पुणे जिल्ह्यात ६०४ शेतीशाळांचे आयोजन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः खरीप हंगामात पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव होतो. याबाबत जागृतीसाठी कीडरोग सर्वेक्षण व्यवस्थापन व सनियंत्रण सल्ला प्रकल्पांतर्गत(क्रॉपसॅप) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘क्रॉपसॅप’अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यात ६०४ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन, भात, कापूस, तूर या पिकांसाठी कीडरोग सर्वेक्षण व्यवस्थापन व सनियंत्रण सल्ला प्रकल्प राबविण्यात येतो. या अंतर्गत कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच सल्ला, जनजागृती व उपायोजना सुचविल्या जातात. प्रकल्पात कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक हे निश्चित केलेल्या व रॅण्डम प्लॉटवरील निरीक्षणे मोबाईल अॅपवर नोंदवितात व अॅानलाइन अपलोड करतात. कृषी विभागातील मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे रॅण्डम प्लॉटवर जाऊन कीडरोगांची निरीक्षणे नोंदवितात. 

कीड, रोगांची संगणक प्रणालीद्वारे नोंदविण्यात आलेली निरीक्षणे, राष्ट्रीय सूचना केंद्र यांच्याकडे आॅनलाइन पद्धतीने पाठवून, त्यांची कृषी विद्यापीठाद्वारे तपासणी केली जाते. त्यानंतर त्यावर देण्यात आलेले कृषीविषयक सल्ले, कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष मार्गदर्शनातून, किसान एसएमएस, माहिती पत्रके व गाव बैठकीद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात येतात. तसेच कृषी वार्ताफलकावर लावून कीडरोग नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात येते.    

तालुकानिहाय शेतीशाळांचे नियोजन ः भोर ४२, वेल्हा २८, मुळशी ४२, मावळ ४२, हवेली ५६, खेड ५६, आंबेगाव ५६, जुन्नर ५६, शिरूर ५६, बारामती ५६, दौंड ४२, इंदापूर ५६, पुरंदर १६.   

शेतीशाळेची प्रमुख वैशिष्ट्ये 

  • सहभागी शेतकरी  ः ३० शेतकरी. 
  • शेतीशाळा प्रक्षेत्र ः क्रॉपसॅपअंतर्गत निश्चित प्लॉटसाठी निवडलेले क्षेत्र.
  • शेतीशाळा कालावधी ः पिकांच्या पेरणीपूर्व ते काढणीपर्यंतच्या विविध अवस्थेत पंधरा दिवसांच्या अंतराने. 
  • शेतीशाळा प्रशिक्षण वर्गाचा कालावधी ः साधारणपणे दोन ते तीन तास.
  • प्रशिक्षण हे संपूर्णपणे प्रत्यक्ष शेतावरील प्रात्यक्षिके, निरीक्षणे, संशोधनावर आधारित.
  • शेतकरी शेतीशाळेसाठी शिक्षणाचे प्राथमिक साधन पिकांचे क्षेत्र होय. 
  • शेतीशाळेचे क्षेत्र हे सहभागी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे असावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com