कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
टेक्नोवन
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक संच प्रणाली
विशेष म्हणजे बाजारात लाख-दीड लाखाच्या घरात असलेली ही प्रणाली पुजारी यांनी मात्र अवघ्या सात हजारांत बनवली आहे, हे त्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या अभ्यासाने, निरीक्षणाने प्रोग्रॅमेबल टायमर पॅनेल बसवून स्वयंचलित ठिबक संच प्रणाली तयार करण्याची किमया ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील मनोज पुजारी या शेतकऱ्याने करून दाखवली आहे. एकाचवेळी सुमारे दहा एकर क्षेत्रावरील ठिबक संच प्रणालीद्वारे नियंत्रित करता येऊ शकते. विशेष म्हणजे बाजारात लाख-दीड लाखाच्या घरात असलेली ही प्रणाली पुजारी यांनी मात्र अवघ्या सात हजारांत बनवली आहे, हे त्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
श्री. पुजारी यांनी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिकची पदविका घेतली आहे. पदविका घेतल्यानंतर सुरुवातीला तीन-चार वर्षे दामाजी सहकारी साखर कारखान्यात इंजिनियर म्हणून त्यांनी काम केले. पण ते त्यात फारसे रमले नाहीत. पुढे त्यांनी घरची शेती आणि व्यवसायात लक्ष घालण्याचे ठरविले. त्यांच्याकडे पूर्वी दहा-बारा एकर ऊस होता. या उसासाठी बसवलेल्या ठिबक संचाला स्वयंचलित करण्याच्या उद्देशातूनच ते या प्रणालीपर्यंत पोचले. अर्थात, त्यासाठी तब्बल १०-१२ वर्षे त्यांनी घालवली.
सतत नावीन्याचा ध्यास आणि उत्तम निरीक्षणशक्तीतून या प्रणालीची निर्मिती होऊ शकली. २०१७ मध्ये प्रत्यक्षात त्यात त्यांना यश मिळाले. आज या परिसरातील ५-६ शेतकऱ्यांकडील शेतावर प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली त्यांनी बसवून दिली आहे. याबाबत बोलताना पुजारी म्हणाले, की पाण्यासह वीज, खते आणि कृषी रसायने नेमकेपणाने मिळतातच, पण महत्त्वाचे म्हणजे वेळ आणि पैसाही या प्रणालीमुळे वाचू शकतो. शिवाय हाताळणीही सोपी आहे. शेतकऱ्यांना निश्चितच ती फायद्याची आहे, असे ते म्हणाले.
काय आहे प्रणाली
कोणतीही पिके सहसा शेतकरी वाफसा स्थितीत ठेवतात, आज ठिबक संचामुळे मोठी सोय झाली आहे, पण त्यातूनही पिकांना अतिरिक्त पाणी दिले जाते. खते-औषधेही बऱ्याचवेळा नेमकेपणाने मिळू शकत नाहीत. परिणामी, वेळ, पैसा, खते-कृषी रसायने या सर्वांचा अपव्यय होतो. त्यासाठी ठिबक संचाद्वारे पिकांना पाणी सोडण्यासाठी प्रोग्रॅमेबल टायमर पॅनेलच्या माध्यमातून पुढील २४ तासांदरम्यानचे ठिबक संचाचे टायमिंग यावर सेट केले जाते. आपल्याला कधी आणि किती वेळ पाणी द्यायचे आहे, हे त्यात ठरवता येते, तसेच ऐनवेळी मध्येच लोडशेडिंगमुळे वीज गेलीच, तर पुन्हा वीजपंप सुरू करण्याची गरज नाही, आधी नोंदवलेल्या वेळेनुसार आपले उर्वरित काम ही प्रणाली पूर्ण करते. त्यामुळे विनाव्यत्यय पिकांना पाणी मिळते.
कमी खर्च, हाताळणीही सोपी
बाजारात आज काही खासगी कंपन्यांची ठिबक संचाची स्वंयचलित प्रणाली उपलब्ध आहे, पण त्याची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण ही प्रणाली पूर्णपणे देशी बनावटीची आहे. यासाठीचे सर्व सुटे भाग स्थानिक बाजारपेठत उपलब्ध आहेत, शिवाय ते बसविण्यास व हाताळण्यास कुशल तंत्रज्ञांची गरज नसून, शेतकरी स्वतः ते हाताळू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी केवळ ५ ते ७ हजारांचा खर्च आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
- ही प्रणाली फक्त विजेच्या थ्री फेजवर चालते.
- या प्रणालीवर तास आणि मिनिट अशी वेळ नोंदविण्यासाठी स्वतंत्रपणे दोन बटणे आहेत. त्याद्वारे आपल्याला हवा तो वेळ आपण सेट करू शकतो.
- विजेच्या चढ-उतारापासून पंपाचे संरक्षण करण्यासाठी सिंगल फेजिंग प्रीव्हेंटरची सोय असल्याने पंप जळण्याची शक्यता नाही.
- अनेक वेळा हवा धरून पंप रिकामा फिरतो, या परिस्थितीत पंपाला जळण्यापासून ही प्रणाली वाचवते.