चीन आणि भारतावर शेतीचे भवितव्य: आदिनाथ चव्हाण

award
award

अलिबाग : युरोपसह प्रगत राष्ट्रातील शेतकरी शेतीपासून दूर जात असल्याने शेतीचे खरे भवितव्य आता भारत आणि चीन या दोन देशांवरच अलवंबून आहे. भारतीय शेतकऱ्यांमध्ये परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता असली तरी सरकारी यंत्रणा मात्र जुनीच धोरणे स्वीकारून चालत आहे. धोरणे बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरला पाहिजे, अशी भूमिका ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी मांडली. कुरूळ येथील क्षात्रैक्य सभागृहात दोनदिवसीय सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी (ता. ९) झाला. या वेळी अध्यक्षीय भाषणात श्री. चव्हाण बोलत होते. याप्रसंगी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, दिलीप भोयर (अमरावती), ॲड. सतीश बोरुळकर (मुंबई), बाबूभाई जैन (अलिबाग) आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘शेतात कष्ट करणाऱ्या समाजाला नेहमी ज्ञानापासून दूर ठेवण्यात आले; परंतु बदलत्या परिस्थितीनुसार हा समाज बदलत असून त्याचे हुंकार साहित्यातून फुटत आहेत. महात्मा जोतिबा फुले, शरद जोशी यांचे काम हे खूप मोठे आहे. त्यांची परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोचण्याचे काम अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे पदाधिकारी समर्थपणे संभाळत आहेत, ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली पाहिजे.’’  ‘ॲग्रोवन’ शेती विषयासाठी वाहून घेतलेल्या दैनिकाने मागील पंधरा वर्षांत शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणेला भाग पाडले पाहिजे, असे श्री. चव्हाण म्हणाले.  यावेळी मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. संमेलनात मान्यवरांना पुरस्कार वितरण आणि विश्‍वस्तरीय ऑनलाइन लेखन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.   शेतकरी आत्महत्यांच्या अभ्यासासाठी समिती नेमावी अलिबाग येथे पार पडलेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात राज्यातील आत्महत्या रोखण्यासाठी साहित्यिक, पत्रकार आणि शेतकरी संघटनांची एक अभ्यास समिती नेमावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. रविवारी (ता. ९) या संमेलनाचा समारोप होत असताना मांडण्यात आलेल्या ठरावात बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन हे शेती असल्याने शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शेती साहित्याला प्राधान्य देण्यात यावे. महात्मा फुले आणि शरद जोशी यांनी शेती साहित्यात दिलेले सर्वोच्च योगदान लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांचा शेती साहित्यरत्न सन्मान देऊन गौरव करावा.  शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असल्याने शेतकरी ही संकल्पना राबवावी, असे ठराव मांडण्यात आले. या संमेलनानासाठी राज्यभरातून मोठ्याप्रमाणात आलेले शेतकरी सहभागी झाले होते. राज्यातील आत्महत्या रोखण्यासाठी साहित्यिक, पत्रकार आणि शेतकरी संघटनांची एक अभ्यास समिती नेमावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. पुरस्कार विजेते  ललित लेख- नीलेश देशमुख (नाशिक), कृष्णा जावळे (बुलडाणा), गणेश वरपे (जालना), कथा- प्रतिभा बिळगी (बंगलोर), नरेंद्र गंधारे (वर्धा), आशिष वरघणे (वर्धा), शिरीष नाडकर्णी (मुंबई), छंदोबद्ध कविता- श्याम ठक, सिद्धेश्‍वर इंगोले, पंडित निंबाळकर, श्रीधर आंभुरे, छंदमुक्त कविता- धीरदकुमार ताकसांडे, नितीन साळुंके, आत्तम गेंदे, क्रांती पाटणकर, गीतरचना- रंगनाथ तालवटकर, रादेश जौंजाळ, महेश देसले, बालाजी कांबळे, शेतकरी गझल- रविपाल भारशंकर, रमेश बुरबुरे, प्रदीप थूल, महेश मोरे, प्रोत्साहनपर- भूषण तांबे, गिरिधर काचोळे. अनुभव कथन- गंगाधर मुटे (वर्धा), अभिजित बोरस्ते (नाशिक), अनुराधा धामोडे (पालघर), राहुल राजोपाध्ये (सांगली), वैचारिक लेख- आदिनाथ ताकटे (अहमदनगर), रवींद्र दळवी (नाशिक), समीक्षण- प्रा. चित्रा कहाते (नागपूर), वीणा माच्छी (पालघर), किरण डोंगरदिवे (बुलडाणा), केशव कुकडे (बीड), कवितेचे रससंग्रह- प्रदीप देशमुख (चंद्रपूर), सचिन शिंदे (यवतमाळ), ब्रह्मदेव खिल्लारे (बीड). या पुरस्कारांबरोबरच युगात्मा शरद जोशी कृषी अनमोलरत्न पुरस्काराने अॅड. वामनराग चटप (चंद्रपूर), कृषी दीपस्तंभ पुरस्काराने रमेशभाई बिसानी (वर्धा), कृषी पत्रकार पुरस्कार सुनील चरपे (नागपूर), अभिव्यक्ती गौरव पुरस्कार चिमणदादा पाटील (जळगाव), कृषी बळीराजा पुरस्कार उत्तमराग वाभळे (हिंगोली), हिरकणी पुरस्कार स्मिता गुरव (नाशिक), आदर्श पाईक पुरस्कार जयंता बापट (यवतमाळ).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com