बुलडाणा जिल्ह्यात दीड हजार हेक्टर जमीन खरडली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः जिल्ह्यात काही भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे तीन तालुक्यांतील १६३० हेक्टर जमीन पुराने खरडून गेली आहे. महसूल विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यांत हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्यात या तालुक्यांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस होत आहे. मध्यंतरी आलेल्या पुरामुळे सुमारे ७० गावांना फटका बसला. पैनगंगा नदीच्या पुरामुळे बुलडाणा तालुक्यातील सातही मंडळांमध्ये मोठे नुकसान झाले. सर्वेक्षणातूनही हे स्पष्ट होत आहे. यंत्रणांच्या अहवालांनुसार पाच हजार ९०७ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यांत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बुलडाणा तालुक्यात नुकसान झाले. एक हजार ५७० हेक्टरवरील जमीन खरडून गेली. फळबागांसह अन्य पिकांचे असे एकूण १६१७ हेक्टरचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात समोर आले.

चिखली तालुक्यात १२ हेक्टर तर मोताळा तालुक्यात ११ हेक्टर असे एकूण एक हजार ६५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पाच हजार ९०७ शेतकरी प्रभावित झाले आहेत. याच आपत्तीत बुलडाणा, चिखली तालुक्यातील ४१६ विहिरी खचल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बुलडाणा तालुक्यातील ३८६ तर चिखली तालुक्यातील ३० विहिरींचा समावेश आहे. देऊळघाट मंडळामधील १६९ विहिरींचे जून महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. पाडळी आणि धाड मंडळामधील अनुक्रमे ६६ आणि ५२ विहिरी खचल्या आहेत. बुलडाणा मंडळात ११, साखळी बुद्रुक मंडळात ३८, रायपूर मंडळात ३५ आणि म्हसला बुद्रुक मंडळात १५ विहिरी खचल्या आहेत.

जिल्ह्यात आजवर ९० महसूल मंडळांपैकी १९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. धाड, लोणी आणि डोणगाव या मंडळामध्ये प्रत्येकी दोनदा ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com