जनावरेच आमचं ‘दिवाळी गिफ्ट’

कोरोनामुळे यंदाची दिवाळी अजिबात जाणवत नाही. मात्र दुःखात सुख मानून आम्ही ती साजरी करणार आहोत. शेती परवडत नसल्याने दूध धंद्यावर आमचा संसार चालतो.
nashik diwali
nashik diwali

पुणे : ‘‘कोरोनामुळे यंदाची दिवाळी अजिबात जाणवत नाही. मात्र दुःखात सुख मानून आम्ही ती साजरी करणार आहोत. शेती परवडत नसल्याने दूध धंद्यावर आमचा संसार चालतो. त्यामुळे साचवलेल्या पुंजीमधून दोन दुभती जनावरे आमच्या गोठ्यात येत आहेत. ही जनावरेच आमची यंदाची दिवाळी गिफ्ट आहेत,’’ युवा शेतकरी शंतनू साहेबराव देशमुख मनमोकळेपणाने बोलत होते.  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीरोडवर म्हसरूळ शिवारात शेती आणि दूध धंदा सांभाळणाऱ्या शंतनू यांचा दिवाळीच्या तोंडावर भुईमूग व सोयाबीनने अपेक्षाभंग केला. पावसामुळे भुईमुगाला मोड फुटले आणि दीड एकरात पेरलेल्या सोयाबीनला देखील अपेक्षेप्रमाणे माल आला नाही. ७-८ पोती सोयाबीन घरात काढून ठेवला आहे. पण भावदेखील कमी झाले आहेत. ‘‘दिवाळीनंतर भाव असो की नसो; मला सोयाबीन विकावा लागेल आणि तोच पैसा रब्बी हंगामासाठी गुंतवावा लागेल,’’ असे शंतनू यांनी सांगितले.  खरीप वाया गेला तरी रडत बसता येत नाही. नियोजन करावेच लागते. त्यामुळे रब्बीत गहू आणि हरभरा पेरण्याचा निर्णय घेतला. आता एक एकरावर गहू पेरून झाला आहे. कडाक्याच्या थंडीत गव्हाला पाण्याच्या सात-आठ पाळ्या द्याव्या लागतील. ऐन दिवाळीत देखील पाणी भरावे लागेल. ही सगळी कामे जनावरे सांभाळून करावी लागतील. दिवाळीत शहरी माणसे लवकर उठून नवे कपडे घालून फटाके फोडतात किंवा लाडू-शेव खातात. आमचे तसे नसते. आम्ही वर्षानुवर्षे पहाटे पाचला उठतो. दिवाळीतही तोच दिनक्रम राहील, असे शंतनू यांनी दिवाळीबद्दल सांगितले. शंतनू व त्याची पत्नी सौ. स्वाती हे दिवसरात्र शेतात आणि गोठ्यात काबाडकष्ट करतात. स्वातीताई गोठ्यातील शेण काढून साफसफाई करतात. शंतनू मात्र पाच म्हशी आणि तीन गायींच्या धारा काढून गावाकडे दूध घालायला निघून गेल्यानंतर शेतात व गोठ्यातील सर्व कामे स्वातीताई सांभाळतात. शंतनू दूध वाटून आल्यावर पुन्हा जनावरांना ४०० किलोचा चारा तयार करून वाटतात.  “यंदा कोरोनामुळे शेतीत पैसा आला नाही. सणसुद्धा वाटत नाही. मात्र मुलगा विराज याला ती कमी आम्ही भासू देणार नाही. माझ्यासाठी नवे कपडे घेण्याचा विचार अजून केला नाही. मात्र त्याला बाजारात नेऊन त्याच्या पसंतीचे कपडे घेणार आहे. शेती परवडत नसल्याने आता सर्व मदार दूध धंद्यावर आहे. त्यामुळे साचलेले सर्व पैसे आम्ही गोठा आणि जनावरांमध्येच गुंतवत असतो.’’

प्रतिक्रिया ८८ हजारांची एक नवी म्हैस गेल्या आठवड्यात मी स्वतः बाजारातून आणली आहे. दुसरी एक म्हैस गुजरातमधून मागवली आहे. तिच्यासाठी ९०-९५ हजार खर्च होतील. त्यामुळे घरातील असलानसलेला सर्वच पैसा दूध धंद्यात लावला जाईल. यंदा दुसरी कोणतीही खरेदी आम्ही करणार नाही. दोन म्हशी याच आमच्यासाठी दिवाळी गिफ्ट आहेत.  - शंतनू साहेबराव देशमुख, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com