बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
औरंगाबाद ‘केव्हीके’चे शेतकरी जोडो अभियान
शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती देण्यासाठी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) संवादासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी करत शेतकरी जोडो अभियान सुरू केले आहे.
औरंगाबाद : शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती देण्यासाठी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) संवादासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी करत शेतकरी जोडो अभियान सुरू केले आहे. या प्रयत्नातून जोडलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची स्थिती, गरज व अपेक्षा ‘केव्हीके’ला कळत असून त्यामुळे गरजेनुरूप कृषी तंत्रज्ञान देण्यासह कृषी विज्ञान केंद्राला शास्त्रोक्त नियोजनात मोठी मदत होते आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथे १९८३ मध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यान्वित झाले. तेव्हापासून आतापर्यंत शेतीविषयक ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन तसेच प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी शास्त्रज्ञ मंच व अलीकडे आयोजित केलेल्या ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमातून करण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करते आहे.
दर तीन वर्षाला चार ते पाच गाव दत्तक घेऊन कृषी तंत्रज्ञानाचा शास्त्रोक्त प्रसार टप्प्याटप्प्याने कृषी विज्ञान केंद्र करीत आहे. परंतु झपाट्याने बदलत असलेला काळ व क्षेत्र पाहता ही गती अत्यंत संथ आहे. कृषी तंत्रज्ञान प्रसाराची गती पाहता जिल्ह्यातील जवळपास १३०० गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राला बराच अवधी लागला असता.
शेतकरी संवाद व प्रत्यक्ष बांधावर तज्ज्ञांच्या भेटीत कृषी तंत्रज्ञान प्रसाराची गती वाढविण्याची गरज असल्याची बाब कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या लक्षात आली. त्यावर उपाय म्हणून औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राने आता शेतकऱ्यांकडूनच त्यांची इत्यंभूत माहिती घेऊन त्यांना अपेक्षित मार्गदर्शन गतीने होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापर अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कृषी विज्ञान केंद्राशी जोडण्याकरिता 'गुगल लिंक' च्या माध्यमातून ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यासाठीची एक लिंक तयार केली आहे. https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSdakpO_XaRWkHNhzU१५ssSTz६s५HzN-pucJRbP५oVJYtbvY७w/viewform?vc=०&c=०&w=१&flr=० अशी ही लिंक संलग्न कृषी विभाग यंत्रणेच्या माध्यमातून तसेच समाज माध्यमांचा वापर करून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते आहे.
त्यामाध्यमातून शेतकरी संपूर्ण माहितीसह जोडला जातो आहे.असा उपक्रम राबविणारे औरंगाबाद ‘केव्हीके’ राज्यात बहुधा एकमेव असावे. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्यात आलेल्या या शेतकरी जोडो अभियानात आत्तापर्यंत १६५० शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जवळपास ३१ प्रश्नांच्या माध्यमातून ऑनलाइन फॉर्म द्वारे कृषी विज्ञान केंद्राला प्राप्त झाली आहे.कृषी विज्ञान केंद्रामार्फत भविष्यात घेण्यात येणारे विविध प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमासाठी ही माहिती संकलित केली जाते आहे.
यावर प्रशिक्षण देण्याची तयारी
जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेळीपालन, कुक्कुटपालन, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, प्रक्रिया, शेतकरी मेळावा, शेती शाळा, रोपवाटिका, कृषी निविष्ठा, परसबाग, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी यंत्रसामग्री अवजारे बँक यासह आवश्यक ती सर्व माहिती देण्यासाठी मार्गदर्शनाची तयारी दाखवण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
शेतकऱ्याची शेती, पीक पद्धती, गरज व अपेक्षा कळली की कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे सोपे होईल. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यापीठाचे, संशोधन संस्थांचे प्रगत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत गतीने पोहोचविता येईल. शासनाच्या ‘दुप्पट उत्पन्न’ व ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाला गतीने प्रत्यक्षात उतरविता येईल.
- डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, ‘केव्हीके’, पैठण रोड औरंगाबाद