लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे स्वामित्व प्रमाणपत्र

जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला) येथील प्रयोगशील शेतकरी अनंत दिगंबर प्रभुआजगावकर यांनी विकसित केलेल्या लाल भेंडी वाणाच्या संशोधनाला केंद्र शासनाने स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे.
red bhindi
red bhindi

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला) येथील प्रयोगशील शेतकरी अनंत दिगंबर प्रभुआजगावकर यांनी विकसित केलेल्या लाल भेंडी वाणाच्या संशोधनाला केंद्र शासनाने स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे. गेली चौदा वर्ष ते लाल भेंडीच्या संशोधनाचे काम करीत असून सहा वर्षांपूर्वी त्यांनी केंद्र सरकारकडे स्वामित्व प्रमाणपत्राकरिता अर्ज केला होता. जिल्ह्यात साधारणपणे हिरवी आणि सफेद भेंडी या दोन जाती पाहायला मिळतात. मूळ आजगाव येथील शेतकरी श्री. प्रभुआजगावर (सध्या रा.आडेली ता.वेंगुर्ला) यांनी पंधरा वर्षापूर्वी आपल्या शेतात भेंडी लागवड केली होती. यावेळी त्यांना काही भेंडीवर थोडाफार लालसर रंग आल्याचे दिसून आले. त्यांनी अशा रंगाच्या भेंडीवर संशोधन केले. त्यानंतर निवड पध्दतीने पूर्ण लालसर रंगाच्या भेंडीची जात विकसित केली. स्वतःच्या शेतात त्यांनी भेंडीची लागवड करून पीक घेतले. अनेक प्रयोग यशस्वी केल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भारत सरकारच्या वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरणाकडे स्वामित्व प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल केला होता. या विभागाने देशभरात लाल भेंडीच्या विविध चाचण्या केल्यानंतर श्री. प्रभुआजगावकर यांना स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे.

श्री. प्रभुआजगावर यांनी विकसित केलेल्या भेंडीचा रंग लालसर असून त्यांची लांबी ७ ते ८ इंच आहे. या भेंडीमध्ये चिकटपणा कमी असून लालसर रंगामुळे बाजारपेठेत त्याला मागणी मोठी आहे. प्रती झाड एक ते दीड किलो उत्पन्न मिळते. पीक कालावधी १२० ते १३० दिवसांचा आहे. या पिकाची काढणी ४० ते ५० दिवसांनी होते. देशातील काश्मीरचा अतिथंड भाग वगळता देशभरात कुठेही या भेंडीची लागवड करता येणार आहे. कोणत्याही हंगामात या भेंडीची लागवड करता येईल. वेंगुर्ला फळसंशोधन केंद्रात समारंभपूर्वक श्री. प्रभुआजगावकर यांना स्वामित्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला  फळसंशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन. सावंत, समाजकल्याणचे उपआयुक्त प्रमोद जाधव, डॉ. विजयकुमार देसाई हे उपस्थित होते. स्वामित्व प्रमाणपत्र नोंदणीकरीता कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ,व्ही.व्ही. दळवी, डॉ. पराग हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com