agriculture news in Marathi, farmer have frightt of American fall army worm , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्ती
गोपाल हागे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आम्ही दरवर्षी तीन ते चार एकर मका लावतो. या वर्षी तीन एकरांत लागवड केली आहे. मक्याच्या प्रत्येक झाडाला लागलेल्या कणसावर लष्करी अळीने हल्ला केला. कुठे अर्धे कणीस खाल्ले. अळीने २५ ते ३० टक्के नुकसान केले. तीन वेळा फवारण्या करूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले नाही. आता ही अळी पुन्हा दुसऱ्या पिकावर आली तर काय करावे, याची मोठी चिंता लागून आहे. रब्बीतही लागवड करण्याबाबत मनात शंका उत्पन्न होत आहे.
- विजय तेजराव किलबिले, रईखेड मायंबा, ता. जि. बुलडाणा

रुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी अळीचा उद्रेक रब्बीतच दिसून आला होता. आमच्या भागात काहींनी या कारणाने लागवड केलेला मका वखरलासुद्धा. खरिपात पुन्हा हे संकट अधिक जोमाने येईल, याची खात्री नव्हती. परंतु, आता प्रत्येक कणसात अळीने घातलेला धुमाकूळ तुम्हाला बघता येईल. अळीने या हंगामात मक्याचे मोठे नुकसान केले. शिवाय, जो माल तयार होईल त्याचाही दर्जा खालावेल, असे दिसते. उत्पादन खर्चात एकरी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च वाढला. आता रब्बीत मका पेरावा की नाही, असे वाटू लागले आहे...’’ मक्याचे आगार समजल्या जाणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरातील गावांमध्ये अशी धास्ती तयार झाली आहे. या भागात मक्याची भरपूर लागवड असलेल्या रुईखेड, भडगाव, धाड भागात भेटी दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये पसरलेली चिंता स्पष्टपणे जाणवत होती.

बुलडाणा जिल्ह्यात मक्याची या हंगामात सुमारे २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झालेली आहे. अर्धीअधिक लागवड बुलडाणा, मोताळा, चिखली, मलकापूर या तालुक्यांमध्ये झालेली आहे. मागील रब्बीमध्ये लष्करी अळीची चाहूल लागली होती. तेव्हा ही अळी नियमित कीड असेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फारसे मनावर घेतले नाही. परंतु, पीक जसजसे वाढू लागले आणि अळीने केलेले नुकसान दिसून आले तसे शेतकरी धास्तावले. या वेळी रुईखेड, भडगाव भागातील अनेकांनी मका वखरली होती, असे शेतकरी सांगतात.  

वर्षानुवर्षे हे पीक चांगले उत्पादन देत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात इतर पिकांचा विचारही येत नाही. यंदाही शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र, हंगाम सुरू झाल्यापासून लष्करी अळीबाबत त्यांना सामोरे जावे लागत आहे. पीक काही दिवसांचे झाल्यानंतर पोंगा अवस्थेत अळी दिसून आली. कृषी विभागाने जनजागृती केलेली असल्याने त्यांच्या शिफारशीनुसार प्रत्येकाने अळीचा हा पहिला हल्ला नियंत्रणात आणला. त्यानंतरही पिकावर दुसरा हल्ला थेट कणीस अवस्थेत झाला.

या वेळी पीक उंच वाढलेले असल्याने कुठलीही फवारणी करणे त्यात शक्य नव्हते. शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावर उपाययोजना केल्या. काहींनी छोट्या स्प्रेपंपाने कणसांवर कीडनाशकांची फवारणी केली. परंतु, अळीने आपला कार्यभाग साधला. जिल्ह्यात मक्याचे कमी-अधिक प्रमाणात २५ टक्क्यांपर्यंत नुकसान झालेले आहे. 

या वर्षी प्रत्येकाला किमान दोन ते तीन फवारण्या कराव्या लागल्या आहेत. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शिफारस करण्यात आलेल्या कीडनाशकांमध्ये अत्यंत महागडी कीटकनाशके आहेत. त्यामुळे अळीनियंत्रणासाठी प्रत्येकाचा एकरी अडीच हजारांहून जास्त खर्च वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आजवर कधीही न पाहिलेले हे भीषण संकट असल्याचे शेतकरी सांगत होते. 

इतर पिकांवर अळी येण्याची भीती
सध्या मक्यावर असलेली ही अळी आगामी काळात इतर पिकांवर आली तर अत्यंत बिकट परिस्थिती तयार होईल, अशी भीती शेतकऱ्यांसह कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनाही भेडसावत आहे. सलग दोन हंगामांपासून मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तृणधान्यावर अवलंबून असलेली ही अळी उद्या (रब्बीत) गहू, हरभऱ्यावर आली तर समस्या वाढू शकते. 

मका उत्पादकांना बुलडाण्यात कोट्यवधींचा फटका
या हंगामात लष्करी अळीमुळे एकरी किमान ५ क्विंटलचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ६२ हजार ५०० एकरावर लागवड झालेली आहे. मक्याचे एकरी पाच क्विंटलचे नुकसान गृहीत धरता किमान ३ लाख १२ हजार क्विंटल एकूण नुकसान झाले आहे. सध्याचा सरासरी १५०० रुपयांचा दर गृहीत धरला, तर जिल्ह्यात किमान ५० कोटींपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मक्यासाठी एकरी खर्च (रुपये)

नांगरणी १०००
रोटाव्हेटर ५००
बियाणे १५००
पेरणी खर्च ७००
खत (दोन वेळा) ३०००
फवारणी (दोन)    २०००
तणनियंत्रण    १५००
कोळपणी  ५००
कापणी    २०००
मळणी     २०००
इतर  १०००
एकूण खर्च   १५,७००

मक्याचे दरवर्षीचे सरासरी उत्पादन

एकरी उत्पादन  २० क्विंटल
मिळणारा सरासरी दर     १३०० 
उत्पन्न  २६,०००
खर्च १५,७००

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...