पैनगंगेच्या पाण्यासाठी १६ दिवसांपासून आंदोलन

पैनगंगेच्या पाण्यासाठी १६ दिवसांपासून आंदोलन
पैनगंगेच्या पाण्यासाठी १६ दिवसांपासून आंदोलन

हिमायतनगर, जि. नांदेड : इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मराठवाडा -विदर्भातील शेतकऱ्यांनी बोरी पुलाजवळ नदी पात्रामध्ये सोमवारी (ता. १९ नोव्हेंबर) सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन थंडीची तमा न बाळगता सोमवारी (ता. ३) सोळाव्या दिवशीही सुरूच होते. शासन-प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ३) प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यांनी नदी पात्रात सहा फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये गाडून घेत आंदोलन केले. हिमायतनगर-उमरखेड रस्त्यावरील पुलावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. इसापूर धरणाच्या कालव्याद्वारे पाणी आवर्तने सोडण्यात आली आहेत. परंतु, धरणा खालील पैनगंगा नदीच्या दोन्ही काठांच्या मराठवाडा आणि विदर्भातील ९० हून अधिक गावातील शेतकरी, नागरिकांना नदी पात्र कोरडे असल्यामुळे पाणीटंचाईची समस्येला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याप्रमाणे नदीपात्राला तिसरा कालवा घोषित करून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी तब्बल १६ दिवसांपासून कडक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रवक्ते प्रमोद कुदळे, जिल्हा प्रमुख विठ्ठल देशमुख, उमाकांत तिडके, बालाजी बनपेडवाड, गजानन ठाकरे, अनिल पाटील, माजीद भाई, के. डी. पवार, मारोती वानखेडे, बाळू शिरफुले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com