सारे कुटुंबच लागलेय कामाला...

शेती म्हटले की कष्ट आलेच. परंतु या कष्टात येणाऱ्या मजुरांच्या समस्येने मोठी पंचाईत केली आहे. पावसाच्या अंदाजाने धाकधूक वाढविली.
jalna
jalna

जालना : शेती म्हटले की कष्ट आलेच. परंतु या कष्टात येणाऱ्या मजुरांच्या समस्येने मोठी पंचाईत केली आहे. पावसाच्या अंदाजाने धाकधूक वाढविली. जिथं चार मजूर हवे तिथं एखादा मिळतो किंवा मिळतही नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वेळेत व्हायची शेतीकामे लांबणीवर पडतात, प्रसंगी नुकसानही होत. ‘उघड्यावर सोंगून ठेवलेल्या तुरीचं कसं होईल या भीतीनं सारं कुटुंबच चार, पाच दिवसांपासून कामाला लागलंय,’ असे घनसावंगी तालुक्‍यातील रामगव्हानचे दीपक बुनगे शेतीतील संकटे सांगत होते.  चिकित्सक, प्रयोगशील, संकटावर मात करण्यासाठी पर्यायाचा कायम शोध घेण्याचा प्रयत्न करणारे दीपक बुनगे यांच्या एकत्र कुटुंबात जवळपास ४० एकर शेती. यात काही पाहुण्यांच्या बटाईने केलेल्या शेतीचा समावेश. कुटुंबात आई- वडील यांच्यासह सहा व्यक्‍ती. बुनगे म्हणाले, की खरिपात कापूस, तूर, बाजरी, उडीद, मुग, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, फळपिकात अलीकडे लागवड केलेली मोसंबीची ३५०० व सीताफळाची २ हजार झाडे. पारंपरिक शेतीची वाट अवघड म्हणून तुतीची लागवड करून रेशीम शेती सुरू केली. ७ ते ८ शेळ्यांचे पालन व जवळपास १५०० कोंबड्यांचेही पालन सुरू केले. उत्पन्न शाश्‍वत रहावे म्हणून प्रयत्न कमी नाहीत. परंतु प्रत्येक कामाला लागणारी माणसच मिळणे अवघड बनल्याने शेतीची वाट अवघड होते आहे.  बुनगे पुढे म्हणाले, की वाटले, कोरोनात अनेकांनी गावाची वाट धरल्याने मजुरांचा प्रश्‍न मिटेल, पण तसे झाले नाही. आजही जिथे मला चार मजूर लागतात तिथे मजुरीपेक्षा ५० ते १०० रुपये जादा देऊनही एखादा मजूर मिळतोय. २५ एकरांवरची तूर मजुरांच्या समस्येपायी अर्धी घरीच सोंगणी व जमा करून काढणी करतोय. अर्धी काही मजुरांच्या साह्याने, तर काही गुत्ती देऊन काढून घेतली. त्यातही गुत्ती घेणारे पूर्वीप्रमाणे खळ होईपर्यंत साथ देत नाहीत. केवळ सोंगणी व पेंढ्या बांधून देतात. बाकी आपल्यालाच करावे लागते. त्यामुळे यंदा शेतीकामात कुटुंबाची कमालीची परवड झाली.   असेच चक्र कायम राहिले, तर मजूर काही दिवसांनी शेतीतून गायब होतात की काय, असे वाटायला लागलेय. तुरीला पाण्याची गरज होती त्या वेळी रात्रीच वीज मिळत असल्याने एकीकडे बिबट्याची दहशत अन् दुसरीकडे वडील, भाऊ व मी स्वत: रात्र रात्र एकट्याने तुरीला पाणी दिले. तूर चांगली आली तर काढणीला मजूर मिळेना. मळणी आपली आपणच करावी म्हणून छोट्या टॅक्‍टरवरचे ७.५ एचपीचे मळणी यंत्र घेतले. खर्च वाढला पण इलाज नाही. 

प्रतिक्रिया आता आभाळ मिरवतंय. तुरीचे सोंगून जाग्याजाग्यावर खळे टाकले आहेत. दरवर्षी मोठ्या हार्वेस्टरनं काढतो. पण या वर्षी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा प्रपंच. पण आता ढगाळ वातावरण पाहून वाटतंय अंगलट येतोय का काय? त्यामुळं पुन्हा सारं कुटुंब चिंतेनं रात्रीचा दिवस करून कामाला लागलंय. - दीपक बुनगे,  रामगव्हान, ता. घनसावंगी, जि. जालना 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com