शेतकऱ्याने १८ एकरांतील कपाशीत घातली मेंढरे

जिल्ह्यातील कापूस क्षेत्र यंदा बोंड अळीने पोखरले आहे. यात प्रामुख्याने ओलिताची कपाशी असलेल्या शेतांमध्ये बोंड अळीने धुमाकूळ घातला आहे. झाडांवर बोंड दिसत असतानाही त्यातून कापूस येण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हे पीक उपटून टाकत आहेत.
SHEEP IN COTTON
SHEEP IN COTTON

अकोला ः जिल्ह्यातील कापूस क्षेत्र यंदा बोंड अळीने पोखरले आहे. यात प्रामुख्याने ओलिताची कपाशी असलेल्या शेतांमध्ये बोंड अळीने धुमाकूळ घातला आहे. झाडांवर बोंड दिसत असतानाही त्यातून कापूस येण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हे पीक उपटून टाकत आहेत. काही शेतकरी जनावरे चरायला सोडत आहेत. मंगळवारी (ता. २४) बोर्डी शिवारात अमोल ताडे या शेतकऱ्याने १८ एकर कपाशीत मेंढरे चरायला सोडली. ताडे यांनी यंदा १८ एकरांत कपाशीची लागवड केली होती. पावसामुळे पीक चांगले वाढले. झाडांवर बोंडेही मोठ्या संख्येने दिसत होती. परंतु कापूस वेचणीची वेळ आली, तेव्हा त्यातून चांगला कापूस निघणे अवघड झाले आहे. त्यांना ज्या शेतातून एकरी १५ क्विंटलची कपाशीची अपेक्षा वाटत होती त्याच शेतात केवळ एकरी तीन क्विंटल कापूस निघाला. सद्यःस्थितीत झाडांवर ३५ ते ४० बोंड परिपक्व झालेले दिसून येतात. मात्र यामध्ये प्रत्येक बोंडात अळीने उच्छाद घातल्याने आता कापूस निघण्याची शक्यता मावळली. हे पाहता त्यांनी पीक हिरवेगार असतानाही शेतात मेंढरे सोडली आहेत.

खर्चही निघला नाही कपाशीच्या व्यवस्थापनावरच एकरी २० हजारांवर खर्च झालेला आहे. एकरात तीन क्विंटल उत्पादन आले असून, यातून खर्चही निघणे कठीण आहे. कपाशी पिकाला विमा मदत मिळावी, शासनाने पाठबळ द्यावे, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करीत आहेत. यंदा या भागातील शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम बोंड अळीमुळे हातातून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या उभे असलेले पीक उपटून रब्बीत दुसरे पीक लावण्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत.

प्रतिक्रिया कापूस पिकासाठी यंदा एकरी २५ हजारापर्यंत खर्च झाला. बोंडअळीसाठी पाच ते सहा फवारणी कराव्या लागल्या. फेरोमोन ट्रॅप लावूनही फायदा झाला नाही. यंदा लागवड केलेल्या १८ एकरात सरासरी तीन ते चार क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. आता सर्वत्र बोंडअळी वाढल्याने उत्पादन येण्याची चिन्हे नव्हती. परिणामी मेंढरे सोडण्याचा निर्णय घेतला. - अमोल ताडे, कापूस उत्पादक, बोर्डी, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com