पंधरा वर्षे शेतात राबणारा जेव्हा तलाठी होतो

या वयात हा काय करणार अभ्यास करून, अशी गावातली काही माणसं टिंगलटवाळी करायची. पण मी अभ्यासाची साथ सोडली नाही. आज मला मिळालेलं यश हा त्या सातत्यपूर्ण परिश्रमाच यश आहे. - देविदास सातपूते, नांदगाव, ता. गोंडपिंपरी
देविदास ठेंगणे
देविदास ठेंगणे

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळानं बळीराजाचं कंबरडं मोडणं नित्याचच झालंय. अशात पंधरा वर्ष शेतीची कास सांभाळणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने पुस्तकांशी गट्टी केली अन्‌ यशही मिळविलं. सातबारा मिळविण्यासाठी चकरा मारणारा हा शेतकरी आता स्वतःच सातबारे देणार आहे. कारण तो तलाठी झालाय. तरुणानांही लाजवेल अशा संघर्षमय स्थितीत यशाची पायरी गाठणाऱ्या शेतकऱ्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणेची शिदोरीच ठरली आहे. देविदास तुकाराम ठेंगणे गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी. २००३ मध्ये त्यानं गोंडपिपरीच्या कला वाणिज्य महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनतर त्याने एम.ए ही केले. नोकरीसाठी प्रयत्न केले. पण ते काही जमले नाही. अशात त्याने घरी असलेली शेती करण्याचा निर्णय घेतला. लग्नही केले. आपल्या शेतीत वर्षभर मेहनत तो घेऊ लागला. एक मुलगा मुलगी पत्नी अन्‌ तो. शेती करीत संसाराचा गाढा पुढे रेटायचा. २००४ सालापासून कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाचा मोठा फटका बसला. अगदी हातात येणारं पीक अनेकदा नष्ट झालं. तरी कुठलाच पर्याय नव्हता.  अशात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तलाठी पदाची जाहिरात काढली. यात अंशकालीन पदवीधर या प्रवर्गासाठीही जागा होती. देविदासने अंशकालीन म्हणून काम केले होते. अंशकालीन साठीही खूप स्पर्धा असते अशावेळी कुठल्याही स्थितीत अभ्यास करण्याचा मानस त्याने घेतला. शेतीचा हंगाम सोडणे शक्य नव्हते. अशावेळी त्याने शेतात काम करता करता अभ्यासही केला. काही दिवस मित्राकडील संगणकावर सरावही केला. अन्‌ मग परीक्षाही दिली. मंगळवारी अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. देविदास या वेळी शेतातच काम करीत होता. मुलीने फोन उचलला. नंतर बाबाला सांगते असे कळविले. सायंकाळी देविदास परत आला. त्याने त्या नंबरवर फोन केल्यानंतर त्याला ही गोड बातमी समजली. दिवाळीच्या पर्वावर मेहनतीच चीज झाल्यान संपूर्ण कुटुंबात आंनदच आनंद पसरला. देविदास आता ४५ वर्षांचा आहे. त्याचा मुलगा प्रज्वल हा इयत्ता आठवीत तर मुलगी प्रणाली सहावीत शिकते. सतत पंधरा वर्ष शेतीची कास धरणाऱ्या देविदासने शेतीत अभ्यास करून यश मिळविले. सोबतच अनेकांना प्रेरणेची शिदोरी दिली आहे. सातबारा मिळविण्यासाठी चकरा मारणारा देविदास आता स्वत: आपल्या बांधवांना सातबारे देणार आहे. कारण तो तलाठी झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com