मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची शेतकऱ्यानेच फोडली कोंडी 

वाय-१ कापसाचे उत्पादन धुळे, शिरपूर, अकोला या भागात होते. त्यातील धांग्याच्या लांबीऐवजी अशा वाणात तलमता लक्षात घेतली जाते. असे काही गुणधर्म निकषात बसत असतील तर मध्यम धाग्याचा कापूस खरेदी केला जातो. खरेदीस नकार देण्याचे कारण आणि धोरणही नाही. - सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची शेतकऱ्यानेच फोडली कोंडी 
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची शेतकऱ्यानेच फोडली कोंडी 

नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या म्हणजेच मिडीयम स्टेपल कापसाच्या खरेदीस नकारघंटा वाजविणाऱ्या सीसीआयने अखेर कायद्याचा धाक दाखविणाऱ्या शेतकऱ्यापुढे नमते घेत मध्यम धाग्याच्या कापसाची खरेदी केली. धुळे जिल्हयातील शिरपूर येथील सीसीआय केंद्रावर हा प्रकार घडला असून याकरीता तब्बल ९ दिवसाचा लढा या शेतकऱ्याला लढावा लागला. राज्यभरातील बहूतांश कापूस उत्पादकांना यामुळे दिलासा मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

दिलीप शामराव गोड (बोरटेक, ता. शिरपूर, जि. धुळे) या शेतकऱ्याने सीसीआयकडे कापूस विकण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यांचा नंबर लागल्यानंतर ३५ क्‍विंटल ९० किलो कापूस विक्रीसाठी ते घेऊन गेले. मोजणीच्यावेळी मात्र मध्यम धागा वाण असल्याचे सांगत त्यांचा कापूस ग्रेडरकडून नाकारण्यात आला. परंतू वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या निर्णयानुसार एफएक्‍यु प्रतीच्या कापसातच लांब धागा, मध्यम लांब धागा, मध्यम धागा अशी वर्गवारी आहे. त्या वर्गवारीनुसार दरही देण्याची तरतूद आहे. 

कापूस नाकारला असला तरी दिलीप गोड यांनी कापसाची गाडी तेथेच उभी करीत मित्र भुपेश चौधरी यांच्या माध्यमातून ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून कापसातील विविध स्टेपल त्याला मिळणारा दर याबाबतचा वस्त्रोद्योग विभागाचा अध्यादेश मिळविला. त्यानंतरही केंद्रावरील ग्रेडर जुमानत नसल्याने सीसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अली राणी यांच्याशी कार्यालयात संपर्क साधण्यात आला. त्यांच्या माध्यमातून सीसीआयचे राज्य व्यवस्थापक संजय पाणीग्रही आणि त्यानंतर सीसीआयच्या औरंगाबाद येथील मुख्यालयातील यंत्रणेला हलविण्यात आले. सामान्य शेतकऱ्यांच्या ९ दिवसाच्या असामान्य लढ्यानंतर नमलेल्या सीसीआय प्रशासनाने मध्यम धागा वाणाचा कापूस खरेदीचा निर्णय घेतला. त्यानंतर शेतकऱ्याशी फोनवरुन संपर्क साधत त्याला कापूस मोजण्यास सांगितले गेले. 

शॉर्ट स्टेपलला मिळाला ५००२ रुपयांचा दर  एफएक्‍यु कापसाला ५५५० रुपयांचा हमीभाव आहे. दिलीप गोड यांना शॉर्ट स्टेपलसाठी ५००२ रुपये ९० पैसे इतका दर मिळाला. ३५ क्‍विंटल ९० किलो कापूस खरेदी करण्यात आला. शिरपूर येथील डि.आर. कॉटनमध्ये हे केंद्र आहे.  प्रतिक्रिया महाराष्ट्रात लांब धागा व मध्यम लांब धाग्याचा कापूस खरेदी होत नसल्याचे समजते सीसीआयने मध्यम धागा वाणाची कापूस खरेदी सुरु करुन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. कापूस पणन महासंघाला सुध्दा सीसीआयने मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीसाठी कळवावे.'  - गोविंद वैराळे, माजी महाप्रबंधक, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com