आधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत व्यवसायसंधी

आधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत व्यवसायसंधी
आधुनिक मत्स्यपालन : एक शाश्वत व्यवसायसंधी

पुणे ः नाशिक रस्त्यावर मंचरपासून जवळच अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) हे गाव आहे. या गावात राहणाऱ्या सुमित राजू शिनगारे (वय २५) यांच्या कुटुंबात गेल्या तीन पिढ्यांपासून मासेमारी आणि विक्रीचा व्यवसाय चालत आला आहे. भीमा नदीत मासेमारी आणि शेती ही चरितार्थाची साधने. राज्यातील इतर नद्यांप्रमाणेच भीमा नदीतही प्रदूषण, अतिक्रमण इ. समस्यांमुळे मासेमारी कमी होत चालली होती. सुमितने  बी. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून अनुभव मिळवला. आणि त्यानंतर मात्र मनाशी पक्कं ठरवलं की आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात पूर्ण तयारीने पुढं जायचं. सुमितला तशी लहानपणापासूनच माशांच्या जाती, बाजारभाव, विक्रीव्यवस्था इ. ची माहिती होतीच; पण व्यवस्थापन अनुभव, आधुनिक मत्स्यपालनाचे तंत्र ही सगळी माहिती जवळजवळ शून्यच !   याच दरम्यान सुमितला पाबळ येथील विज्ञान आश्रमामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण उद्योजक विकास कार्यक्रमा`ची माहिती मिळाली. मार्च २०१६ मधील अशाच एका कार्यशाळेमध्ये सुमितला आधुनिक मत्स्यपालनाचे व्यवस्थापन, अॅक्वपोनिक्स तंत्रज्ञान (मस्य+माती विना शेती), मत्स्यबीज खरेदी, आर्थिक व्यवस्थापन कौशल्य (व्यवसायातील नफा, खर्च काढणे, प्रकल्प अहवाल लिहिणे इ.) या बाबींचे प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणासोबतच विज्ञान आश्रमाच्या वतीने वेळोवेळी प्रत्यक्ष व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देता आल्या. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. 

मत्स्य व्यवसायाची सुरवात सुरवातीला सुमितने अवसरी खुर्द येथील तीन हेक्टर तळं भाड्याने घेऊन मस्य व्यवसायाला सुरवात केली. तळ्याची साफ-सफाई करून खत व्यवस्थापन केले. परंतु, सुरवातीच्या दोन वर्षांमध्ये निसर्गाने साथ दिली नाही. एका हंगामात जास्त पावसाने मत्स्यबीज वाहून गेले, तर एका वेळी कमी पावसाने पाणीपातळी कमी झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागले. पण खचून न जाता सुमितने प्रयत्न चालू ठेवले. या अनुभवांपासून धडा घेत सुमितने मत्स्यबीज कधी आणि किती प्रमाणात सोडावे, सुरवातीच्या लहान बुटुकलींचे नियोजन कसे करावे हे समजून घेतले. पुण्यातील हडपसर येथील शासकीय मत्स्योत्पादन केंद्रात जाऊन माहिती घेतली. तसेच मत्स्यशेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. आणि या धंद्यातील बारकावे समजून घेतले. पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे अनेक मर्यादा येत होत्या. त्यामुळे तलावाच्या जवळ विहिरी तयार करून पाण्याची उपलब्धता वाढवली.

सरकारी योजनांचा लाभ  सुमितला सरकारच्या विविध योजनांचा लाभही वेळोवेळी मिळत गेला. त्यात नवीन तलावाची निर्मिती करणे, तलाव विकसित करणे, पहिल्या वर्षी मत्स्य बीज खरेदी करणे यासारख्या विविध कामांसाठी अनुदान दिले जाते. राज्य सरकारच्या मत्स्यविकास विभागातर्फे हे अनुदान विविध स्तरावर दिले जाते. फिश फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी (FFDA) तर्फे मत्स्य पालनाविषयी अनुदान पात्र उमेदवारांना मार्गदर्शन केले जाते. मात्र, या उमेदवारांना कर्ज घेण्यापूर्वी मत्स्य शेतीविषयीचा अनुभव असणे गरजेचे आहे

उत्पादन, विक्री आणि नफा  माशांच्या विक्रीसाठी सुमितने ‘मालवणी फिश मार्ट’ हे दुकान चालू केले. माशांच्या किरकोळ विक्रीतून घाऊक बाजार पेक्षा २०० ते ३०० टक्के जास्त नफा मिळत असल्याचे सुमित सांगतो. त्यामुळे आपल्या जवळील बाजारपेठ आणि तेथील आवडी-निवडी ओळखून मत्स्यशेती करावी, असा त्याचा सल्ला आहे. गरजे नुसार मासेमारी करत विक्री केल्यास निव्वळ नफा नक्कीच जास्त राहतो, तसेच वाहतूक खर्चही कमी येतो. सुमित सध्या प्रति हेक्टर तीन टन माशांचं उत्पादन घेतो. ते पाच टनापर्यंत वाढवण्याचा त्याचा मानस आहे. मासे पकडण्यासाठी कंत्राटी मजूर (कॉन्ट्रॅक्ट लेबर) प्रति किलो २० रुपये या हिशोबाने मिळतात. सुमितने नुकताच १६ हेक्टर क्षेत्रावरील एक तलाव भाडेतत्त्वावर घेतला आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या माशांच्या जातींचा अभ्यास करण्याचा मानस आहे.  मत्स्यशेतीचे नियोजन  सुरवातीला तलाव कोरडा असताना त्यामध्ये असलेल्या मातीचे परीक्षण करून योग्य त्या मात्रेत चुना टाकावा. नंतर युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे व त्याच सोबत शेंगदाणा पेंड टाकावी. तलाव पूर्ण पाण्याने भरावा. नंतर चार दिवसांनी मत्स्य बीज संवर्धनासाठी तलाव पूर्णपणे तयार होतो. मत्स्यबीज साठवणूक करण्याआधी त्यात कीटक तयार झाल्यास पाण्यात निरमा व डिझेल याचे मिश्रण करून टाकावे. याने पूर्ण कीटक मरून जातात. मातीत आम्ल किंवा अल्कलीचा अंश जास्त असेल तर लिंबोळी च्या मदतीने मातीचा सामू (पीएच) स्थिर करता येऊ शकतो. तलावामध्ये सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. खत व्यवस्थापनानंतर १५ दिवसांनी तलावात मत्स्यसंवर्धन करतात. पिलांची खरेदी केल्यानंतर त्यांना २० सेकंदासाठी पोटॅशियम परमॅग्नेट आणि मीठ लावून तलावात सोडतात. पाण्यातील तण नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रास कार्प माशाचा वापर केला जातो. मत्स्यबीज किंवा पिल्लं टाकण्याअगोदर भक्षक मासे काढून घेतात. पाण्यातील अमोनिया, पीएच नियंत्रित ठेवण्यासाठी शेतीसाठी वापरला जाणारा चुना आणि केळीच्या फांद्या तलावात टाकतात. माशांचे वय आणि वाढ याच्या प्रमाणात प्रति किलो १० ते २० टक्के वजन वाढ खाद्य दिले जाते. भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड, मिनरल मिक्शरपासून खाद्य बनवता येते किवा तयार खाद्य विकत आणू शकता.   ः सुमीत शिनगारे, ९५६११३७४१०  ः विकी चौधरी, ८४०८८३८४९१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com