छळ झालेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे याचना

छळ झालेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे याचना
छळ झालेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे याचना

पुणे : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मंडळात संचालकांच्या सुरू असलेल्या मनमानीची तक्रार आणि चौकशीची मागणी शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी प्रमोद चौगुले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कारवाई होत नसल्यास पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिल्यामुळे कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.  महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशात श्री. चौगुले यांच्या चार सहकारी उद्योजकांनी कृषी उद्योग सुरू केले. तथापि, कृषी विभागाकडून आर्थिक कारणांसाठी छळ होत असल्याचा अनुभव फक्त महाराष्ट्रातच येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.   “आम्ही पाच हजार शेतकऱ्यांच्या मदतीने काम करतो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीची सहकारी प्रक्रिया संस्था दहा वर्षांपूर्वी सुरू केली. सुधीरकुमार गोयल, उमाकांत दांगट, विकास देशमुख, सुनील केंद्रेकर या सर्व आजीमाजी सनदी अधिकाऱ्यांनी आमची कामे पाहिली आहेत. मात्र, कृषी खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे कष्ट नव्हे तर केवळ पैसा दिसतो,’’ असे श्री. चौगुले यांचे म्हणणे आहे.  श्री. चौगुले यांच्या सहकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला आधुनिक रायपनिंग चेंबर उभारला. “आम्ही खानदेशात उभारेल्या २०० टनाच्या युनिटला आतापर्यंत ५० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांसाठी बागांमध्ये इलेक्ट्रिक वजन काटा आम्ही लावला. शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याची पद्धत सुरू केली. कटाई प्रथा बंद केली. एक रुपयादेखील शेतकऱ्यांच्या बिलातून कापला नाही. या सर्व कामाचे फळ म्हणून एनएचएमने आमची ४५ लाखांचे अनुदान ठेवले आहे. त्यामागे संचालकांची मनमानी जबाबदार आहे,’’ अशी टीका श्री. चौगुले यांनी केली.  “मंडळाने माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांना छळले आहे. अनुदान रद्द होईल या भीतीने कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. मात्र, मी गप्प बसणार नाही. आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यामुळे मंडळाकडून एलओआय प्रलंबित ठेवले जातात, मंजूर प्रस्ताव अडविले जातात, प्रशासकीय मंजुरीचे आदेश दिल्यानंतरही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. यामुळे अडीचशे कोटी रुपयांचा निधी आल्यानंतरही मनमानीमुळे कोट्यवधी रुपये पडून आहेत,’’ असेही ते नमूद करतात. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात श्री. चौगुले यांनी संचालकांच्या मागील सेवाकालातील सर्व कामकाजाची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्या चौकशीबाबत कोणत्या सचिवाला पत्र दिले, वादग्रस्त सेवाकाळ असतानाही त्यांची नियुक्ती कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाली याच्यासह त्यांच्या सर्व सेवाकालातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

“एनएचएमच्या भोंगळ कारभाराबाबत कारवाई होत नसल्यास शासनाकडून मिळालेला शेतीनिष्ठ पुरस्कार मी परत करेन. इतर शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हा निर्णय घेत असून, चौकशी दाबली जात असल्यास कृषी आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करेन,’’ असा इशारा श्री. चौगुले यांनी दिला आहे.  अनुदानाचे प्रस्ताव कुणाच्या कपाटात? राज्यातील शेतकरी तसेच कृषी उद्योजकांना वाटण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कोटयवधी रुपये एनएचएमकडे दिलेले आहेत. मात्र, एलओआय, मंजुरीचे प्रस्ताव, अनुदानाची संबंधित कागदपत्रे कुणाच्या कपाटात दडवून ठेवण्यात आली आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एजंट, दलाल तसेच काही कर्मचारी यांची मिलीभगत यात असून, त्यांनाच अनुदानाच्या प्रस्तावांची माहिती मिळते, असा दावा कृषी उद्योजकांचा आहे. विशेष म्हणजे लॉटरीत नाव असूनही पूर्वसंमतीपत्र मिळत नाही, पूर्वसंमती पत्र असल्यास प्रशासकीय मंजुरी मिळत नाही आणि प्रशासकीय मंजुरी असली तरी अनुदान खात्यात वर्ग होत नाही, अशा तीनही पातळ्यांवरील तक्रारी मंत्रालयात करण्यात आलेल्या आहेत.

संचालकांची यंत्रणा बनली सुपरपॉवर  एनएचएमच्या अनुदान वितरणातील गोंधळाबाबत तत्कालीन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह तसेच सध्याचे आयुक्त सुहास दिवसे यांना लेखी तक्रारी दिल्या गेल्या. तथापि, काहीही निष्पन्न झालेले नाही. “कृषी खात्यात संचालकांची यंत्रणा सध्या ‘सुपरपॉवर’ बनली आहे. थेट आयुक्तांच्या बदली करण्याची क्षमता असलेल्या या यंत्रणेच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वतःची नोकरी गमावणे असा सरळ अर्थ खात्यात लावला जातो. गुण नियंत्रण संचालक असो की फलोत्पादन संचालक असो; कोणी कितीही तक्रारी केल्या तरी काहीही होणार नाही. आयुक्तालयात आलेल्या तक्रारी एक तर गुढरीत्या बंद होतात किंवा तक्रारदारांचा पाठपुरावा संशयास्पदरीत्या बंद होतो,” असे स्पष्ट मत एका सहसंचालकाने व्यक्त केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com