दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
नाशिक बाजार समितीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण
असतानाच सटाणा तालुक्यातील कुपखेड येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी रामदास आहिरे यांना बाजार समिती आवारात मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार ताजा असतानाच सटाणा तालुक्यातील कुपखेड येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी रामदास आहिरे यांना बाजार समिती आवारात मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यावर कारवाई करूनही मुजोरी कमी न होता, थेट मारहाण केल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे अन् संतापाचे वातावरण आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की सटाणा तालुक्यातील कुपखेड येथील भाजीपाला उत्पादक रामदास आहिरे कोथिंबीर विक्रीसाठी गुरुवारी (ता. १९) बाजारात आले होते. बाजार समितीतील ‘शिवांजली’ नाव असलेल्या आडतीमध्ये कोथिंबीर विक्रीसाठी लावली. या वेळी आणलेल्या मालाचे दोन वक्कल केले. एक वक्कल संजय जाधव, तर दुसरे वक्कल पवन पाटील यांनी खरेदी केले. खरेदी झाल्यानंतर पवन पाटील यांनी माल भरून घेतला, मात्र जाधव यांनी शेतीमाल भरून घेतला नाही. रात्री उशीर होत असल्याने आम्हाला दूर जायचे आहे, शेतीमाल लवकर भरून घ्या, अशी विनंती श्री. आहिरे यांनी व्यापाऱ्याकडे केली.
यावर माल भरून न घेता संजय जाधव यांच्या मुलांनी अर्वाच्च भाषेत अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार या ठिकाणी घडला. या वेळी शेतकरी आहिरे यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी मारहाणीत गहाळ झाली. त्यानंतर शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतल्यानंतर त्यास त्याची भरपाई देऊन प्रकरण दाबल्याचे सांगितले जात आहे.मात्र असे प्रकार घडत असल्याने बाजार समितीतील सुरक्षा व्यवस्था असल्याचे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
मुजोरी कधी थांबणार?
संबंधित व्यापाऱ्याने बाजार समितीकडे तक्रार केली नाही. तरीही संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली असल्याचे बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी सांगितले. व्यापाऱ्याचा परवाना रद्द करून लिलावात सहभागी होऊ नये, याबाबत कळविले आहे. मात्र व्यापाऱ्यांची मुजोरी कधी थांबणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. अलीकडेच घडलेल्या दोन्ही प्रकरणांत शेतकरी हे माजी सैनिक आहेत.
प्रतिक्रिया
शेतकरी काबाडकष्ट करतो. दोन पैसे मिळतील या आशेने नाशिक बाजार समितीत शेतीमाल विक्री करण्यासाठी येतो. मात्र येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांवर दादागिरी करतात. वेळप्रसंगी मारहाणही करतात. त्यामुळे ही बाजार समिती आहे, की गुंडांचा अड्डा? हे बाजार समितीने सांगावे. अन्यथा, शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी व्यवस्था करावी.
- रामदास आहिरे, पीडित शेतकरी, कुपखेड, ता. सटाणा
- 1 of 654
- ››