शेतकऱ्यांरी दिवाळसणाच्या रात्री सिंचनासाठी शेतातच

कुठे चार दिवस रात्री, तर चार दिवस दिवसा, तर कुठे एक आठवडा रात्री, एक आठवडा दिवसा, असे सिंचनासाठीचे विजेचे असलेले नियोजन शेतकऱ्यांवर संकटांना आमंत्रण देणारे व झोप उडवणारे ठरत आहे.
electricity
electricity

औरंगाबाद : कुठे चार दिवस रात्री, तर चार दिवस दिवसा, तर कुठे एक आठवडा रात्री, एक आठवडा दिवसा, असे सिंचनासाठीचे विजेचे असलेले नियोजन शेतकऱ्यांवर संकटांना आमंत्रण देणारे व झोप उडवणारे ठरत आहे. शिवाय या नियोजनामुळे आता रात्रीच्या वेळी सिंचनासाठी वीज मिळणाऱ्या गाव शिवारातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळसणात रात्रीचा मुक्‍काम शेतात करण्याची वेळ आली आहे. हे चित्र केव्हा बदलेल असा प्रश्‍न पुन्हा एकदा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

तूर वगळता खरीप हातचा गेल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती तयार करून मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आशेने रब्बीची पेरणी करत आहेत. त्यात सिंचनासाठी आवश्‍यकतेनुसार वीजपुरवठ्याचा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या संकटात भर घालतो आहे. साप विंचू, रानडुक्‍कर यांसह अनेक ठिकाणी बिबट्याच्या दहशतीत रात्रीचे पाणी कसे द्यावे, पाणी न देता जीव वाचवावा की कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी पिकांना पाणी द्यावं याची चिंता शेतकऱ्यांना आहे. अशाही परिस्थित आपल्यापरीने खबरदारी घेऊन संकटाचा सामना करत अनेक शेतकरी रात्रीच्या गडद काळोखात व कडाक्‍याच्या थंडीतही पिकांना पाणी देण्याचे काम करीत आहेत. 

अनेकदा वीजपुरवठा खंडीत होणे, त्यासाठी मग खटपट करावी लागणे हे तर पाचवीलाच पुजल्याचे शेतकरी सांगतात. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या नागापूरचे धनंजय सोळंके म्हणाले, की एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री सिंचनासाठी वीज मिळते. त्यात तासन् तासाचा खंड ठरलेला. दिवसभर शेतात काम करा अन् रात्रीला पुन्हा पिकाला पाणी भरण्यासाठी डोळे फोडा. त्यात डोळा लागला तर पाणी वाया जाते. देश कृषिप्रधान, मग शेतकऱ्याची किव का नाही. सिंचनासाठी आवश्‍यक वीज ती बी दिवसा का मिळत नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यातील लिहाखेडीचे अमोल बावस्कर म्हणाले, की सब स्टेशनमध्ये दोन शिफ्ट, आता एकाची दिवाळीची रात, शेतात तर एकाला गरज असेल तरी वीज मिळणार नाही. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यातील गेवराई बाजारचे गणेश जोशी म्हणाले, की अति पावसाने खरिपाची पिके वाया गेली. आता गहू हरभरा, बटाटे, कांदा, भाजीपाला आदी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. तर वीजपुरवठा रात्री मिळतोय. कडाक्‍याची थंडी, काळोखात जंगली प्राणी, साप विंचवाची भीती, पण इलाज नाही. दिवसाची वीज असून नसल्यासारखी असते. 

जालना जिल्ह्यातीलच खामखेडाचे सोमनाथ नागवे म्हणाले, की सध्या हिवाळी मका, ज्वारी, आले, भाजीपाला पिकासाठी शेत भिजविण्याचे काम सुरू आहे. पण वीजपुरवठा रात्रीचा, त्यात प्रचंड थंडी, इतर संकट आहेतच. दिवसा वीज देणे शक्‍य नसेल, तर निदान सोलार पंप प्रत्येक सिंचन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदानावर द्यावे.

प्रतिक्रिया आमच्या शिवारात बिबट्याचा वावर आहे म्हणतात. रानडुकरांचे टोळके हल्ला कधी करतील अन् कधी जिवावर बेतंन काही सांगता येत नाही. तरी वीज रात्री मिळत असल्यानं काल रात्रभर मी पाणी देवून आता घरी आलो. पुन्हा जावंच लागंल, शेतकऱ्याचे लई हाल आहेत, काय सांगावं? दिवसा वीज मिळेल की नाही, हे माय बाप सरकार जाणे.  - संतोष वाघमारे, शेतकरी केकत जळगाव, ता. पैठण जि. औरंगाबाद

दिवाळसणात रात्रीचा वीजपुरवठा असल्यानं तुरीला दोन, तीन दिवसांपासून पाणी भरतोय. दिवाळीची रात्र शेतातच जाणार. शिवारात घोणस जातीचे साप आढळतात, रानडुकरांच्या हल्ल्याचा नेम नाही. डिप्यांची अवस्था बिकटच. सोलरसाठी अर्ज करावं म्हणलं, तर दोन तासांत राज्याची लिंक बंद झाली. सोलरसाठी २५ हजार भरून वर्ष झालं अजून ते मिळेना. - दीपक बुनगे, शेतकरी, रामगव्हान, ता. घनसावंगी. जि. जालना

आमच्याकडं सिंचनासाठी विजेची अवस्था म्हणजे, बाप जगू देईना अन् माय भीक मागू देईना अशी झाली. कालच्या रात्री ८ तास २० मिनिट वीज मिळाली, रात्रभर जागून पाणी दिलं. सकाळी ६.२० वाजता वीज गेली. आता दिवाळी असली तरी रात्री शेतात येवून पाणी द्यावंच लागलं.  - प्रशांत कदम, चनई, ता. अंबाजोगाई. जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com