दुष्काळामुळे जमीन पडीक ठेवण्याची वेळ

विजेचे भारनियमन होत असल्याने कृषिपंपांसाठी आठ तास लाइट उपलब्ध होते. वीज पूर्ण दाबाने मिळत नसून, वेळप्रसंगी रात्री जागून पाणी द्यावे लागत आहे. टंचाई वाढत असल्याने यंदा उत्पादन काढण्यापेक्षा डाळिंब, पेरूच्या फळबागा जगविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. - महादेव बरळ, कचरवाडी, निमगाव केतकी, ता. इंदापूर
दुष्काळामुळे जमीन पडीक ठेवण्याची वेळ
दुष्काळामुळे जमीन पडीक ठेवण्याची वेळ

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील बारामती, इंदापूर तालुक्यांमध्ये यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. खडकवासला, वीर धरणाच्या कालव्यालगतचा भाग सोडला तर उर्वरित भागात दुष्काळाने आतापासूनच गंभीर स्वरूप घेतले आहे. पाणी पातळी खालावल्याने विहिरीदेखील अंतिम घटका मोजत आहेत. बऱ्याच ठिकाणी जमिनी यंदा पडीक असून, शेतामध्ये औतच गेले नाही. तर काही ठिकाणी आलेली पिके सुकून गेली आहेत. चाऱ्याअभावी जनावरांचा सांभाळ करणेही अवघड होणार आहे. १९७२ चा दुष्काळ ऐकला होता. मात्र यंदा सारखा दुष्काळ पाहिला नाही, उन्हाळा असा जाणार हा प्रश्‍न भेडसावत असल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत. बारामती, इंदापूर हे मुख्यत: रब्बीचे तालुके आहेत. परतीच्या पावसावर होणारी रब्बी पिके, पाण्याची सुविधा असलेल्या भागातील डाळिंब, पेरूच्या फळबागा, पानमळे यांना दुष्काळाच्या झळा बसत असून, झाडे सुकू लागली आहेत. बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. खरिपात थोड्याफार पाण्यावर आलेल्या पिकांची अपुरी वाढ झाली असून, ही पिके करपून गेली आहेत. पावसाअभावी या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. निम्मी ज्वारी उगवलीच नाही बारामती, इंदापूर तालुक्यांच्या कोरडवाहू भागात रब्बी ज्वारी हेच मुख्य पीक आहे. मात्र यंदा परतीचा पाऊसच नसल्याने ज्वारीची ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली. पेरलेली निम्मी ज्वारी उगवलीच नाही, तर जी उगवली ती पण पाण्याअभावी जळून जात आहे. ओलावा आहे तेथे ज्वारीची उगवण झाली आहे. मात्र ती देखील फारकाळ टिकणार नाही. बारामती तालुक्यातील पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, माळवाडी, सायंबाची वाडी, ढाकाळे, जळकेवाडी, भिलारवाडी, काऱ्हाटी या भागात तीव्र दुष्काळ जाणवत आहे. सायंबाची वाडी परिसरामध्ये मूलस्थानी जलसंधारणाचा प्रकल्प राबवून रब्बी ज्वारीच्या उत्पादनात यशस्वीपणे वाढ करण्यात आली. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने या जलसंधारणाचा उपयोग झाला नाही. पावसाने हजेरी लावली असती तर ज्वारी कमरेपर्यंत वाढल्या असत्या असे शेतकरी सांगतात. ...तर जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाही पावसाअभावी यंदा जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांसाठी उसाचे वाढे विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी शेकडा पाचशे रुपये मोजावे लागतात. जर्सी गाईला दिवसाला १५ तर देशी गाईला १० पेंढी उसाचे वाढे खाण्यास द्यावे लागते. मात्र दुसरीकडे दूध उत्पादनात जवळपास २० टक्के घट झाली आहे. तर दुधाला डिग्रीही बसत नसल्याने दर कमी मिळत आहेत. शेळ्या मेंढ्यांना खाण्यासाठी काहीच उगवले नाही. थोड्याफार पावसावर हिरवे झालेले माळरान नंतर सुकून गेले आहे. त्यावरच या कशीबशी जनावरांची गुजरान सुरू आहे. पाणीच राहिले नसल्याने पुढील काळात जनावरे संभाळणे अवघड होणार असून, विकून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. भूजल पातळी खालावल्याने विहिरी तळाशी यंदाच्या पावसाळ्यात बारामती तालुक्यात बारामती तालुक्यातील सरासरीच्या ५५ टक्के तर इंदापूरमध्ये ५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे बारामतीतील ८६ तर इंदापूर तालुक्यातील १२२ गावांमध्ये पाणी पातळी १ मीटरपेक्षा अधिक खालावली आहे. त्यापैकी बारामतीतील २७ आणि इंदापूरमधील ४१ गावांमध्ये पाणीपातळी तीन मीटरपेक्षाही खालावल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. या गावात ऑक्टोबर महिन्यापासून टंचाई वाढली आहे. जानेवारीपासून दोन्ही तालुक्यांतील आणखी ५९, तर उन्हाळ्यात उर्वरित ८१ गावांमध्ये टंचाई वाढणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पैसे देऊनही जनावरांना पाणी मिळेना दरवर्षी या काळात भरपूर चारा उपलब्ध असतो. यंदा पाऊसच पडला नाही, त्यामुळे चारा तर नाहीच, त्यामुळे जास्त अंतर चालूनही पोट भरत नाही. त्यामुळे जनावरे जगविण्यासाठी दुसरीकडे जावे लागेल. जनावरांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. पैसे देऊनही कोणी मेंढ्यांना पिण्यासाठी पाणी देत नाही. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर, गागरगाव, थोरातवाडी, शेळगाव परिसरात शेतजमिनी पडीक आहेत. आपल्याला सांगता येतंय, मात्र मुक्या जनावरांनी काय करावे, असे मेंढपाळ आबा सायजी लेवटे यांनी सांगितले. मजुरांपुढे उपजीविकेचा प्रश्‍न खरिपातील उडीद, मूग ही कडधान्ये वाया गेली. बाजरीचेही नुकसान झाले. खरीप हातच्या गेल्यानंतर पाठोपाठ रब्बीत गहू, हरभऱ्याच्या पेरण्याच झाल्या नाहीत. त्यामुळे मजुरांना काही कामच उरले नाही. हाताला काम नसेल तर पोटाचे काय करायचे असा प्रश्‍न आहे. घरात चूल पेटती राहावी, यासाठी मजूर २० ते २५ किलोमीटरपर्यंत मिळेल, ते काम शोधावे लागत आहे. लोणीभापकर परिसरातील मजूर पुरंदर, इंदापूर तालुक्यांत कामासाठी जात असल्याचे प्रकाश कडाळे यांनी सांगितले. प्रतिनिधी एखाद दुसरा पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा कोरडच गेला आहे. त्यामुळे पाऊस नाहीच असेच म्हणावं लागेल. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. ७२ चा दुष्काळ ऐकला होता. यंदा तो पहायला मिळतोय. - राजेंद्र उचाळे, कडबनवाडी, ता. इंदापूर  यंदा खरिपाची पिके पण झाली नाहीत आणि रब्बीची पिके पण नसल्याने शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष पूर्णपणे दुष्काळी आहे. कोरड्यात पेरले होते, ते उगवलेच नसल्याने बियाणेही वाया गेले आहे. जनावरांना खाण्यासाठी चारा नसल्याने दुधाच्या उत्पादनातही २० टक्क्यांपर्यंत घट होत आहे. - मनोहर भापकर, सायंबाची वाडी, ता. बारामती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने लोणी भापकर टॅंकर मुक्त होते. मात्र यंदा परिस्थिती गंभीर झाली आहे. विहिरी कोरड्या असून, पिण्यासाठी दिवसाआड पाणी द्यावे लागत आहे. पेरलेली ज्वारीही उगवली नसल्याने  जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागेल. - राहुल भापकर, सदस्य, पंचायत समिती बारामती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com