरमोडी, तारळी या प्रमुख नद्यांचा समावेश आहे. या नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्याने गावे, घरे तसेच अनेक पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पुरात मानवीहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कराड, पाटण, सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, फलटण या तालुक्यांतील ५९८ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

कोयना धरणातून सर्वात जास्त विसर्ग केला जात असल्याने कराड तालुक्यातील कोयना नदीकाठची सर्वाधिक २७ गावे बाधित झाली आहेत. या २७ गावांतील ३८४ कुटुंबांतील १६४७ लोकांना स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास नद्याच्या पाणीपातळीत वाढ होऊन आणखी कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे सातारा व पाटण तालुक्यांतील सात व्यक्ती वाहून गेल्या आहेत. पाच व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून दोन व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पाटण व कराड तालुक्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी मंगळवारी पुण्यावरून एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाला प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.

या पथकाकडे २ बोटी व प्रशासनाकडे २ बोटी अशा एकूण ४ बोटी असून या बोटी कराड व पाटण तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com