पंतप्रधानांना शेतकऱ्याचे पत्र : वर्तमान काळवंडले, भवितव्यही अंधकारमय

कोरोनाव्हायरसच्या प्रसाराच्यापार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडूनलॅकडाऊनसह विविध उपाययोजना राबवल्याजात आहेत. त्या आवश्यकही आहेत. मात्र शेतीमाल पुरवठ्याची साखळी विस्कळित झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतमजुरांसह हातावर पोट असणाऱ्या अनेक घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माणझाला आहे...
पंतप्रधानांना शेतकऱ्याचे पत्र : वर्तमान काळवंडले, भवितव्यही अंधकारमय
पंतप्रधानांना शेतकऱ्याचे पत्र : वर्तमान काळवंडले, भवितव्यही अंधकारमय

मा. नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान, भारत सरकार

सप्रेम नमस्कार, मंगळवारी रात्री आपण २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केले. देशाच्या भल्यासाठी तो गरजेचा आहे यात शंकाच नाही. तो आदेश पाळणे आमचे कर्तव्यही आहे. परंतु देशातील ६५ टक्के शेतकरी व शेतमजूर यांच्या खिशात पैसे नाहीत या वास्तवाचे करायचे काय, हा प्रश्न आमच्यासारख्या कोट्यवधी शेतकरी बांधवांच्या मनात आहे. या काळात आम्हा शेतकरी व शेतमजूर बांधवांची चूल कशी पेटणार, हा कळीचा प्रश्न आहे. गुरांना चारा खरेदी करणे व त्यांची देखभाल करणाऱ्या मजुरांना पैसे कोठून द्यावेत. या मजुरांच्या खाण्यापिण्याचे एवढ्या दिवसाचे नियोजन कसे करावे, याची भ्रांत आम्हाला पडली आहे. आम्हाला शेतात मजूर न्यावेच लागतात. ते नेले तर कायद्याचा भंग. चोरून लपून ते पोटासाठी आलेच तर त्यांचे कामाचे सायंकाळी पैसे दिले नाहीत तर त्यांचा संसार चालत नाही, त्यांना कुणी उधार देखील देत नाही याचा विचार आपण निश्चित केला असेल. त्याबाबत देखील कृपया मार्गदर्शन व्हावे. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची देखील तीच अवस्था आहे. त्यांनी देखील किराणा, भाजीपाल्यासाठी पैसा कुठून आणावा? आज शेतात केळी, द्राक्ष, हरभरा, दादर, गहू अशी अनेक पिकं काढणीला आली आहेत. ती काढणं थांबवता येत नाही व लॉक डाऊनमुळे, अर्थात संचारबंदीमुळे पिकांची काढणी कशी करावी? शेतात मोकळ्या वातावरणात सारे वेगवेगळे काम करतात. पण आपल्या आदेशाने आता बाहेर पडणे शक्य नसल्याने तो शेतमाल कसा काढावा व कसा विकावा? बँकांनी आधीच शेतकऱ्यांना कर्ज न दिल्याने आज शेतकऱ्यांनी पिकांसाठी लाखो रुपये खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. आज तो पीक काढू शकत नाही व विकूही शकत नाही. आता त्याने सारे कर्ज कुठून फेडावे? आपण मोठे आहात व आपल्याकडे थिंक टँक देखील आहे. आपण कदाचित ह्या साऱ्या बाबींचा विचार केला असणारच. शेतकऱ्यांपुढे उभ्या राहिलेल्या या प्रश्नमालिकांची उत्तरे आपण भाषणात देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही.माझ्या सारख्या पामराला बऱ्याच गोष्टी समजत नाही. कारण आधीच आम्ही जेमतेम ३१ मार्चपर्यंत सारे बंद राहील अशी मानसिक तयारी केली होती. आता तर हे सारे १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दुष्काळ, गारपीट व आताचे कोरोना व्हायरसचे संकट यामुळे आधीच लाखो आत्महत्या झालेल्या असताना आता आमच्या पुढील अंधकारमय जीवनासाठी मार्गदर्शन अपेक्षित आहे. अन्यथा जगात जेवढे महामारीने मेले नाहीत तेवढ्या शेतकरी आत्महत्याने लोक मरतील. लॉक डाऊन मध्ये व देशाला वाचवण्यासाठी आम्ही निश्चितच सहभागी होऊ व कितीही नुकसान झाले तरी आपला आदेश पाळू. फक्त विनंती एकच आहे, की शेतकरी व शेतमजूर यांनी पुढील एकवीस दिवस कसे काढावेत व त्यांचे आर्थिक नियोजन त्यांच्याकडे नसल्याने सरकार कसे नियोजन करणार हे माहीत व्हावे ही विनंती. त्यासोबतच त्याचे होणारे भविष्यातील नुकसान भरून पुन्हा एकदा देश मजबूत करण्यासाठी आपण त्याला मदत कशी करणार, हे सांगणे देखील अपेक्षित आहे. म्हणजे पुन्हा एकदा शेतकरी, शेतमजूर आशेवर उभा राहील. आणि हो, आजपर्यंत स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यानेही देशसेवा केली आहे. कधीतरी त्याच्यासाठी देखील जनतेला टाळ्या वाजवायला सांगा ही विनंती.

आपला - एस. बी. नाना पाटील, एक शेतकरी चोपडा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com