मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून 

हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देऊनही लक्षांक पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली. मात्र, अजूनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर वाहनांसह शेतकरी ठाण मांडून आहेत.
maize
maize

औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देऊनही लक्षांक पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली. मात्र, अजूनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर वाहनांसह शेतकरी ठाण मांडून आहेत. खरेदीच्या अपेक्षेने केंद्रांवर आलेल्या मका उत्पादकांना वाहन भाड्याच्या भुर्दंडासह पावसाळी वातावरणात मका झाकण्यासाठी ताडपत्रीचा खर्च करण्याची वेळ आली आहे. 

मका खरेदीला मिळालेल्या ३१ जुलैपर्यंतच्या मुदतवाढीला दीड दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाच पुन्हा एकदा मका खरेदी थांबली. राज्यासाठी दिलेल्या लक्षांक पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद पडले. दुसरीकडे शेकडो शेतकऱ्यांची मका खरेदी बाकी होती. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, भोकरदन, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर आदी केंद्रांवर जवळपास ६८६ वाहने उभी आहेत. शेतकरी वाहनांसह अनेक केंद्रांवर ठाण मांडून आहेत. फुलंब्री केंद्रावर असलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातील मक्याला कोंब फुटल्याचा प्रकारही समोर आला आहे.  नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरही खरेदीसाठी बोलावले न जाणे, वारंवार चौकशी केल्यानंतरही प्रतिसाद मिळणे, नोंदणी क्रमांक आधीचा असताना नंतरचा क्रमांक असलेल्यांना खरेदीसाठी बोलावले जाणे आदी आरोप शेतकऱ्यांकडून झाले आहेत. मुदतवाढ मिळाल्यानंतर एक दिवस उशिराने व मुदत संपण्यापूर्वीच लक्षांकपूर्तीमुळे खरेदीचे पोर्टल बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.  मुदतवाढ देताना शासन लक्षांक का देते, असा प्रश्न मका उत्पादक उपस्थित करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार जालना केंद्रावर ६०, जाफराबाद ७०, कन्नड १४०, फुलंब्री ९०, खुलताबाद ५, वैजापूर ५ तर भोकरदन येथील केंद्रावरील सर्वाधिक तब्बल ३१६ वाहनांना मका खरेदी ची प्रतीक्षा आहे.  अशी आहे खरेदी स्थिती  प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ७ हजार ८३२ शेतकऱ्यांपैकी तीन हजार ८६९ शेतकऱ्यांकडील एक लाख १४ हजार ४३६ क्विंटल मका खरेदी करण्यात आली. तर जालना जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ५६१० शेतकऱ्यांपैकी केवळ १ हजार ९५४ शेतकऱ्यांकडील ७३ हजार ४४१ क्विंटल मका खरेदी झाली. औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ७८३२ शेतकऱ्यांपैकी केवळ ५९६६ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले गेले होते तर जालना जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ५६१० शेतकऱ्यांपैकी ३८७७ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले होते हे विशेष.  प्रतिक्रिया ११ जुलैला एसएमएस आल्यानंतर केंद्रावर चौकशी केली तर म्हणे खरेदी बंद पडली. खरेदी सुरू झाल्यानंतर पुन्हा चार वेळा चौकशी केली तर म्हणे बोलवू. खरेदीच्या मुदतीला दोन दिवस उरले तरी बोलवत नसल्याने मका घेऊन केंद्रावर आलो. सहा दिवसापासून इथं खरेदी होईल याची प्रतीक्षा करतो आहे.  - मेघराज कुंटे, मका उत्पादक, बोधेगाव, जि. औरंगाबाद  पाच सहा दिवसांपासून मका घेऊन केंद्रावर आलोय. सतत पाऊस सुरू आहे. स्लॅपची घर गळायला लागली तिथे मक्यावर टाकलेली ताडपत्री काय दम धरणार. सरकारने आमच्या नुकसानीचा विचार करून निर्णय घ्यावा.  - सुरेश भुमे, मका उत्पादक, आडगाव बु., जि. औरंगाबाद   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com