Properly fenced farm pond
Properly fenced farm pond

मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारी

येत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन घेण्यासाठी काही पू्र्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्याचा काळ योग्य आहे. मत्स्य उत्पादनातील कामांचे एक वेळापत्रक करून त्यानुसार कामे करावीत.

येत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन घेण्यासाठी काही पू्र्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्याचा काळ योग्य आहे. मत्स्य उत्पादनातील कामांचे एक वेळापत्रक करून त्यानुसार कामे करावीत. बांधबंदिस्ती दुरूस्ती व खते

  • शेततळे जूने असल्यास त्याची बांध बंदिस्ती करणे आवश्यक असते. शेततळ्यातील कागद फाटला किंवा उसवला असल्यास दुरूस्त करुन घ्यावा. बांधामध्ये छिद्रे पडलेली असल्यास दगड, गोटे टाकून बुजवावीत.
  • शेततळ्यात पाणी घेण्याचे व सोडण्याचे मार्ग, पाईप स्वच्छ करून घ्यावे. तेथील फाटलेल्या जाळ्या बदलाव्यात. तळ्यातील जादा पाणी जाण्यासाठी तयार केलेल्या सांडवा /पाईप ला जाळ्या बसवाव्यात.
  • तळ्यात कुजलेला, घाण वास येणारा गाळ साचला असल्यास तो काढून टाकावा. शेतीमध्ये खत म्हणून वापरावा.
  • कुंपण व बर्ड नेट यांची फूटतूट तपासावी. ती दुरूस्त करून घ्यावी. बर्ड नेट नसल्यास ती बसवून घ्यावी, अन्यथा पक्षी थव्याने तळ्याजवळ येतात. मासळीचे बीज खाऊन टाकतात. बर्ड नेट तळ्याच्या वरती नुसती टेकवून पसरवू नये, तर अँगल व खांबांचा वापर करून त्यावर पक्की बसवावी. तळ्याच्या बांधावर फिरता येईल व खाद्य व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येईल अशा प्रकारचे कुंपण तयार करावी.
  • तळ्यातील पाणी पूर्णपणे काढणे शक्य नसल्यास बारीक आसाची जाळी पुन्हा पुन्हा तळ्यातून फिरवून रानटी व उपद्रवी मासे काढून टाकावे. - या शिवाय बीज सोडण्याआधी २० दिवस मोहाची पेंड २५० किलो प्रती १० गुंठे या प्रमाणात वापरावी. बीज सोडण्याच्या ८ ते १० दिवस आधी ब्लिचिंग पावडर (३०% क्लोरीन) ३५ किलो प्रती १० गुंठे या प्रमाणात वापरावी. यामुळे तळ्यातील शिल्लक राहिलेले रानटी मासे ही मरून जातील. शिल्लक राहिलेले जाळी फिरवून काढून टाकावेत. कारण हे मासे आपण वाढवणार असलेल्या जातींसाठी हानीकारक ठरू शकतात.
  • बीज सोडण्यापूर्वी ७ ते ८ दिवस आधी प्रती १० गुंठे शेततळ्यासाठी शेणखत ५० किलो किंवा कोंबडी खत १८ किलो, युरीया १० किलो, व सुपर फॉस्फेट १० किलो खत तळ्यात टाकावे. साधारणतः आठ दिवसांत तळ्यात माशांचे नैसर्गिक खाद्य तयार होते. त्यानंतर तळ्यात मासळीचे बीज सोडावे.
  • मत्स्यबीजाची नोंदणी दर्जेदार बीज तळ्यात सोडले तरच मासळीचे चांगले उत्पादन मिळेल. बिजाच्या बाबत हल्ली फसवणूकीचे अनेक प्रकार घडत आहेत. फिरत्या विक्रेत्यांकडून बीज खरेदी करू नका. शासकीय किंवा विद्यापीठाच्या किंवा उत्तम नाव लौकीक असलेल्या खाजगी बीजोत्पादन केंद्रात बीजाची नोंदणी करावी. तळ्याच्या आकारानुसार बीज प्रमाण ठरवावे. आवश्यकतेपेक्षा अधिक बीज घेऊन पैसे घालवू नये. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीज आधी नोंदवावे. बीज कधी मिळेल, त्या तारखेनुसार शेततळ्यातील पूर्वतयारी व खतमात्रा द्यावी. उपकरणे व यंत्रे सज्ज ठेवा शेततळ्यात मासे वाढवताना पाण्याचा दर्जा वेळोवेळी तपासणे आवश्यक असते. आपल्याकडील उपकरणांमध्ये पीएच् मीटर, सेची डिस्क, मोजपट्टी, वजन काटा, वेगवेगळ्या आकाराच्या मासे पकडण्याच्या जाळ्या, प्लवंग जाळी, ऑक्सिजन मीटर, अमोनिया /नायट्राईट किट, तापमापक यांचा समावेश असावी. उपकरणे जूनी असतील तर ती चांगल्या अवस्थेत आहेत की नाहीत, हे तपासावे. चालू स्थितीत नसल्यास विकत घेऊन ठेवावीत. यातील ऑक्सिजन मीटर तेवढे महाग आहे. अन्य उपकरणांच्या किंमती जास्त नाहीत. तळ्यात मोठ्या प्रमाणात मासे संवर्धनासाठी सोडले असतील तर तळ्यातील मासे थोडे मोठे झाल्यावर पाण्यातील प्राणवायू त्यांना पुरेनासा होतो, अशावेळी पंप बसवून पाण्याचे पुनःचक्रीकरण आवश्यक बनते. त्यासाठी योग्य त्या अश्वशक्तीचा पंप सुस्थितीत आहे का, ते तपासावे. दुरूस्ती करून घ्यावी. पूर्व तयारीचे वेळापत्रक तयार करा कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, तिलापीया, मरळ या पैकी निवडक मासे तळ्यात वाढवता येतात. आपण या पैकी कोणते मासे वाढवणार आहे, त्यांचे दर्जेदार बीज मिळण्याचे ठिकाण जाणून घ्यावे. त्या प्रमाणे तळ्याची पूर्वतयारीचे एक वेळापत्रक तयार करावे. त्यानुसार मत्स्यपालनाचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश फारसे दूर नाही. संपर्क- डॉ. विजय जोशी, ९४२३२९१४३४ (निवृत्त सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com