शेतकरी आंदोलक ते आमदार ः देवेंद्र भुयार यांचा खडतर प्रवास

शेतकरी आंदोलक ते आमदार ः देवेंद्र भुयार यांचा खडतर प्रवास
शेतकरी आंदोलक ते आमदार ः देवेंद्र भुयार यांचा खडतर प्रवास

अमरावती ः अपक्ष आणि त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडून येत या वेळी हॅट्‌ट्रिकच्या तयारीत असलेल्या कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना अवघ्या तिशीतील युवकाने राजकारणाच्या मैदानात चितपट करीत बाजी मारली. डॉ. बोंडे यांची हायप्रोफाइल कामाची पद्धत आणि त्यातूनच सामान्यांशी वाढता दुरावा, संत्रा बागायतदारांना मिळालेली तुटपुंजी भरपाई अशा रोषातूनच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवा भुयारने विधानसभेचा गड सर केला. 

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प असलेले गव्हाणकुंड हे देवेंद्र भुयारचे मूळ गाव. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळला आहे. त्यासोबतच सिंचन प्रकल्प असतानाही ते अपूर्ण असल्याने त्यातून अपेक्षीत सिंचन होत नाही. त्यामुळे संत्रा बागायतदारांमध्ये देखील सरकार पर्यायाने या भागाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांच्याविरोधात असंतोष वाढता होता. यावर्षी मोठ्या क्षेत्रावरील संत्रा बागा पाण्याअभावी जळाल्या. त्यापोटी १८ हजार रुपये हेक्‍टरी तूटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळेही जनक्षोभ वाढता होता. ४८ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर वरुड, मोर्शी तालुक्‍यांत संत्रा होतो. जनतेमध्ये रोष वाढत असल्याचे सत्तेत सहभागी डॉ. बोंडे यांच्या लक्षात आले नाही किंवा त्यांनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार मात्र जनतेचा चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. ‘अपना यार देवेंद्र भुयार’ असा नारा दिला गेला. 

८६ गुन्हे आणि नक्षल समर्थकाचा आरोप रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांच्या तालमीत घडलेल्या देवा भुयारला सामाजिक कार्यात यायचे होते. परंतु, प्रहारचे बच्चू कडू यांच्यामुळे प्रभावित होत त्यांनी त्यांच्या संघटनेत काही वर्ष काम केले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना डॉ. अनिल बोंडे हे देखील देवेंद्र भुयार यांच्या कामामुळे प्रभावित झाले. डॉ. बोंडे यांचा समर्थक म्हणूनही देवेंद भुयार यांनी काम केले. परंतु, अमरावती येथील औष्णिक वीज प्रकल्प सोफीयाला समर्थन देण्याच्या मुद्यावरुन दोघांत ठिणगी पडली आणि ते वेगळे झाले. आमदार बोंडे यांच्या समर्थकांनी त्या वेळी देवेंद्र भुयार यांना मारहाण केली. त्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या देवेंद्रने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि आता आमदारकीचा गड सर केला. देवेंद्र भुयारवर तब्बल ८६ गुन्हे दाखल आहेत. इतकेच काय तर या गुन्ह्यांचा संदर्भ जोडत आणि नक्षल समर्थक असल्याचा आरोप करीत दोन वर्षांकरिता नागपूर, अमरावती जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले. राजू शेट्टी यांच्या हस्तक्षेपानंतर सहा महिन्यांत ही कारवाई रद्दबातल ठरविण्यात आली.

माझ्यासारख्या सामान्य शेतकरी पुत्राला आमदार केले; यापेक्षा अधिक अभिमानाची बाब काही असूच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर शेवटपर्यंत लढत राहणार आहे. हमीभाव मिळवून देणे, संत्रा प्रक्रिया उद्योग या भागात आणणे, शेती तंत्रज्ञानासाठी देखील यापुढे पाठपुरावा केला जाईल. - देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदार संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com