विमाभरपाई मिळू नये म्हणून पर्जन्यमापक यंत्रणाच केली बंद?

विमाभरपाई मिळू नये म्हणून पर्जन्यमापक यंत्रणाच केली बंद?
विमाभरपाई मिळू नये म्हणून पर्जन्यमापक यंत्रणाच केली बंद?

अमरावती : विमाभरपाई मिळू नये याकरिता पर्जन्यमापक यंत्रच बंद ठेवण्यात आल्याची खेळी विमा कंपनीकडून खेळण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेत महावेधकडून पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करण्यात आली असली, तरी अहवाल प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.  संत्रापट्टयात १ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान सलग सात दिवसांत ३० मिलिमीटर पाऊस झाल्यास १९ हजार २५० रुपयांचा विमा परतावा मिळेल, असे विम्या संदर्भातील परिपत्रकात म्हटले आहे. या दरम्यान शिरजगाव कसबा येथील पर्जन्यमापक यंत्रात २५ डिसेंबरची नोंद घेतली गेली. २६ ते ३१ डिसेंबरची नोंदच संबंधित पर्जन्यमापकात नाही. अशातच  ३० व ३१ डिसेंबरला या भागात जोरदार पाऊस झाला. त्याची दखल घेत चांदूरबाजार, अचलपूर तालुक्‍यांत अतिवृष्टीच्या सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले.  चांदूरबाजार तालुक्‍यातील शिरजगाव कसबा भागातून वाहणाऱ्या मेघा नदीला पूरही आला. असे असताना पर्जन्यमापकात याची कोणत्याही प्रकारची नोंद नाही. त्यानंतर १ व २ ला झालेल्या पावसाची नोंद यंत्रात आहे. त्यामुळे या प्रकरणातील गौडबंगाल वाढले आहे. १ व २ जानेवारीला झालेल्या पावसाची नोंद २४ मिलिमीटर इतकीच आहे. भरपाईसाठी ३० मिलिमीटर पावसाची गरज आहे. यापूर्वीच्या पावसाची नोंद घेतली असती तर पर्जन्यमान ४० मिलिमीटरपेक्षा जास्तीचे नोंदविले गेले असते. परंतु, संत्रा उत्पादकांना भरपाई द्यावी लागू नये याकरिता विमा कंपनीकडून पर्जन्यमापक बंद ठेवण्यात आले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.  विमाभरपाई नाकारण्याची खेळी चांदूर बाजार तालुक्‍यात १३५० शेतकऱ्यांनी १५४३ हेक्‍टरचा संत्रा फळबागेचा विमा काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर विमाधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली. परंतु, २ कोटी ९५ लाख  रुपयांची भरपाई देणे नसल्याने विमा कंपनीकडून ही खेळी खेळण्यात आली, असा आरोप आहे.  महावेधकडून झाली तपासणी महावेधच्या पर्जन्यमानमापक यंत्रावरून पावसाची नोंद घेतली जाते. या यंत्रावरच शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. त्याची दखल घेत नागपूर येथील महावेधच्या अधिकाऱ्यांकडून शिरजगाव कसबा गावातील पर्जन्यमापक यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल लवकरच मिळणार आहे. तपासणीच्यावेळी शेतकरी, कृषी अधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडून पावसाचा अहवाल मिळविला असता ३१ डिसेंबर रोजी ९ मि.मि. पाऊस झाल्याची त्यात नोंद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com