केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक कंपन्या

केंद्र सरकारने देशात सुमारे दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) स्थापन करून त्यांना प्रोत्साहन देणारी योजना सुरू केली आहे.
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक कंपन्या Farmer manufacturing companies will set up the center
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक कंपन्या Farmer manufacturing companies will set up the center

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) स्थापन करून त्यांना प्रोत्साहन देणारी योजना सुरू केली आहे. २०२७-२८पर्यंत सुमारे ६ हजार ८६५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करताना स्थानिक विशिष्ट शेतीमाल क्लस्टरचा विकास होईल, एक जिल्हा, एक उत्पादन योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संबंधित उत्पादनाचे विशेषत्व जपण्याला, वाढविण्याला प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी (ता. २७) लोकसभेत एका प्रश्‍नाला लिखित उत्तर देताना दिली. तोमर यांनी म्हटले आहे, ‘‘पहिल्यांदा देशातील प्रत्येक ब्लॉकसाठी (तालुका) एक या प्रमाणे देशात ४४६५ शेतकरी उत्पादक संस्थांचे वाटप अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६३२ कंपन्यांची नोंदणी झाली आहे. प्राइस वॉटर हाउस कूपर्स, या संस्थेने महाराष्ट्रात राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अभ्यास करून एक अहवाल दिला आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे कंपनीच्या सभासदांच्या उत्पन्नात २२ टक्के वाढ झाली आहे. इतर कोणत्याही पर्यायांपेक्षा कंपनीद्वारे मार्केटिंग केल्यामुळे ३१ टक्के खर्च कमी आला आहे. सभासदांचा शेती उत्पादन खर्च प्रति एकर १ हजार ३८४ रुपयाने कमी झाला आहे. आंध्र प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०२०पर्यंत राज्यात ८५२ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.’’

व्यवस्थापन खर्चासाठी स्वतंत्र तरतूद केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन करण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चाची विशेष तरतूद करण्यात आली आहे. कंपन्यांच्या बैठका आणि इतर व्यवस्थापन खर्चासाठी एका शेतकरी उत्पादक संस्थेला तीन वर्षांत १८ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आणि प्रोत्साहनासाठी सुमारे २४९.०८ कोटी रुपयांची अगाऊ तरतूद केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये कृषी-व्यापार कृती गटासाठी देण्यात येणारे अनुदान ३१ लाखाने वाढविल्याची माहितीही तोमर यांनी दिली.

२०२०मधील आकडेवारीनुसार  राज्यनिहाय शेतकरी उत्पादक कंपन्या

  • आंध्र प्रदेश     १४७
  • अरुणाचल प्रदेश      १५
  • आसाम      ८७
  • बिहार      २२१
  • चंडीगड     १
  • छत्तीसगड      ३२
  • दिल्ली      ७
  • गुजरात      १०८
  • हरियाना      २५७
  • हिमाचल प्रदेश      ७
  • जम्मू आणि काश्मीर      १०
  • झारखंड      ७०
  • कर्नाटक      १९५
  • केरळ      ५३
  • मध्य प्रदेश      २३७
  • महाराष्ट्र      १९५०
  • मणिपूर      २६
  • मेघालय     १
  • मिझोराम    ४
  • नागालँड      ६
  • ओडिशा     १७७
  • पुद्दुचेरी      १
  • पंजाब      १३
  • राजस्थान      ११४
  • तमिळनाडू      २४१
  • तेलंगणा      ११९
  • त्रिपुरा      ८
  • उत्तर प्रदेश      ६५४
  • उत्तराखंड      १४
  • पश्‍चिम बंगाल      १८४
  • एकूण     ४९५९  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com